कार्यप्रवण शिक्षिका-प्रशासिका : डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी

Dr. Anjali Patwardhan-Kulkarni
Dr. Anjali Patwardhan-Kulkarniesakal

''खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अंजली पटवर्धन-कुलकर्णी. त्यांच्या व्यक्तित्वाचे कुशल प्रशासक, प्रयोगशील प्राचार्य, शैक्षणिक सल्लागार, साक्षेपी लेखक, अनुवाद्कर्त्या, श्रोत्यांचे केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन करणाऱ्या वक्त्या तसेच सुस्पष्ट वैचारिक भूमिका असणाऱ्या विचारवंत असे अनेक पैलू सांगता येतील. या सगळ्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्या अतिशय उत्तम व प्रभावी शिक्षिका आहेत. १९९० पासून एच. पी. टी कनिष्ठ महाविद्यालय ते पदव्युत्तर वर्गाना इंग्रजी साहित्य आणि भाषा अतिशय मनापासून शिकविणाऱ्या शिक्षिका- प्राध्यापिका म्हणून अंजली कुलकर्णी मॅडमला आजही त्यांचे विद्यार्थी ओळखतात. वर्गाच्या आणि विषयाच्या चौकटी मोडून आम्हा विद्यार्थ्यांना जगण्याचे तत्वज्ञान शिकवणाऱ्या मॅडम ज्ञानदानाच्या ४३ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांच्या कारकार्दीचा घेलेला हा संक्षिप्त आढावा." - डॉ. प्रणव रत्नपारखी (Muktapeeth Latest Marathi Article on Active Teacher Administrator Dr Anjali Patwardhan Kulkarni nashik news)

esakal

शिक्षणक्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या मॅडम

नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय सुखवस्तू आणि सुसंस्कृत कुटुंबात मॅडमचा जन्म झाला. त्यांचे वडील दत्तात्रय पटवर्धन हे इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीस होते. ते क्रिकेट उत्तम खेळत असत. आई प्रतिभा पटवर्धन साहित्यप्रेमी, लेखिका होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या, ज्या पुढे ‘कमलपत्र’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. कुलकर्णी मॅडमचे बालपण, प्राथमिक तसेच पदव्युत्तर शिक्षण नाशिक येथेच झाले. १९७९ मध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी पुणे विद्यापीठात एम.ए.पदवी संपादन केली आणि त्याच वर्षी गोखले एजुकेशन सोसायटीच्या एच. पी. टी. कनिष्ठ महाविद्यालयात त्यांची नेमणूक झाली.

पहिल्या काही वर्षातच मॅडम उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाल्या. २००६ सालापर्यंत त्या एच. पी. टी. महाविद्यालयात कार्यरत होत्या. या काळात इंग्रजी साहित्य, भाषा हे शिकविण्यासोबतच ‘फंक्शनल इंग्लिश’ हा युजीसी प्रणीत अभ्यासक्रम राबविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. याच काळात पी.एचडीचे संशोधन त्यांनी ‘स्त्री साहित्यात असणारा उपरोध’ या अतिशय वेगळ्या विषयावर पूर्ण केले.

१९९८ मध्ये मॅडमला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व तेथे जाण्याची संधी प्राप्त झाली. एच. पी. टी. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य, कॉलेज नॅकच्या समिती, पुणे विद्यापीठ अभ्यासमंडळ, मुक्त विद्यापीठासाठी लेखक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. मॅडममधील एक समृद्ध शिक्षका तसेच शिस्तबद्ध तरीही संवेदनशील प्रशासक जडणघडणीचा हा काळ होता.

esakal
Dr. Anjali Patwardhan-Kulkarni
स्त्रीच्या साहसाची सर्वार्थ गाथा : बाईची भाईगिरी

...सेकण्ड इनिंग

​​२००६ मध्ये गोखले एजुकेशन सोसायटीच्या न. ब. मेहता कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. नाशिकपासून १६० किमी अंतरावर असलेल्या डहाणुजवळ असणाऱ्या बोर्डीला त्याआधी मॅडम कधीही गेलेल्या नव्हता. नाशिकसारख्या प्रगतीशील भागात २७ वर्ष नोकरी केल्यानंतर मॅडमने आदिवासी बहुल भागात सेकण्ड इनिंग सुरु केली. अभ्यासूवृत्ती, परिश्रम घेण्याची तयारी आणि प्रत्येक आव्हानात संधी शोधण्याची सवय या अंगभूत गुणांमुळे मॅडमने अल्पकाळात मेहता कॉलेजमध्ये आपले स्थान तर निर्माण केलेच पण अनेक शैक्षणिक प्रयोगांना तेथे सुरुवात केली.

केवळ विज्ञान शाखा असणाऱ्या या महाविद्यालयात नंतर वाणिज्य शाखा नावारुपास आणण्यात मॅडमचा सिंहाचा वाटा आहे. विज्ञान शाखेतील संशोधन, प्राध्यापकांना पी.एचडी करण्यासाठी प्रोत्साहन, ग्रंथालय समृद्ध करणे, शैक्षणिक शिस्त निर्माणासाठी डायरी प्रकल्प, कॅम्पस सुशोभीकरण, कमी वीजेवर चालणारी संगणक लॅब अशा अनेक गोष्टी सुरु केल्या. जवळचे गाव दत्तक घेऊन तिथे कॉलेजच्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांमार्फत आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, महिला सबलीकरण याबाबत जागृती निर्माण केली.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मेहता महाविद्यालयास ‘सर्वोत्तम कॉलेज’ हा २०११ मध्ये मुंबई विद्यापीठाचा तर गोखले एजुकेशन सोसायटीचा आदर्श महाविद्यालयाचा पुरस्कार दोनदा मिळाला. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘जागर जाणीवा’ या सन्मानाने गौरविण्यात आले. कॉलेजला नॅककडून चांगले मानांकन प्राप्त झाले. गेल्या काही वर्षात डॉ. कुलकर्णी यांनी नॅकच्या कामातही सक्रीय सहभाग घेतला आहे.

