नाथाच्या पायाशी गमावले बूट

एन. सी. जोशी
शुक्रवार, 4 मे 2018

अमरनाथच्या परतीच्या वाटेवर पावसाने गाठले. अनेकांचे सामान वाहून जाताना दिसत होते. आमचे सामान सुरक्षित होते; पण बूट तेवढे हरवले होते.

अमरनाथच्या परतीच्या वाटेवर पावसाने गाठले. अनेकांचे सामान वाहून जाताना दिसत होते. आमचे सामान सुरक्षित होते; पण बूट तेवढे हरवले होते.

टाटा मोटर्समधील आमचा नेहमीचा ट्रेकिंग ग्रुप मनाली-लेह, कारगिल, लडाखला निघाला. मी व करंदीकर या सहकाऱ्याने अमरनाथ बघितले नव्हते. वाटेतच बालताल होते. तेथून अमरनाथ यात्रा करायचे ठरवले. बालताल ते अमरनाथ एक दिवसाचा प्रवास व नंतर अमरनाथ- पंचतरणी- पहलगाम असा तीन दिवसांचा पायी प्रवास करून श्रीनगरला जाण्याचे ठरविले. बालतालला तंबूत मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी भंडाऱ्यात चहा घेतला. सामानासाठी एक कुली केला. डोंगरातील वाटेवर जवान बंदुका घेऊन सज्ज होते. बरेच लोक पायी चालत होते. आम्ही दुपारी एक वाजता अमरनाथ गुहेच्या पायथ्याला पोचलो. बांबू-वासे व कापड बांधलेली तंबूची तात्पुरती दुकाने वाटेच्या दोन्ही बाजूला दिसत होती. या दुकानांत पुढच्या बाजूला विक्रीचे सामान व पाठीमागे यात्रेकरूंना राहण्यासाठी भाड्याने गाद्या अशी व्यवस्था होती.

एका दुकानदाराच्या तंबूत मुक्कामाला जागा भाड्याने घेतली. नंतर भंडाऱ्यात जेवण करून आलो. दमल्यामुळे लगेच झोपलो. दुपारी चार वाजता उठून गादीखाली आडोश्‍याला बूट लपवून ठेवले. स्लीपर घालून दर्शनाला निघालो. पाच-सहा फूट रुंद वाट, दोन्ही बाजूला दुकाने. गुहा वरती दोन-अडीचशे मीटर उंचावर असल्याने चढ होता. शेवटच्या सत्तर-ऐंशी पायऱ्या चढून गुहेमध्ये जाऊन दर्शन घेतले. पुन्हा पायऱ्या उतरायला लागलो, हळूहळू पावसाला सुरवात झाली, पाहता पाहता पावसाचा जोर वाढायला लागला. आम्ही एका दुकानात आश्रय घेतला. पावसाचा जोर अजून वाढला व त्याने रौर्द्ररूप धारण केले. वाटेवरून पाणी वाहायला लागले व त्याचे ओढ्यात रूपांतर झाले. वरच्या बाजूला असलेल्या भंडाऱ्यातील भांडी वाहून जायला लागली, नंतर पत्रेपण वाहून जाताना दिसू लागले. सगळी मंडळी घाबरलेली होती. सामान वाहत असल्याने आमच्या सामानाचे काय झाले असेल, याची काळजी वाटायला लागली. आमचे कपडे, पैसे, श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट सर्व काही सॅकमध्येच होते.
साधारण सहा वाजता पाऊस थांबला. अंधार दाटला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. जनरेटर बंद पडल्याने दिवे नव्हते. दुकानदारांचे पूजेचे साहित्य, शिवलिंगाच्या फ्रेम्स वगैरे वाहून गेले होते, तंबू फाटले होते.

आम्ही आमच्या तंबूकडे जायला निघालो. वाटेत आमचा दुकानदार भेटला. त्याने तुमचे सामान सुरक्षित आहे, असे सांगितले. हायसे वाटले. तंबूतील गाद्या ओल्या झाल्या होत्या, त्यामुळे दुसरीकडे जायचे ठरविले. सॅक्‍स घेतल्या व बूट घेण्यासाठी गादीखाली पाहिले, तर तेथे बूट नव्हते. दुकानदाराला विचारल्यानंतर तो म्हणाला, ""हमारा पचास हजार का नुकसान हो गया। आप काय को जुते का फिकिर करते हो।'' बाहेर पडलो व समोरच एक पोलिस देवदूतासारखा भेटला. ""आप बुजुर्ग लोक दिखते हो। हेलिपॅड के बाजू मे टेन्ट है, उधर जाव।''

त्या तंबूपाशी गेलो, तेथील पोलिसाने आत जाण्यास सांगितले. गोल मोठा तंबू होता. आत अंधार होता, काहीच दिसत नव्हते. कसेबसे सॅक ठेवून बसलो. आतमध्ये पंचवीस-तीस लोक असावेत. कोणीही बोलत नव्हते. नंतर एक हवालदार आला व त्याने एवढीच माणसे येथे राहतील व त्यांना दोन जणांना मिळून एक "स्लिपिंग बॅग' झोपण्यास देण्यात येईल असे सांगितले. साधारण सात वाजता "चाऽय' अशी तंबूच्या दारातून हाक आली. अशाही परिस्थितीत भंडाऱ्याच्या लोकांनी चहा करून पाठविला होता. चहा घेऊन आम्ही जरा भानावर आलो.

आम्ही आधी अमरनाथ ते पहलगाम असे तीन दिवसांत चालत जायचे ठरविले होते. आता माझे बूट नव्हते. स्लिपरवर कसे जायचे? उद्या बघू. एका "स्लिपिंग बॅग'मध्ये दोघांनी कसे झोपायचे? चेन उघडून चेनची बाजू खाली करून कसेबसे आत गेलो. एक जण पाठीवर व दुसरा कुशीवर. रात्री "खाना तयार है', अशी हाळी आली. कोणाचीच जेवणाची इच्छा नव्हती. रात्रभर "स्लिपिंग बॅग'मध्ये चुळबूळ चालली होती. झोप लागली नाही.

सकाळी चहाचा पुकारा झाला. भंडाऱ्याचा माणूस चहा घेऊन आला होता. बाहेर उजाडायला लागले हो. सर्व आवरून स्लीपरवरच बालतालला परत जायचे ठरविले. दुपारी बालतालला पोचलो. तेथे मुक्काम केला. अमरनाथ यात्रा संपत आल्यामुळे तिथे दुकाने नव्हती. मुक्काम करून दुसऱ्या दिवशी बसने श्रीनगरला आलो. तेथे कर्फ्यू होता. विमानाची तिकिटे तीन दिवसांनंतरची असल्याने तीन दिवस दाललेकजवळील एका हॉटेलमध्ये राहावे लागले. कुठेही बाहेर जाता येत नव्हते व पुढचा प्रवास श्रीनगर- मुंबई- पुणे हा स्लीपरवरच केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: n c joshi write article in muktapeeth