भिंतीपल्याडची ‘चिनी माती’

गौरी देशपांडे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

चीनच्या प्रचंड भिंतीपलीकडे काय असेल? आता व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने चीनमध्ये भारतीय जा-ये करीत असले तरी उत्सुकता कायम आहे. एका युवतीने अनुभवलेला चीन तिच्या शब्दांत.

शांघायमधले चांगशू स्टेशन. दुपारचा एक वाजला होता. मेट्रो पीपल्स स्क्वेअरकडे निघाली होती आणि मी हताशपणे स्टेशनवर राहिलेल्या माझ्या सामानाकडे बघत होते. अनोळखी देशात पासपोर्ट गमावणे ही कित्येकांची भीती मी स्वतः अनुभवत होते. आता पुढचा थांबा येईपर्यंत काही करणे शक्‍यच नव्हते. गेला महिनाभर मी चीनमध्ये होते. 

चीनच्या प्रचंड भिंतीपलीकडे काय असेल? आता व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने चीनमध्ये भारतीय जा-ये करीत असले तरी उत्सुकता कायम आहे. एका युवतीने अनुभवलेला चीन तिच्या शब्दांत.

शांघायमधले चांगशू स्टेशन. दुपारचा एक वाजला होता. मेट्रो पीपल्स स्क्वेअरकडे निघाली होती आणि मी हताशपणे स्टेशनवर राहिलेल्या माझ्या सामानाकडे बघत होते. अनोळखी देशात पासपोर्ट गमावणे ही कित्येकांची भीती मी स्वतः अनुभवत होते. आता पुढचा थांबा येईपर्यंत काही करणे शक्‍यच नव्हते. गेला महिनाभर मी चीनमध्ये होते. 

संध्याकाळी नेहमीच्या जागेवर जमलेलो असताना योगीशने त्याच्या चीनच्या प्रवासाचे वर्णन केले. तो नुकताच तिथून परत आला होता. तिथले लोक, त्याचा प्रवास, तिथली संस्कृती ऐकताना मला एकदम वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटत होते आणि अचानक त्याने विचारले, ‘‘कोणाला चीनला जायचेय का?’’ चीन सरकारने आयोजित केलेल्या प्रकल्पाची माहिती त्याने दिली. निवड झाली तर हा प्रकल्प पूर्णपणे प्रायोजित होता. मी अर्ज केला आणि मला मुलाखतीसाठी बोलावणे आले. माझी निवड झालीसुद्धा.

अर्ज करताना न केलेले विचार आता डोक्‍यात घर करू लागले. उत्सुकता आणि साशंकता या दोन्ही भावना मनात एकदम निर्माण झाल्या. एकीकडे टीव्हीवर येणाऱ्या बातम्या, दोन देशांमध्ये निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि दुसरी त्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल नवीन अनुभवांबद्दल वाटणारी ओढ याने मी साशंक झाले, पण शेवटी उत्सुकताच वरचढ ठरली.
मुंबई ते शांघाय विमान प्रवास आणि शांघाय ते जिन्हुवा हा थकवणारा बस प्रवास करून आम्ही जिन्हुवा गावात पोचलो. जिन्हुवा शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोयुआन गावात आमची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे राहून आसपासच्या गावांना भेट देऊन चिनी संस्कृती, कला, राहणीमान, ऐतिहासिक गोष्टी यांचा अभ्यास करून त्यावर लेख लिहिणे हे प्रकल्पात आम्हाला दिलेल्या सगळ्या कामांपैकी एक महत्त्वाचे काम.

सोयुआनमध्ये गेल्यावर आता पाठ टेकायला मिळणार या विचारात असतानाच गावात आम्ही प्रवेश केला आणि सगळा शीणच निघून गेला. आमच्यासाठी सजवलेले ते गाव आणि आमचे स्वागत याने झोप कुठल्या कुठे पळाली. नेमून दिलेल्या घरामध्ये गेल्या गेल्याच, माझी ओळख आमच्या ‘आई’शी झाली. मॅन्डरिन भाषेमध्ये ‘काकू’ला ‘आई’ असे म्हणतात.