महाविद्यालय मुल्यांकनासाठी मॅडम भारतभरातील कॉलेजला भेटी देत असतात. नुकत्याच तेलंगणा राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाची तपासणी करणाऱ्या समितीमध्ये मॅडमचा समवेश होता. त्याबद्दल मॅडमचा बंगरुळूच्या नॅक ऑफिसतर्फे विशेष सत्कारही करण्यात आला. गोखले एजुकेशन सोसायटीच्या स्टाफ ट्रेनिंग अकादमीच्या समन्वयकपदी देखील मॅडम सक्रीयरीत्या कार्यरत आहेत.

‘जे करायचे ते उत्तम झालेचं पाहिजे’

आधुनिक इंग्रजी साहित्य आणि विशेषतः अमेरिकन साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय. इलियट, येटस, विटमन, रॉबर्ट फ्रॉस्ट, इमिली डीकिन्सन यांसारख्या साहित्यातील अजरामर लेखकांच्या कलाकृतींना कुलकर्णी मॅडम वर्गामध्ये अक्षरश जिवंत करत असत. याचा अनुभव त्यांचा एम. ए. ला विद्यार्थी असताना मी स्वतः घेतलेला आहे. रॉबर्ट फ्रॉस्टची ‘डिझाईन’ ही केवळ १४ ओळींची कविता मॅडमने आमच्या वर्गात सलग सात दिवस म्हणजे घड्याळी १४ तास शिकवली होती.

त्या कवितेच्या अनुषंगाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक संदर्भ त्यांनी त्यांच्या शिकविण्यात आणले होते. हाच अनुभव हेमिंग्वेची ‘ओल्ड मॅन अॅन्ड सी’ किंवा टोनी मॉरिसनची ‘द ब्लुएस्ट आय’ ह्या कादंबऱ्या शिकवतांना देखील आम्हा विद्यार्थ्याना आला होता. साहित्यकृती शब्दामधून बाहेर काढून थेट तत्कालीन जगण्याशी जोडून दाखविल्याचे आज ही डोळ्यासमोर आहे. त्यावेळी साहित्याची काय ताकद आहे हे मॅडमच्या शिकविण्यातून समजलेच, पण त्या जागतिक दर्जाच्या साहित्यकृतीना विद्यार्थांच्या पातळीवर आणून, त्यातील असंख्य भाषिक, भावनिक, मानसशास्त्रीय पदर उलगडून दाखविणारा शिक्षक हा किती असामान्य आहे ह्याची जाणीव त्यांच्याकडे बघून होत होती.

esakal
Dr. Anjali Patwardhan-Kulkarni
समाजवास्तवाची मांडणी करणारा कवी : फ. मुं. शिंदे सर

नाटक, कविता, कादंबरी, लघुकथा आणि साहित्यिक समीक्षा हे साहित्याचे विविध प्रकार कुलकर्णी मॅडम अतिशय तन्मयतेने आणि तयारीने शिकवत. आज प्राध्यापक म्हणून काम करतांना मॅडमने त्यावेळी वर्गात शिकविलेल्या गोष्टी किती वेगळ्या होत्या हे लक्षात येते. त्यांच्या काळात आजसारखे इंटरनेट सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुस्तके, संदर्भग्रंथ वाचून नोट्स काढून मग वर्गात पाऊल ठेवायचे हा मॅडमचा शिरस्ता.

नोट्स काढण्यासाठी त्यांनी तयार केलेले पोस्टकार्ड्सच्या आकाराची कार्ड्स आम्हा विद्यार्थ्यांचा कुतूहलाचा विषय होता. कुलकर्णी मॅडमने आपल्या वर्गातील शिकविण्यामुळे आणि वागणूकीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ‘जे करायचे ते उत्तम झालेचं पाहिजे’ हा ध्यास त्यांनी शिक्षक म्हणून बाळगलाच आणि नंतर प्रशासक म्हणूनही.

चौकटी मोडून विद्यार्थ्यांना शिकविले जगण्याचे तत्वज्ञान

मॅडमने विद्यार्थी घडविले, सहकार्यांना प्रोत्साहन दिले, शैक्षणिक संस्थांना सक्षम आणि आधुनिक कसे करता येईल याबाबत कायमच प्रयत्नशील राहिल्या. या सोबत संशोधन लेखन आणि अनुवाद या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. आजवर त्यांनी १८ पुस्तके अनुवादित केली आहेत. घुमान येथील झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवादही त्यांनी केला होता.

सेवापूर्तीनंतरही मॅडम वाचन, लिखाण, संवाद, अनुवाद, प्रशिक्षण, यामध्ये गढलेल्या असणारच आहेत. वर्गाच्या आणि विषयाच्या चौकटी मोडून मॅडमने जगण्याचे तत्वज्ञान आम्हा विद्यार्थ्यांना शिकवले आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेमधली बर्चेसवरची चढ-उतर खऱ्या आयुष्यात करून दाखविली. साठ दशके आणि पाच वर्षं पूर्ण केल्यानंतर त्या नक्कीच शांत बसणार नाही. टेनिसनच्या युलिसिससारखीच नवीन क्षितिजे त्यांना खुणावत राहतीलच. - To strive, to seek, to find, and not to yield. मॅडमला उत्तम आरोग्य लाभो ह्या सदीच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

esakal
Dr. Anjali Patwardhan-Kulkarni
समाज सक्षमीकरणासाठी सरसावल्या महिला कीर्तनकार सुनीताताई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com