ओढ 

प्रियांका कर्णिक
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

अंध लोकांच्या स्पर्शाच्या संवेदना आपल्यापेक्षा तीव्र असतात. कदाचित या अंध मुलीच्या जाणिवेत अगदी लहानपणी अनुभवलेला, तिच्या कुणा कुटुंबियाचा प्रेमळ स्पर्श रुतून राहिला असेल. त्या स्पर्शाची उणिव आता कळत्या वयात तिला प्रकर्षाने जाणवत असेल आणि कदाचित म्हणूनच निदान दुसऱ्या कुणाच्या प्रेमाच्या स्पर्शाच्या धाग्याने विणलेल्या कुटुंबात दोन दिवस राहण्याची तिची आंतरिक ओढ असेल. 

नॅशनल फाऊंडेशन फॉर ब्लाईंड्‌स, महाराष्ट्र, ही अंधासाठी, अंधांनी स्थापन केलेली संस्था. जागृती स्कूल फॉर ब्लाईंड गर्ल्स, आळंदी, हा या संस्थेचा, अंध मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चालू केलेला एक डोळस प्रयोग! 

जागृती स्कूलच्या उभारणीसाठी रोटरी क्‍लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी, रोटेरिअन म्हणून क्‍लबच्या वतीने, या शाळेच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. 

विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेऊन आकाराला आलेली शाळेची वास्तु, आजूबाजूचा प्रसन्न परिसर, डोळस मुलींच्या सफाईने कार्यक्रम सादर करणाऱ्या अंध विद्यार्थिनी या सगळ्यातून वातावरणात भरून राहिलेल्या सकारात्मक लहरी आमच्याही मनात झिरपत होत्या. पण तरीही त्या लहरींना छेद देणारा एक अस्वस्थ प्रश्‍न घेऊन मी तिथून बाहेर पडले. 

आम्ही निघायच्या वेळी, तिथल्या अंध शिक्षिकेने, शाळेतल्या एका अनाथ विद्यार्थिनीची, मनाला भिडणारी छोटीशी इच्छा बोलून दाखवली. आई-वडील किंवा कुणी जवळचे कुटुंबिय नसलेल्या त्या मुलीला दोन - चार दिवसांसाठी एखाद्या कुटुंबात राहायचं होतं. त्या कुटुंबाचं भावविश्‍व आपल्या आंतरिक संवेदनेने टिपून मनात आयुष्यभर जपून ठेवायचं हे तिचं हळवं स्वप्न होतं! तिची ही छोटीशी इच्छा, दुर्दैवाने एकट्याच राहणाऱ्या तिच्या त्या शिक्षिकाही पूर्ण करू शकत नव्हत्या. 

त्या मुलीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळेतल्या शिक्षिका आणि इतर सबंधित व्यक्ती अथक प्रयत्न करत होत्या. पण काळोख्या जगातून डोळस जगाच्या प्रवाहात उडी मारण्यासाठी तिला हवे होते आपल्या कुटुंबियांचे प्रेमळ आधार देणारे हात! 

अंध लोकांच्या स्पर्शाच्या संवेदना आपल्यापेक्षा तीव्र असतात. कदाचित या अंध मुलीच्या जाणिवेत अगदी लहानपणी अनुभवलेला, तिच्या कुणा कुटुंबियाचा प्रेमळ स्पर्श रुतून राहिला असेल. त्या स्पर्शाची उणिव आता कळत्या वयात तिला प्रकर्षाने जाणवत असेल आणि कदाचित म्हणूनच निदान दुसऱ्या कुणाच्या प्रेमाच्या स्पर्शाच्या धाग्याने विणलेल्या कुटुंबात दोन दिवस राहण्याची तिची आंतरिक ओढ असेल. 

काळोख्या जगात, आपल्या माणसाच्या प्रेळ आधारासाठी आसुसलेल्या त्या मुलीच्या पार्श्वभूीवर, मला आपल्यासारख्या भरल्या कुटुंबातील, घरातल्या प्रेमाच्या माणसांपासून, दिवसेंदिवस तुटत जाणारी आजची पिढी डोळ्यासमोर आली. नेटच्या माध्यमातून जगाशी संवाद साधणाऱ्या या मुलांचा कुटुंबातील "आपल्या' माणसांबरोबरचा सुसंवाद हरवत चाललाय. 

आजूबाजूच्या बेगडी झगमगटात वावरताना, कौंटुबिक प्रेमाचे धागे या मुलांना बंधनासारखे वाटतायत. भारताचा मानबिंदू असलेली कुटुंब व्यवस्था हळूहळू ढासळू लागली आहे. त्या अनाथ मुलीला तीव्रतेने जाणवणारी कुटुंबात राहण्याची ओढ त्यांना का जाणवत नाहीये? तिला कळत असलेली प्रेमाच्या स्पर्शाची ताकद आमच्या मुलांना का कळत नाहीये? की ती त्याच्यांपर्यंत पोचवण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडतोय? तसं असेल तर आम्हालाही गरज आहे एका "जागृती' अभियानाची!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical priyanka karnik