महानायक की मूकनायक

नलिनी अमीनभावी (भिसे)
शनिवार, 2 डिसेंबर 2017

सोशल मीडियाच्या जमान्यात सातत्याने नाती जपाचा मंत्र जपणारी मंडळी त्याचं पालन किती करतात, हे पाहण्यासारखं आहे...

सोशल मीडियाच्या जमान्यात सातत्याने नाती जपाचा मंत्र जपणारी मंडळी त्याचं पालन किती करतात, हे पाहण्यासारखं आहे...

प्रत्येकाची आयुष्यात काही ना काही स्वप्नं असतात. मग ती छोटी असोत, की मोठी असोत. कुणाचं उच्चशिक्षणाचं असेल, कुणाचं घराचं, कुणाचं गाडीचं, तर कुणाचं जग फिरण्याचं असेल. प्रत्येकजण ते पूर्ण करण्यासाठी आपापल्यापरीनं प्रयत्न करत असतो. काही स्वप्नं प्रत्यक्षात उतरायला मोठी धनराशी लागते. अर्धं आयुष्यं जातं ती जमवण्याकरिता. पण "कौन बनेगा करोडपती'सारखा कार्यक्रम काही मिनिटांत ती धनराशी मिळवून देतो. आवश्‍यकता असते, ती बुद्धी, चौफेर वाचन, अभ्यास, त्याचबरोबर हवी नशिबाची साथ आणि थोडीफार महानायक बच्चनजींची नकळत मिळणारी साथ. मात्र, ती ओळखण्याचा चाणक्षपणाही हवाच.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील योगेश शर्मा नावाची व्यक्ती कार्यक्रमात सहभागही होऊन 50 लाख रुपये जिंकून गेली. ही व्यक्ती लक्षात राहिली, ती बऱ्याच कारणांमुळे. प्रथम प्रयत्नात हॉट-सीटवर न पोचता आल्यानं लोकांनी केलेली हेटाळणी, टोचणी. त्यामुळं आलेलं झपाटलेपण, जिद्द, परिश्रम, तसेच शिक्षकाची नोकरी करण्याची पात्रता असतानाही करावी लागणारी ऑफिस बॉयची नोकरी आणि एवढ्या मोठ्या मंचावरून हे वास्तव सर्वांसमोर मांडण्याची हिंमत, मनाचा निर्मळपणा आणि तेवढाच मोठेपणाही. पण या सर्व गोष्टींपेक्षा स्मरणात राहिलं, ते कार्यक्रमादरम्यान समोर आलेलं पिता-पुत्रांचं अबोल नातं! एकमेकांशी न बोलणं, तेही चक्क 20 वर्षं!
खूप आश्‍चर्य वाटलं, वाईटही वाटलं. पालकांच्या मुलांकडून अपेक्षा असतात. आपल्याला जे मिळालं नाही किंवा करायला जमलं नाही, ते मुलांनी करून दाखवावं, नाव कमवावं, अशी इच्छा असते. त्यात गैर काहीच नाही. पण मुलांमध्ये ती क्षमता नसेल तर? मुलांची आवड, ध्येय काही वेगळं असेल तर? किंवा इतर काही कारणांमुळे अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर? कोण बरोबर, कोण चूक, हे ठरविण्याचा आपला अधिकार नाही. किंबहुना आपण तसं ठरवूपण नये. दोघे आपापल्या जागी योग्य असतीलही. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये मतभिन्नता, आवडभिन्नता, विचारभिन्नता असू शकतात, त्यामुळे वाद होतात. भांडणं होतात. एकमेकांचा रागही येतो. तो व्यक्त होण्यासाठी अबोलाही धरला जातो; पण तब्बल वीस वर्षं बाप-लेक एकमेकांशी न बोलणं?

आजकाल सोशल मीडियावर अनेक मेसेजेस येत असतात. अगदी काय खावं, काय प्यावं, कसं वागावं याचं ज्ञानामृत आणि जोडीला बोधामृताचे डोस सारखेच पाजले जात असतात. सर्वांत जास्त आणि सातत्याने येणारे मेसेज हे आयुष्यात "नाती' किती महत्त्वाची आहेत, ती जपली पाहिजेत, हे वेगवेगळ्या शब्दांतून सांगणारे असतात. तरीही आजूबाजूला अबोले पाहायला, ऐकायला मिळतात. वयानं कितीही मोठं झालं तरी बालपणीचा बट्टीचा खेळ काही खेळताना दिसतात.

