हिंस्र व्हावे, की सुसंस्कृत?

डॉ. पद्माकर रा. दुभाषी
गुरुवार, 26 जुलै 2018

प्रक्षुब्ध जमावाच्या हिंसक कृती पाहताना मनात येते, की आपल्याला हिंसक बनायचे, की सुसंस्कृत? 

प्रक्षुब्ध जमावाच्या हिंसक कृती पाहताना मनात येते, की आपल्याला हिंसक बनायचे, की सुसंस्कृत? 

माझ्या प्रशासकीय जीवनात एका प्रक्षुब्ध जमावाच्या तावडीत सापडण्याची एक घटना घडली. मी बेळगावला विभागीय आयुक्त होतो. धारवाड जिल्ह्यातील गदगमधील ईदगाहलगतच्या जमिनीवरचे बेकायदेशीरपणे अतिक्रमण हटवावे, असा अर्ज आला होता. तत्कालीन महसूलमंत्र्यांनी त्या अर्जावर शेरा मारला, की विभागीय आयुक्तांनी ‘स्पॉट इन्स्पेक्‍शन’ करून अहवाल पाठवावा. खरे तर तहसीलदाराने भेट देऊन अहवाल पाठवला तरी चालले असते. परंतु, महसूलमंत्र्यांनी स्पष्ट शेरा लिहिल्याने मला जाणे भाग होते. नगराध्यक्ष, ईदगाहचा मुत्तवल्ली व पालिकेतील आणखी तीन-चार लोक या भेटीच्या वेळी उपस्थित होते. मी स्थळाची पाहणी केली. योग्य त्या निष्कर्षाप्रत आलो. पाहणी केल्यानंतर मी नगराध्यक्षांना बरोबर घेऊन मोटारीमध्ये बसलो व जाण्यास निघालो. 

एकाएकी काही मंडळी जमा झाली आणि त्यांनी मोटारीला घेराव घातला. ‘मुत्तवल्लीला अटक करा,’ अशी त्यांची मागणी होती. ती मागणी मान्य करून मुत्तवल्लीला ताबडतोब अटक करणे योग्य नव्हते. मी व नगराध्यक्षांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संध्याकाळच्या सुटीनंतर अनेक विणकर लोक सामील झाले. जमाव अधिकाधिक आक्रमक होऊ लागला. गाडीवर लाथा-बुक्‍क्‍या मारू लागला. एक जण म्हणाला, ‘गाडी पेटवून द्या.’ तेथून थोड्याच अंतरावर एक पोलिस शिपाई उभा होता. परंतु जमावाला पाहून तोही पसार झाला. वास्तविक विभागीय आयुक्त ईदगाहला भेट देणार, हे माहीत असताना पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवणे आवश्‍यक होते. त्यांनी दाखवलेला हलगर्जीपणा अक्षम्य होता. तेवढ्यात मी अनपेक्षित निर्णय घेतला.

मोटारीचा दरवाजा उघडला व जमावातून मार्ग काढत थेट पुढे चालत राहिलो. नगराध्यक्षही माझ्या मागून आले. मी चालत चालत डाक बंगल्यापर्यंत पोहोचलो. मला ड्रायव्हरची काळजी वाटत होती. पण, मी गेल्यानंतर जमाव पांगला. थोड्याच वेळात ड्रायव्हरही डाक बंगल्यावर आला. आताही अशा काही घटना ऐकल्या, की ही आठवण जागी होते. वाटते, आपल्याला हिंस्त्र समाज बनायचे आहे, की सुसंस्कृत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Dr. Padmakar Dubhashi