वेगळा प्रांत, वेगळी माणसे, वेगळी भाषा असूनही ‘आई’ या शब्दामुळे मला घरात आल्यासारखे वाटले. रात्री आईने आम्हाला जेवायला बोलावले आणि चीनमधला माझा पहिलाच ‘वेलकम डिनर’ म्हणजे झुरळ, साप, मुंगळे, बदक, लापशी असा होता. आपण स्वतःला कितीही मांसाहारी म्हणत असलो, तरीही चीनमध्ये जाऊन अशा गोष्टी खायचे धाडस क्वचितच कोणीतरी करू शकेल. त्या रात्री मी दाणे व लापशी खाऊन भूक भागवली आणि ‘संरक्षित क्षेत्रातून बाहेर पड, गौरी’, असे स्वतःला बजावत झोपले.

पुढच्या दिवसांमध्ये आमची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने चालू झाली आणि चीनचे वेगवेगळे पैलू मला कळत गेले. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गटात काम केल्यामुळे सर्व सहकाऱ्यांशी माझी चांगली ओळख झाली. विविध देशांतून आलेले लोक, त्यांची संस्कृती, जीवनशैली, भाषा, स्वभाव मला जवळून जाणून घेता आले. याचबरोबर चीनमधील सर्वांत प्रभावी धर्म तत्त्वज्ञान ताओ इझमशी जवळून ओळख झाली. ताओ टेम्पलमधल्या दोन दिवसांच्या वास्तव्यात माझी एका रशियन मुलीशी झालेली मैत्री, जंगलात फेरफटका मारताना झालेल्या आयुष्याबद्दलच्या गप्पा ही माझ्या प्रवासातली गोड आठवण आहे.

हांगझाऊ हे तर ‘हरित शहर’ म्हणून ओळखले जाते. तिथले वातावरण, तिथली झाडे, तिकडचे सरोवर, रोज जेवताना माझी चॉप स्टिक बरोबर चाललेली लढाई आणि त्यावर मिळविलेला विजय, माझ्या कोषातून बाहेर पडून चाखलेले विविध पदार्थ म्हणजे पोर्क, डक, मुंगळे इत्यादी, नेत्र दीपवणारे शांघाय, तिथले राहणीमान, डिस्ने लॅंड आणि तिकडे आलेले अनुभव हे शब्दांकन करणे काहीसे अवघड आहे. 

या सगळ्या आठवणींची दृश्‍ये डोळ्यासमोरून जात असतानाच मेट्रो स्टेशनवर थांबली आणि मी भानावर आले. इतका वेळ ‘रेंज’ नसल्यामुळे बंद असलेला माझा फोन अचानक वाजू लागला आणि डेव्हिडच्या आवाजाने माझ्या जिवात जीव आला. डेव्हिड हा अमेरिकी मुलगा त्या प्रकल्पामधला माझा सहकारी. माझ्या ‘आई’च्या घरात तो देखील राहत होता. आम्ही दोघे शांघायमध्ये बुलेट ट्रेनमधून मेट्रोमध्ये जात असताना मेट्रोचा स्वयंचलित दरवाजा अचानक बंद झाल्यामुळे माझी बॅग बाहेर उभ्या असलेल्या डेव्हिडकडे राहिली. फोनवर आम्ही एका मधल्या स्टेशनवर भेटायचे ठरवले आणि माझी बॅग त्याने तिकडे सुखरूप आणून दिली. तरीही, तो दरवाजा बंद होत असताना त्या अमेरिकी मुलाकडे बघणारी माझी असहाय नजर आणि त्याच्या हातात दिसणारी माझी बॅग मला आयुष्याचे शहाणपण शिकवून गेली !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article gauri deshpande