आईचे मन 

लता शेलूडकर-व्यास
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुलासोबत काशीयात्रा करावी, ही आईची तीव्र इच्छा सफल झाली. या इच्छेआड आलेल्या अडचणी आपोआप दूर झाल्या. 

गाडी सुटायला पाच मिनिटे असताना शेजारच्या फलाटावर लोणावळ्यावरून येणारी लोकल आली. माझा भाऊ समोर उभा होता. आम्ही सगळ्यांनीच आनंदाने आरोळी ठोकली. काशीला जायचे, असे माझ्या भावाने व बहिणीने ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी गाडीचे आरक्षण आधीपासूनच करून ठेवले होते. माझ्या आईला आपल्या मुलांसोबत काशीला जायची खूप इच्छा होती व ती आता पूर्ण होणार होती.

बहिणीच्या सासूबाईही येणार होत्या. माझा लहान भाऊ आय.एन.एस. शिवाजी, लोणावळा येथे "सिव्हिलियन नेव्ही'मध्ये होता. काशीला जायच्या थोडे दिवस आधी मंत्रालयाकडून कळवण्यात आले की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बढतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. जे अधिकारी या बढतीसाठी पात्र आहेत, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी होती. ही परीक्षा नेमकी ज्या दिवशी ते काशीला जाणार होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत होती. त्यामुळे भाऊ काशीला जाऊ शकत नव्हता. 

माझ्या वहिनीने प्रवासाची तयारी सुरूच ठेवली. माझ्या आईनेही तिला साथ दिली. मनातून त्यांना थोडी हूरहूर वाटत होती. तरीही त्यांनी तसे काही न दाखवता तयारी केली. माझ्या वहिनीने भावासाठी मुंबईवरून काशीसाठी विमानाचे तिकीट उपलब्ध आहे का, याचीही चौकशी केली होती; पण ते मिळाले नाही. ते निघाले, तेव्हा आम्ही सगळे त्यांना सोडायला पुणे स्टेशनवर गेलो होतो. गाडी सुटायला पाच मिनिटे असताना शेजारच्या फलाटावर लोणावळ्यावरून येणाऱ्या लोकलमधून माझा भाऊ उतरला. हातात छोटी बॅग. त्यात दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचे म्हणून थोडे कपडे घेतले होते. आपल्या या मुलाने आपल्यासोबत काशीला यावे, ही आईची इच्छा सफल होणार होती. अचानक परीक्षा रद्द झाल्याने भाऊ आला होता. त्यांची काशीयात्रा सुखरूप व आनंदाने झाली. तसेच माझ्या भावाला परीक्षा न देताच बढतीही मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article in sakal