तो क्षण मोलाचा!

डॉ. पुष्पा भाग्यवंत
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पालकांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, म्हणून ती आत्महत्या करणार होती; पण आता ती उच्च पदावर काम करते आहे.

पालकांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, म्हणून ती आत्महत्या करणार होती; पण आता ती उच्च पदावर काम करते आहे.

औरंगाबादमध्ये मी एका समुपदेशन केंद्रावर कार्यमग्न होते. बाहेर एकदम गलका ऐकू आला. एक जण धावत आला. म्हणाला, ‘‘मॅडम बाहेर या.’’ पाहते तर, बारावीची गुणपत्रिका हातात असलेली एक विद्यार्थिनी मोठमोठ्याने ओरडत होती, ‘‘नाही, नाही, मी घरी जाणारच नाही. मला नाही जगायचं. माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. आई-वडिलांना कसं तोंड दाखवू?’’ बेभान होऊन बडबडत होती. नेमके हिच्याशी कसे बोलावे, असा क्षणभर विचार केला. तिला प्रथम आत घेतले व माझ्याजवळ बसवले. ती कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मी तिच्याशी न बोलता फक्त तिच्याकडे लक्ष ठेवून होते. तिला पाणी-सरबत दिले. मी पालकासह आलेल्या पाल्यांना समुपदेशन करत होते. मात्र लक्ष तिच्याकडे होतेच. ती हळूहळू शांत होत होती. तिचे आता आमच्या संवादाकडे लक्ष होते. 

जवळपास तासाभराने ती स्वतः म्हणाली, ‘‘मला तुमच्याशी बोलायचंय.’’ दुसऱ्या क्षणीच ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. थोडी शांत झाल्यावर बोलायला लागली. ‘‘मला घरी नाही जायचं. नाही मी माझ्या आई-वडिलांना मार्कशीट दाखवू शकत. त्यांनी माझ्यासाठी किती पैसा, मेहनत, वेळ खर्च केला. त्यांना माझ्याकडून खूप खूप गुणांची अपेक्षा होती. मी नाही पूर्ण करू शकले.’’ बरेच काही ती बोलत होती. मी शांतपणे ऐकून घेत होते. तिचे बोलून झाल्यावर तिच्या आईला फोन करून बोलावून घेतले. समोर मुलीला पाहताच आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. ती घाबरून पुन्हा रडू लागली. तिला आई-वडिलांनी धीर दिला. मग आम्ही विषयाच्या निवडीसाठी मदत केली. मी जेथे अध्यापन करत होते, तेथेच प्रवेश घ्यायचे ठरले. तिने पुढे पदव्युत्तर शिक्षणही चांगल्या गुणांनी पूर्ण केले. उच्च पदावर गेली. आयुष्य संपवायला निघालेली एक मुलगी जगण्याचा आनंद घेताना दिसते, तेव्हा एका शिक्षकाला आणखी काय मिळायचे राहिलेले असते! 

Web Title: muktpeeth article pushpa bhagyawant

टॅग्स