ई-पॅरेटिंग (मुक्‍तपीठ)

Prakash-Naik
Prakash-Naik

माझा मुलगा त्याच्या कुटुंबासह जपानमध्ये असतो. एकदा रात्री त्यांच्या एका मित्राने माझ्या मुलाला त्याच्या घरी कॉफीसाठी बोलावले. तिकडे रात्रीचे अकरा वाजले असतील. मुलांना घरीच ठेवून ती दोघे मित्राकडे गेली. जाता जाता माझ्या मुलाने आम्हाला इकडे पुण्यास फोन केला. तेव्हा इथे संध्याकाळचे साडेसात वाजले होते. त्याने सांगितले, की ‘त्याची मुले वरती रूममध्ये एकटीच आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला, म्हणजे त्यांच्यावर लक्ष राहील व ते कंटाळणार नाहीत. शिवाय एकटेपणा वाटणार नाही.’ मग आम्ही दोघे पुण्यातून स्काइपवर नातवंडांशी बोलू लागलो. मुलांशी गप्पा मारता मारता आमचा साडेतीन वर्षांचा नातू नील म्हणे, ‘आबा, माझे लग्न लावा की!’  तो तिथे सध्या संभाजी महाराजांची मालिका बघत असतो व त्या मालिकेत राजाराम महाराजांचे लग्न दाखवलेले होते. तेच पाहून त्याला लग्न करायचे होते. तो काही वेळा संभाजीराजे (शंभूबाळ) किंवा बाळराजे होतो व आईला ‘मातोश्री’ तर, सानिकाला ‘अक्कासाहेब’ आणि वडिलांना ‘आबासाहेब’ म्हणून हाका मारत असतो. ‘आबासाहेब अजून ऑफिसमधून का आले नाहीत?, असे विचारत असतो. याउलट सानिकाचे. ती म्हणे, ‘आबा मला लग्नच करायचे नाही.’ कारण मराठी किंवा हिंदी मालिकांतून सासू, सुना, नणंदा किंवा इतर बायकांचे एकमेकींबद्दल वागणे व केलेली कुरघोडी पाहून तिला लग्न न करण्याचे डोक्‍यात आले आहे.

आमच्या या गप्पांमध्ये अर्धा-पाऊण तास सहज निघून गेला, कळलेही नाही. आम्ही पुण्यात राहून जपानमधील नातवंडांची काळजी घेतली, त्यांच्यावर आई-वडिलांच्या गैरहजेरीत लक्ष ठेवले. हेच ‘ई-पॅरेटिंग’ असावे. आजी-आजोबांना नातवंडांशी बोलायला, खेळायला आवडत असते. परंतु नोकरीच्या निमित्ताने मुले परदेशी जातात आणि त्यांच्या बरोबर त्यांचे पूर्ण कुटुंबसुद्धा; पण तंत्रज्ञानामुळे आपण सर्वच जण अगदी जवळ आहोत असे वाटते. नाहीतर मी चाळीस वर्षांपूर्वी दुबईला असतानाचे उत्तम उदाहरण म्हणजे मी दुबईवरून परतलो तर माझा दीड वर्षाचा मुलगा ‘डॅडी कुठेय’ असे विचारले की मलाही माझाच फोटो दाखवायचा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com