आजीचा तळवा (मुक्‍तपीठ)

प्रा. सतीश वाघमारे
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

आजी शिकली नाही, फुकटचं खायला नको म्हणून अखेरपर्यंत राबली. तिच्या कष्टावर आम्ही मोठे झालो. आम्ही शिकावं यासाठी ती धडपड करीत राहिली. तिला हा वसा कुठं मिळाला असेल?

- प्रा. सतीश वाघमारे

आजी झोपायची तेव्हा मी तिचा तळवा मोजायचो. जेमतेम माझ्या वितीत मावायचा. मग तो हळुवार दाबत मी विचार करायचो, किती हजार किलोमीटर या तळव्यांनी अनवाणी पायपीट केलीय? केवळ आपली आणि आपल्या भावंडांची टीचभर पोटे भरण्यासाठी. नुकतीच आपल्याला ओळख झालेल्या अक्षरांशी आपली ओळख पुसू नये यासाठी. बटूचा सर्वव्यापी तळवा आणि आजीचा सर्वस्पर्शी तळवा मला एकसारखेच भयंकर मोठे वाटायचे. बटूच्या तळव्याची भीती आणि आजीच्या तळव्याचा आधार. मी अजून जीव आणि पंजातली ताकद हलकी करत तो हळुवार दाबायचो. आजीला बहुदा ते आवडत असावं. ती झोपेत सुखासीन सैल व्हायची. घोरण्याचा आवाज टिपेला लागायचा. 

ही आजी. आईची आई. लेकीचं लग्न झाल्याबरोबर महिनाभरात नवरा मेल्यावर लेकीकडे म्हणजे माझ्या आईजवळ आलेली आणि पावण्याजवळ आयतं कसं खायचं, म्हणून काष्टा बांधून पुण्यातल्या वाड्यावस्त्यांत अन्नावारी अमोल कष्ट विकीत फिरलेली. सदाशिव पेठेतला गाईचा वाडा, चोळखण आळी, बुधवार पेठ ही आजीची काम करण्याची ठिकाणं. दर रविवारी आम्हा भावंडात आजीबरोबर तिच्या कामावर जाण्यासाठी स्पर्धा, भांडणं असायची. कारण फक्त आजीचे नातू म्हणून मिळणारा तिथल्या मालक लोकांचा गोड मुरांबा, दोनाची वा पाचाची नोट आणि एखादं हंगामी फळ. बस्स! तेवढ्यासाठी आजी त्या दिवशी, रोजच्या पेक्षा अधिक झडझडायची. तिच्या सोबतची आमची उपस्थिती त्यांच्यासमोर अधिक डोळाभर दाखवायची. 

आजीत आणि पावण्यात म्हणजे आमच्या बापात जवळीक म्हणजे, एकमेकांनी जेवण केलं का? हे तिऱ्हाईताजवळून जाणताना होकार मिळवण्याइतपतच एकमेकांप्रती चिंतेची बाब असणारी गोष्ट असायची. बाकी बोलाचाल काही नाही. 

आजीनं आयुष्याची पंचवीस वर्षं पुण्यातल्या वाड्यात, बंगल्यात देहाचं झाडवन केलं. त्या वेळच्या पुण्यातल्या सदाशिव, शनिवार, बुधवार पेठेतल्या चकचकीत रस्त्यांना आजीच्या कष्टाची सुंदर रांगोळी लाभलेली असायची. तिच्या घामावरच आमच्या दंडाच्या बेंडकुळ्या फुगल्या.

डोक्‍यातल्या मेंदूची कुशाग्र म्हणून मशागत झाली. ती इतकी इमानी की कामासाठी काम कधी करीत नव्हती. पण तिच्या श्रमाची, कष्टाची आम्हाला लाज वाटू लागली असावी. ज्या गाईच्या वाड्यात जाण्यासाठी आम्ही भावंड एकमेकांशी भांडायचो, तिथं नंतर नंतर कॉलेजात शिकताना तिच्यासोबत जाण्याची लाज वाटू लागली. रस्त्यात ओळख दाखवायचं टाळू लागलो आम्ही. मी प्राध्यापक झाल्यावर, त्याच लोकांना लेकीच्या वंशाची वाढलेली शैक्षणिक वेल दाखवायला एक दिवस मला घेऊन गेली. पण त्यासाठीही मी किती मोठ्या मिनतवाऱ्या करायला लावल्या तिला. पण ते विसरून वाड्यातल्या त्या लोकांनी केलेल्या माझ्या कौतुकात बुडून गेली. 

पुन्हा पुन्हा आता काम बंद कर म्हटलं तर हो म्हणायची. पण हळूच डोळा चुकवून जायची. का, असं विचारलं, तर ताईंना भेटाय बोलाय जावं वाटतंय म्हणायची. तिची तिथल्या माणसात गुंतलेली माणुसकी जाणून आम्ही तिला जा म्हणायचो. पण येताना काही आणू नकोस असं बजावून सांगायचो. तरी त्यांना न दुखावता त्यांनी दिलेलं काही खायचं आजी घेऊन यायचीच आणि गेल्याबद्दल मला न चुकता दहा रुपये दंड द्यायची. वर आणलेला खाऊ खायचा आग्रह. 

आजी यथावकाश मेली. माझ्या पगारातल्या काही रुपड्यात तिच्या वितभर तळव्यासाठी मुलायम आरामदायी चप्पल घ्यायची संधीसुद्धा मला न देता गेली. माझ्यासाठी नवा बूट घेताना अजून मला आजीचा अनवाणी तळवा दिसतो. बुधवारपेठेजवळून कधीही जाताना, कितीही देखणा चेहरा पाहिला तरी नजर उचलून भिडत नाही. कोणत्याही खिडकीशी रेंगाळत नाही.

आजीशी गुजगोष्टी केलेल्या आणि हातावर पाच रुपये टेकवलेल्या बायका लख्ख आठवतात. त्यांनी घेतलेले मुके आठवतात आणि नजर पुन्हा रस्त्याला खिळते. मी झपझप चालू लागतो. आजीला महिला म्हणून स्वतःचे कुठले हक्क कसे बरं कळले नसतील कधीच? तरीही आम्ही अक्षरपारखे होऊ नये हा सावित्री माउलीसारखा ध्यास बाळगला. आम्ही आंबेडकरबाबांसारखं शिकून मोठं व्हावं, असा वसा कुठल्याही शाळेत न जाता तिला कुठून मिळाला असेल? 
मला आताही तिचा तळवा आठवतो.
सर्वस्पर्शी ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical satish waghmare