कोणत्याही नात्याची जपणूक ही एकमार्गी होणारी प्रक्रिया नाही. दोन्हींकडून ती जपावी लागते. सादाला प्रतिसाद नाही मिळाला, तर नुसताच प्रतिध्वनी (इको) ऐकायला येतो. नातं निभावताना आलेलेल कडू/ गोड प्रसंग, आठवणी, कधी वेळेनुसार करून घेतलेला उपयोग, कधी गृहीत धरलं जाणं, तर कधी जिव्हारी लागलेले शब्द या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. सगळ्यात जास्त कारणीभूत ठरतात ते गैरसमज. एकदा का गैरसमजाची मनात खूणगाठ बसली, की नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. सहज केलेल्या गोष्टी मुद्दाम वाटायला लागतात आणि सहज बोललेली वाक्‍यंही टोमणे वाटतात. मग गाठीची नीरगाठ व्हायला वेळ लागत नाही. नातेसंबंध किती ताणयचे याचा विचार व्हायला हवा. अबोला धरणं, तो वर्षानुवर्षं टिकवणं, त्यावर उपाय नाही. बऱ्याच ठिकाणी अगदी जवळच्या नात्यांमध्ये अशी अबोली सदाफुलीसारखी फुललेली दिसते. खूपदा अमुक इतकी वर्षं झाली, मी त्याच्या घराची पायरी चढलो नाही किंवा तमक्‍याचं तोंड पाहिलं नाही. इतकी वर्षं आमचं एका शब्दाइतकंही बोलणं भाषण नाही, अशा प्रकारची रेकॉर्ड वाजवणारी वाक्‍य कानांवर पडतात. अशी माणसं आपला अहंकार कुरवाळत स्वतःच्या निग्रहीपणाचं स्वतःच कौतुक करत असतात.

अशावेळी घरातील मोठ्यांनी मोठेपणाच्या अधिकारानं किंवा जवळच्या नातेवाइकांनी पुढाकारानं असे अबोले मिटवले पाहिजेत. पण आपल्याला काय करायचंय? अशी भूमिका घेतली जाते. काही ठिकाणी मनातून त्यांना तसंच हवं असतं, एक प्रकारचा आनंद मिळत असतो. शिवाय, तेवढाच विषयही चर्चेला मिळतो.
गैरसमजाचे, रागाचे मळभ स्पष्टपणे बोलून, संवाद साधून मोकळं करणं सहज शक्‍य असतं. पण काही वेळा "मी'च का आधी बोलू या वृत्तीमुळे, तर काहीवेळा कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला "निर्लज्ज किंवा कसा आला नाक घासत,' म्हणून हिणवून त्याच्या हेतूवरही शंका घेतली जाते.

खरं तर अबोला कसा टिकवावा किंवा नाती कशी तोडावीत याच्या सहज सोप्या टिप्स कुठंच वाचनात नाहीत. उलट "मी'पणा सोडा, नाती जोडा किंवा नात्याचे बंध अतूट बंध वगैरे मेसेजेस रोजच्या रोज वाचनात येतात. ते वाचून एकतर फक्त लाइक केले जातात किंवा फॉरवर्ड केले जातात. पण थोडा विचार तरी त्याआधी केला तर...
मी स्वतः दूरसंचार खात्यामध्ये (बीएसएनएल) नोकरी केलेली असल्यामुळं, संवाद क्षेत्रांतील बदल अनुभवले आहेत. आवडत्या व्यक्तीचा आवाज ऐकायला मिळावा, तिच्याशी बोलता यावं यासाठी जीव व्याकूळ होत असलेले पाहिले आहेत. पूर्वी केवळ तीन मिनिटं बोलण्यासाठी ट्रंक-कॉल बुक करून लोकांना कित्येक तासांची प्रतीक्षा करावी लागे. बरोबरीनं किती तरी पैसेही मोजावे लागत. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त टॉक टाइम देण्याची स्पर्धा करणाऱ्या कंपन्याही आहेत. कमतरता आहे ती इच्छाशक्तीची. कुणीतरी लहान बापाचं होऊन दोन पावलं मागं जाण्याची. मन मोठं करून दोन हात पुढे करायची. हातातील मोबाईलची बटणं दाबण्याची.

शर्मा पिता-पुत्रांचा अबोला संपुष्टात आणला तो महानायक अमिताभ बच्चन यांनी! आता आपणही ठरवलं पाहिजे, आपण कोण बनायचं ते - महानायक की मूकनायक?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nalini asminbhavi bhise write article in muktapeeth