हरवलेले सापडले

सुमती सामंत
गुरुवार, 11 एप्रिल 2019

माणसे प्रामाणिक असतात. एखादी वस्तू सापडली, तर ती मालकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड करतात.

माणसे प्रामाणिक असतात. एखादी वस्तू सापडली, तर ती मालकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड करतात.

तो फोन माझ्यासाठीच होता. माझे नाव बरोबर सांगण्यात येत होते. तरीही मला काही तरी गोंधळ असावा, असेच पहिल्यांदा वाटत होते. तो फोन होता रायगड जिल्ह्यातील माणगावच्या एसटी बसस्थानक प्रमुख मकरंद जाधव यांचा. त्यांनी सुरवातीलाच माझे नाव विचारून मीच बोलते आहे, याची खात्रीही करून घेतली होती. त्यांनी सांगितले, ""तुमचे इथे "वॉलेट' सापडले आहे. त्यात बरेच पैसे व एक आधारकार्ड आहे. ते ओळख पटवून घेऊन जा.'' मी तर माणगावला कधीच गेले नव्हते. अलीकडे कधी एसटी बसने प्रवासही झाला नव्हता. माझे पैशाचे पाकीट मी कुठे विसरले नव्हते. तरीही हा माझ्यासाठी का फोन असेल? मी विचारलेच, ""पण तुम्ही मला का फोन करता? मी माणगावला गेलेच नाही आणि माझे पैशाचे पाकीट हरवलेही नाही.'' त्या पाकिटात माझे नाव-पत्ता असलेले कार्ड होते. त्यावरून स्थानक प्रमुखांनी मला फोन लावला होता. मला कळेना. नावाचे कार्ड मी कोणाला तरी दिलेले असेन. त्याने ते पाकिटात ठेवलेले असेल. पण त्यावरून मालक कोण असेल हे शोधायचे कसे? अचानक आठवले व मी विचारले, ""त्यात आधारकार्ड आहे म्हणाला ना आपण? त्यावर कोणाचे नाव आहे?'' ते म्हणाले, "ताम्हनकर.'

त्या स्थानक प्रमुखांनी त्यांचा मोबाईल नंबर व आधारकार्डाचा फोटो व्हॉट्‌सऍपवरून पाठवला. ते आधारकार्ड पाहताना माझ्या लक्षात आले, की दोन दिवस आधी ताम्हनकर बाई त्यांच्या मोठ्या मुलाला व सुनेला घेऊन आल्या होत्या. ते सगळे मला आठवले. आधारकार्डाच्या फोटोवरून पत्ता मिळाला. माझा नातजावई सहकारनगरमध्ये राहतो. त्याच्याकडे पत्ता देताच त्याने घर शोधून ताम्हणकरांकडे जाधव यांचा फोन नंबर दिला. ताम्हणकरांना त्यांचे हरवलेले पाकीट परत मिळाले. ताम्हणकरांनाही जाधवांच्या प्रामाणिकपणाचे, धडपडीचे फार कौतुक वाटले! ताम्हणकरांना त्या पाकिटातील सर्व रक्कम व अन्य कागदपत्रे सुरक्षित सापडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by sumati samant