अबलोलीचे गाणे

Vilina-Inamdar
Vilina-Inamdar

ते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे.

घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे आम्ही शिबिरार्थी अबलोलीत पोचलो. येथे निसर्गानेच गानमैफल आयोजित केली होती. चहूबाजूला वाड्यांवर नारळ-पोफळी, काजू, आंबा रस्त्याच्या दुतर्फा किंजळ, आईन, धावडा नेत्रसुख देत होते. रिसॉर्टच्या छायेत अस्सल कोकणी पाककृतींना आम्ही भरभरून दाद देत होतो. पक्षीतज्ज्ञ किका म्हणजे चालता-बोलता ज्ञानकोशच. आमच्या ज्ञानात क्षणाक्षणाला भर घालत असे. दुर्बिणी, अभ्यास टाचणे, कॅमेरे सगळ्या सामग्रीनिशी जंगलात मैफल ऐकायला गेलो होतो.

निसर्गदूतांच्या आलाप, ताना, कधी जुगलबंदीने कानसेनाची भूमिका बजावत होतो. काळ्या भुवईचा खाटीक, टकाचोर, वेडा राघू, हरियाल, तांबुला, भारीट, तुतारी सगळे जण गायला सज्ज झाले. कातळाच्या रंगाचा रातवा व सागाच्या झाडावरच्या मत्स्य घुबडाने वातावरण शांत केले. तांबटाची पुक पुक... टिपेची आलापी तर, सुभगाची किकाबरोबर शूक-सारिका प्रलापन म्हणजेच जुगलबंदी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्याचा आनंद देऊन गेली.

वाकी नदीवर भेटलेल्या कुईचिर्र... आवाजातील खंड्याची बोलताना व त्याने घेतलेली भरारी मनाला उभारी देऊन गेली. नाष्ट्यासाठी भेरली माडावर आलेली सोनेरी सुतारीण उन्हात मनसोक्त न्याहाळता आली. माळरानावर भेटलेला हुदहुद व डौलदार तुऱ्याच्या चंडोलाच्या शीळेला आधी ऐकले व नंतर पाहिले. विजेच्या तारेवर बसून तारवाली (स्वॅलो) पती-पत्नी खर्जात स्वर लावत होते. वडाच्या लालबुंद फळांवर ताव मारणारा धनेश ट्रॉक, ट्रॉक करून इतर गवयांना मस्त साथसंगत करत होता. कंठेरी वटवट्यांची सरगम वातावरणात रंग भरत होती. शिपाई बुलबुलचे स्वर तीनही सप्तकात लीलया फिरत होते. झऱ्याच्या काठी पांढऱ्याशुभ्र पोशाखातील स्वर्गीय नर्तकाने सहजसुंदर मुरकी घेतली. नीलपंखाने आपल्या पंखांचा पदर पसरवून रंगभांडार आमच्यासमोर रिते केले. मात्र तिबोटी खंड्याने मनाला खूपच हुरहुर लावली अन्‌ मोरपिशी निळ्या कानाच्या खंड्याने मैफलीत भैरवीचे सूर भरले. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग... अन्‌ क्षणात घरट्याकडे झेपावलासुद्धा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com