हरवले ते गवसले

- डॉ. नीलिमा घैसास
मंगळवार, 31 जानेवारी 2017

तो भास म्हणता येईल; पण सारे कसे नजरेसमोर उभे राहिले. गेले दोन दिवस सारे घर पालथे घातले; पण पासबुक सापडत नव्हते आणि अचानक तो भास झाला. त्या भासातच पासबुक दिसले आणि सापडलेही.

एखादा मेलोड्रामा असलेल्या चित्रपटातील वाटावी, अशी ही कथा आहे. नुकतीच पुण्यात घडलेली सत्यकथा!

तो भास म्हणता येईल; पण सारे कसे नजरेसमोर उभे राहिले. गेले दोन दिवस सारे घर पालथे घातले; पण पासबुक सापडत नव्हते आणि अचानक तो भास झाला. त्या भासातच पासबुक दिसले आणि सापडलेही.

एखादा मेलोड्रामा असलेल्या चित्रपटातील वाटावी, अशी ही कथा आहे. नुकतीच पुण्यात घडलेली सत्यकथा!

रमा - माधव (नावे बदललेली आहेत) हे सदाशिव पेठेत राहणारे जोडपे. माधवराव सरकारी अधिकारी. रमाताई मात्र पूर्णपणे घर पाहणाऱ्या; अतिशय प्रेमाने, जिव्हाळ्याने! पदरात दोन कन्यारत्न. माधवराव तसे रोज नियमितपणे व्यायाम करणारे. खाऊन- पिऊन सुखी असल्याने तब्येत अगदी ठणठणीत! एकदा ऑफिसमध्ये अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घामाने चेहरा डबडबून गेला. धाप लागली. एक उलटी झाली. सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब शेजारील रुग्णालयामध्ये नेले; पण तेथे पोचेपर्यंतच सर्व काही संपले होते. 

रमाताईंना शोक अनावर झाला. पण, अखेर मुलींकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरले. बाकी घर त्या पूर्वीसारखे चालवू शकत होत्या; पण आर्थिक बाजूचे काय? त्यात कधीच लक्ष न घातल्याने रमाताई पूर्णपणे गोंधळून गेल्या. त्या शिकल्यासवरल्या असल्या तरी कधीच बॅंकेचे व्यवहार पाहिले नव्हते. अगदी रडवेल्या झाल्या. अखेर त्यांनी माधवरावांचे एक जवळचे मित्र गोखले यांना फोन करून बोलावून घेतले. स्वतःचे अज्ञान न लपविता प्रामाणिकपणे रमाताईंनी सत्य परिस्थिती गोखलेंच्या पुढे मांडली. रमाताई व माधवरावांचा जॉइंट अकाउंट होता. या अकाउंटमध्ये एकत्रितपणे सर्व पैसे जमा होतील व मग रमाताईंना ते खाते ऑपरेट करणे सोपे जाईल, असे नियोजन गोखलेंनी केले. आता फक्त या बॅंक अकाउंटच्या पासबुकाची गरज होती, त्यासाठी रमाताईंनी माधवरावांचे कपाट शोधले. सगळी कागदपत्रे नीट फाइलीत होती. फक्त नेमके हेच पासबुक सापडत नव्हते. हतबलतेने त्यांनी बाकी सर्व घरातही पासबुक शोधले; पण कुठेही हे पासबुक मिळेना. खरे म्हणजे हे हरवले तर बॅंकेत याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते; पण रमाताईंना हेही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या अधिकच सैरभर झाल्या. उद्विग्न स्थितीत खिन्न होऊन बसून राहिल्या. 

बऱ्याच वेळाने रमाताई कशाबशा उठल्या. माधवरावांच्या हसऱ्या फोटोवरून त्यांनी प्रेमभराने हात फिरवला. गळा दाटून आला आणि त्यांचा सर्व संयम संपला. त्या ओक्‍साबोक्‍शी रडू लागल्या. रडता-रडता म्हणाल्या, ‘‘का हो मला एकटीला मागे टाकून गेलात? तुमचा आधारही नाही व दोन मुलींची जबाबदारी मात्र आहे. मला तर काहीच समजेनासे झाले आहे. दोन दिवस शोधते आहे, तरी पासबुकही सापडत नाही. तुम्हीच ठेवलेय ते; पण आता तुम्ही कसे सांगणार?’’ अखेर रडून-रडून त्या तशाच आडव्या झाल्या.

कितीतरी वेळ शून्यात बघत राहिल्या. आता मात्र मनात फक्त त्या पासबुकाचाच विचार होता. कितीतरी वेळाने त्यांचा डोळा लागला आणि काय आश्‍चर्य; हसरे, राजबिंडे, ताजेतवाने माधवराव त्यांच्या स्वप्नात आले, ‘‘अगं रमा, उठ बरं आधी. आपल्या बेडरूममध्ये जे गोदरेजचे कपाट आहे, त्यावर एक निळा प्लास्टिकचा ट्रे ठेवलेला आहे. त्यात बऱ्याच सीडीज आहेत. त्या सीडींच्या खाली हे पासबुक तुला मिळेल. काही काळजी करू नकोस. आणि हो, तुझा गुडघा दुखतो आहे नं. मग तू स्वतः स्टुलावर न चढता आपल्या मोठ्या मुलीला स्टुलावर चढून ते काढूदेत. अगं, जन्म-मृत्यू शेवटी त्या बाप्पाच्या हाती आहे. तुझा-माझा एवढाच सहवास होता, त्याला काय करणार? जेवढा काळ आपण एकत्र होतो तो खूप सुखाचा होता, समाधानाचा होता. आता दुःख न करता स्वतःला व मुलींना व्यवस्थित सांभाळ.’’

रमाताई ताडकन उठून बसल्या. माधवराव प्रत्यक्षात भेटून गेले अशी त्यांची ठाम समजूत आहे. त्यांनी गडबडीने थोरल्या मुलीला उठवले 
व कपाटावरील पासबुक काढून घेतले. खरेच ते अगदी तेथेच मिळाले!
एखाद्या गोष्टीचा, एखाद्या समस्येचा जेव्हा अतिशय कळकळीने आपण विचार करतो, त्यावरच आपला सर्व ‘फोकस’ राहतो, तेव्हा कोणत्या तरी रूपाने आपल्याला त्याचे उत्तर मिळते, त्या समस्येवरील उपाय सापडतो. आर्किमिडीजला त्याचे उत्तर हे बाथटबमध्ये मिळाले व ‘युरेका-युरेका’ करत तो तसाच उघडा पळत सुटला. बेंझीन रिंगचा शोध ऑगस्ट केकुलेला स्वप्नातच लागला. एखादे गणित खूप प्रयत्न करूनही जर जागेपणी सोडविता आले नाही, तर काही वेळा ते स्वप्नात सोडवता येते. तरीसुद्धा या सर्वांपेक्षा रमा-माधवची कथा थोडी ‘हटके’ आहे. आपल्या विज्ञानाधिष्ठित बुद्धीला या कशाचाच उलगडा होणे शक्‍य नाही. तेव्हा, थोडे भाबडे मन करून याचा विचार करू... कारण ही आहे अखेर एक सत्यघटना!

Web Title: muktpeeth artical dr. nilima ghaisas