सायकलींचे दिवस

suresh pore
शुक्रवार, 17 जून 2016

सायकल-सफरीचे ते जुन्या पुण्यातले दिवस मी अत्तराच्या कुपीसारखे जपून ठेवले आहेत मनात.. शेजारून भुर्रदिशी किणकिणती घंटी वाजवत एखादी लेडीज्‌ सायकल गेली, तर गार हवेची झुळूक आल्यासारखं वाटायचं!

सायकल-सफरीचे ते जुन्या पुण्यातले दिवस मी अत्तराच्या कुपीसारखे जपून ठेवले आहेत मनात.. शेजारून भुर्रदिशी किणकिणती घंटी वाजवत एखादी लेडीज्‌ सायकल गेली, तर गार हवेची झुळूक आल्यासारखं वाटायचं!

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याच्या चौकाचौकांत, घराघरांत, अंगणांत दिसणाऱ्या सायकली आणि चिमण्या गेल्या कुठे? सर्वांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसवर चालणारी वाहनं इतकी परवडू लागली आहेत, की सायकली कधी दुर्मिळ झाल्या, ते कळलंच नाही! पुण्यात बऱ्याच ठिकाणी "सायकल-मार्ग‘ भरपूर खर्च करून बांधलेले दिसतात; पण त्यावर सायकली कधीच दिसत नाहीत. खडकीतली ऍम्युनिशन फॅक्‍टरी, जुना पुणे-मुंबई महामार्ग अजून आठवतो. पहाटे आणि संध्याकाळी हजारो कामगार सायकलींना डबे अडकवून शिस्तीनं जाताना दिसायचे. पुण्यात मंडईजवळचे सायकल स्टॅंड तर जणू नदीसारखे सायकलींनी दुथडी भरून वाहायचे. कुठं गेले ते दमदार सायकलस्वार? सायकलीच्या चाकात हवा भरायला रुपया पुरायचा. तासाभरात पुणं सहज पालथं घालता यायचं. माफक खर्च, छानसा व्यायाम! तोल सावरत केली जाणारी ती सायकल सफर मी अत्तराच्या कुपीसारखी जपून ठेवलीय मनात.. शेजारून भुर्रदिशी किणकिणती घंटी वाजवत एखादी लेडीज्‌ सायकल गेली, तर गार हवेची झुळूक आल्यासारखं वाटायचं!

टाहो फोडून विचारावंसं वाटतं की, "तो बिनखर्ची प्रवास अदृश्‍य का झाला? कुणी तरी सांगा मला!‘ लाखाच्या घरात गेलेल्या, सतत पेट्रोल खाणाऱ्या, वजनदार आधुनिक मोटारसायकली, स्कूटर आता रस्त्यावरून सैरावैरा धावतात दिसतात. डोक्‍यावर ते घमेल्यासारखं हेल्मेट! आतला माणूस कुणाला ओळखता येईल, तर शपथ! असल्या दणकट वाहनाचा बारीकसा धक्का लागला, तरी हाडं तुटण्याची खात्रीच. आमच्या काळातल्या सायकली त्या मानानं बऱ्या. एक तर सायकलींचा धक्का सहसा लागत नसे अन्‌ चुकून लागलाच, तरी किती साधा, कोवळा, गोड असायचा! पंचवीस वर्षांपूर्वी मी एक सायकल-अपघात पाहिला होता. दुपारची वेळ. रस्त्यावर गर्दी नव्हती. एक ढेरपोट्या पायजमा-शर्टवाला फेंगड्या चालीनं चालला होता. तेवढ्यात सायकल शिकत असलेली एक मुलगी समोरून आली. कसा कोण जाणे, पण तिचा तोल गेला. हॅंडल सांभाळत ती पुढे पुढे वेडीवाकडी आली. सायकलचं चाक त्या माणसाच्या दोन पायांत गेलं. ढेरीच्या आधारानं सायकल थांबली! पाहणाऱ्यांना हसावं की रडावं, ते कळेना. तो स्वतःला सावरत हसून म्हणाला, "माझे पाय म्हणजे सायकल स्टॅंड वाटला का गं, ताई?‘ का नाहीशा झाल्या त्या सुसंस्कृत, शालीन सायकली? उत्तर द्या हो! सायकलींच्या आठवणींनी माझा कंठ दाटून येतो..

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात वळणा-वळणावर वेळोवेळी दिसायच्या शिस्तबद्ध रांगा! रेशनची रांग, बसची रांग, रॉकेलची रांग.. शनिपाराची आठवण सांगतो. तिथं आनंदनगर, गोखलेनगर, दत्तवाडीला जाण्यासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असायच्या. कुणी मध्ये घुसायला लागला, तर रांग एकजुटीनं ओरडायची, "लाइन, लाइन! ए घुसू नकोस! कुणी तरी द्या हो त्याला फटका!‘ पण फटका कुणीच द्यायचं नाही! घुसखोर रांगेतलाच एक होऊन जायचा! आता रांगा हरवल्या. बस येईपर्यंत प्रवासी एकमेकांची छान विचारपूस करतात. पण बस आली, की गेली माणुसकी! धक्काबुक्की, चढाओढ करीत, एकमेकांना ढकलत, आरडत-ओरडत प्रवेश करतात! आजारी, लहान मुलं, महिला यांचे अशा वेळी अपरिमित हाल होतात. पूर्वी बसस्टॉपवर थांबून "पीएमटी‘चे अधिकारी रांगेवर करडी नजर ठेवताना, तिकिटं तपासताना कधी कधी दिसायचे. "क्‍यू‘ हा शब्द शब्दकोषातच उरला आहे!

सायकली, रांगा यांच्या माळेत आल्या आहेत चिमण्या. पूर्वी घरात, अंगणात धान्य निवडताना आसपास राखाडी रंगाच्या चिमण्या चिवचिवत बागडायच्या. निष्पाप, हसऱ्या, गोड चिमण्यांच्या जागी थोराड देहाची कबुतरं आली आहेत. सगळीकडं घाण करून ठेवणाऱ्या या कबुतरांना दाणे घालण्याची पुणेकरांना मोठी हौस आहे. पण या गडबडीत आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय, हे सगळेजण कसं विसरतात? कोडंच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth, suresh pore