प्रिय, दोन हजार सतरा

ज्योती उटगीकर देशपांडे
शनिवार, 31 डिसेंबर 2016

वर्ष येते अन्‌ जाते. काळाच्या वाहत्या प्रवाहातही काही गोष्टी खडकासारख्या टिकून राहतात, तर काही वाहत जातात, दृष्टिआड होतात. वर्षाच्या सरत्या क्षणी नववर्षाशी केलेला हा संवाद. 

तुला मुद्दामच सविस्तर पत्र पाठवत आहे. तुला पाठवले होते का कधी कुणी पत्र? बऱ्याच इच्छा,

वर्ष येते अन्‌ जाते. काळाच्या वाहत्या प्रवाहातही काही गोष्टी खडकासारख्या टिकून राहतात, तर काही वाहत जातात, दृष्टिआड होतात. वर्षाच्या सरत्या क्षणी नववर्षाशी केलेला हा संवाद. 

तुला मुद्दामच सविस्तर पत्र पाठवत आहे. तुला पाठवले होते का कधी कुणी पत्र? बऱ्याच इच्छा,

आशा-अपेक्षांसह हे पत्र पाठवते आहे. तसा तू चांगला वर्षभर मुक्कामाला राहशीलच!  खरं तर वेगवेगळी नवीन वर्षे येतात. आर्थिक वर्ष, शैक्षणिक वर्ष, व्यापारी वर्ष, पारसी वर्ष, शिवाय आमचे नवे वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते. ती आपापल्या परीने साजरीही होतात; पण तुझी गोष्टच वेगळी. 
तशी तुझ्या येण्याची चाहूल दिवाळी संपतासंपताच लागते. एकतीस डिसेंबर हा तर आमच्याकडे नवसण झाला आहे. दुकाने तर सजतातच; पण दूरचित्रवाणीवरही ‘न्यू इयर’चे नवनवे कार्यक्रम व त्यांच्या जाहिराती सुरू होतात. तशीही आम्हाला पाश्‍चात्यांच्या अनुकरणाची सवय आहेच. अर्थात, त्यांच्या चांगल्या गोष्टी उचलण्यात गैर काहीच नाही; पण अंधानुकरण नसावे. पूर्वी काही तुझे आजच्या इतके भव्य स्वागत करत नव्हतो; पण तरीही तू पूर्वी येताना काही ना काही नव्या गोष्टी घेऊन यायचास. कधी तंत्रज्ञानाच्या नव्या प्रगतीची झेप तुझ्या पोटात अन्‌ वास्तव्यात असे. कधी नव्या सरकारी योजना तू आणायचास. कधी नवी सामाजिक जाणीव देणारी कामे तू आमच्याकडून करून घ्यायचास अन्‌ त्याचे फळ आमच्याच ओटीत टाकून जायचास. अलीकडे मात्र काय बिघडलेय तेच कळत नाही. शेजारच्या माणसामाणसांतील नात्यानात्यांतील संबंध आणि जिव्हाळा संपवत आणलास तू. तुझ्या स्वागतासाठी खाणे, पिणे, गाणे असतानाही तू पूर्वीसारखा फार खुशीत दिसत नाहीस. फारशा चांगल्या भेटीही आणत नाहीस. तुझ्या बटव्यातून जादुई पोतडीतून आमच्यासाठी काय काय आणतोस, याकडे आम्ही लहान मुलांप्रमाणे नजर लावून बसलेलो असतो. या वर्षी तर नोटाबंदीमुळे काळा पैसा नव्या वर्षात बाहेर येईल अन्‌ भ्रष्टाचार संपेल, अशी आशाही आम्ही मनाशी बाळगत आहोत. थोड्या फार भौतिक सुखसोई आणतोस; पण त्याबदल्यात नात्यातील ओलावा नष्ट करतोस. दहशतवादाची छाया तर दरवर्षी गडद करतोस. बाह्य चकचकाट वाढला, तरी गरिबी-श्रीमंतीतली दरी रुंद होतच आहे. पळत्या काळाबरोबरच्या स्पर्धामय गतिमान आयुष्यात सुख, शांती हरवत चालली आहे. तू आम्हाला प्रसन्न का होत नाहीस?  
तुझा 
समस्त मानव परिवार

प्रिय मानव परिवारास,
तुमच्या प्रश्‍नांची उत्तरेच द्यायची म्हटले, तर सर्वांत प्रथम मला असे वाटते, की तुम्ही माझ्या स्वागताचे एवढे अवडंबर माजवू नये आणि खरे सांगायचे तर तू लिहिलेल्या पत्रात अन्‌ प्रश्‍नातच बरीचशी उत्तरे सामावली आहेत. मला पूर्वी तुम्ही साध्या फुलापानांनी आणि रांगोळ्यांनी केलेले साधे देशी स्वागतच आवडायचे. पूर्वी मी नवनवी सुखसोईंची साधने, वेगवान वाहने नि अनेक गोष्टी आणल्या; पण त्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि विज्ञानाचा वापर तुम्ही योग्यरीतीने करत नसाल, तर त्याला मी कसा जबाबदार किंवा ते विज्ञान तरी कसे जबाबदार? अणुशक्ती, संगणक, विविध संपर्क साधने या साऱ्यांचा वापर संहारासाठी, दहशतीसाठी करायचा, की लोककल्याणासाठी हे तुम्हीच ठरवायचे आहे. बेसुमार जंगलतोड, पाणीउपसा करण्याऐवजी माझ्या स्वागतासाठी हिरवाई उभी केलीत, तर मला जास्त आवडेल. नैसर्गिक साधनसंपत्ती, पेट्रोल, पाणी, लाकूड वगैरे किती प्रमाणात ओरबाडायचे, याचा तुम्ही कधी विचार करणार? समुद्रात भराव घालून त्याची किती जागा बळकावणार? सुनामी, अतिवृष्टी, बिघडत चाललेले ऋतुचक्र, वाढते तापमान हे सारे निसर्गाने तुम्हाला दिलेले इशारे आहेत. 
तुमच्या क्रीडा क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले अन्‌ राजकारणातले अनेक घोटाळे, लोककल्याणाच्या नावाखाली पैसे खाण्याच्या योजनाच जर तुमच्यातील चार लोक राबवत असतील, तर भ्रष्टाचार कसा संपणार? आता तुम्हीच सगळे सांगा, की पूर्वी तुमच्याकडे असणारी नीतिमत्ता, सचोटी, मेहनतीवृत्ती हे सारे गुण गेले कुठे? केवळ हौस, मौज, धांगडधिंगा, खाणे-पिणे ही सुखाची मर्यादित व्याख्या तुमच्या लेखी नव्हती. निसर्गाचा समतोल, गुणवंतांचा आदर, माणुसकी, समाजहित अशी किती तरी सद्‌गुण असणारी माणसे तुमच्यात होती. 

आता तरी जागे व्हा. संकल्प करा, की निसर्गाचा समतोल राखाल. कायदा, सुव्यवस्था ठेवाल, प्रामाणिकपणे सर्व कर भराल, नियम पाळाल. असे केलेत तर मीही तुमच्यासाठी सुख, समाधान, शांती, अशा अनेक भेटी घेऊन येईन. नव्या वर्षाचे खरेखुरे प्रॉमिस. 
तुमचा 
२०१७

Web Title: muktpeeth artical jyoti utagikar