हास्यकारंजे फुलवा!

संध्या गावित
बुधवार, 8 मे 2019

समस्या सगळ्यांनाच असतात; पण तरीही मनमोकळे हसा. आपण हसल्यावर आसपासचे जग उजळून निघेल.

समस्या सगळ्यांनाच असतात; पण तरीही मनमोकळे हसा. आपण हसल्यावर आसपासचे जग उजळून निघेल.

हास्य हे चैतन्य आहे, आनंदाचे स्वरूप आहे. हास्य ही प्रत्येक माणसाच्या मनाची गरज आहे. हास्य, आनंद आणि समाधान यापेक्षा जगात दुसरे मौल्यवान काही असूच शकत नाही. मनावरचे ताणतणाव दूर करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. एखादा माणूस अंर्तबाह्य समजून घ्यायचा असेल, तर तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो, त्यापेक्षाही तो कसा हसतो याचे निरीक्षण केले तर तो अधिक चांगल्या पद्धतीने उमगतो. रोज भरपूर आणि मनमोकळे हसा. कारण जोवर हसू आहे तोवरच जगण्यात मजा आहे. हसण्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. रक्ताभिसरण सुधारते. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम झाल्यामुळे चेहरा सुरकुत्याविरहीत, टवटवीत व ताजातवाना होतो. आनंदी वातावरणात ज्या हिलिंग लहरी निर्माण होतात त्यामुळेच तर निम्मे आजार बरे होतात. इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोन बळकट होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा असतात, हसणे मात्र सर्वांचे एकाच पद्धतीचे असते. कारण हास्य हा समस्त विश्‍वाला जोडून ठेवणारा समान धागा आहे. प्रसन्न होकारात्मक मन, प्रचंड आत्मविश्‍वास व मनमोकळे हास्य यातच प्रत्येकाच्या यशाचे मर्म लपलेले असते.

चार्ली चॅप्लिन म्हणायचे, ""माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत, पण माझ्या ओठांना त्या माहीतच नाहीत, त्यांना फक्त हसणे माहीत आहे. ज्या दिवशी मी कोणाला हसवले नाही, तो दिवस मला वाया गेल्यासारखा वाटतो.'' या जगात सर्वाधिक गरजेच्या दोनच गोष्टी आहेत, एक प्रेम व दुसरे हास्य. म्हणून एका हातात प्रेम हवे व दुसऱ्या हातात हासू. आजूबाजूच्या इंद्रधनुषी वातावरणात स्वतःचे रंग भरता आले पाहिजेत. आज-काल रोजच्या धावपळीच्या जीवनात लोक हसणे विसरले आहेत. मग त्यांना हास्यक्‍लबची जरुरी भासू लागते. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्‍न दिसू देत नाहीत तर, सहनशीलता प्रश्‍न निर्माणच करीत नाहीत. म्हणून प्रत्येक क्षण भरभरून जगा, पोटभर हसा, आनंदी राहा.

Web Title: muktapeeth article written by sandhya gawit