नोटाबंदीचा "जुमला' पथ्यावर!

नयन विनायक गिरमे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मोदीअब्बा अचानक काहीही करू शकतात, हे घरातल्या किंवा आजूबाजूच्या चर्चांवरून विष्णूच्या मनात पक्कं ठसलं होतं. ही ठसणगाठ पक्की झाली, म्हणून तर त्याचा आजपर्यंत "या गोष्टी'वर विश्वास बसला आहे.

मोदीअब्बा अचानक काहीही करू शकतात, हे घरातल्या किंवा आजूबाजूच्या चर्चांवरून विष्णूच्या मनात पक्कं ठसलं होतं. ही ठसणगाठ पक्की झाली, म्हणून तर त्याचा आजपर्यंत "या गोष्टी'वर विश्वास बसला आहे.

एकदा सहज गंमत म्हणून विष्णूला कार्टून चॅनेल, पोगो वगैरे दाखवलं. त्याने पहिल्यांदा आवडीने बघितलं तेव्हा तो अडीच वर्षांचा होता. आमच्या लहानपणी "जंगल बुक', "डक टेल्स' किंवा आजही ऑल टाइम फेवरेट असलेलं "टॉम अँड जेरी' असे मोजकेच, पण भन्नाट कार्टून शो होते. करमणूक तर व्हायचीच; पण "टॉम अँड जेरी'सारख्या प्रचंड मजेशीर आणि त्याबरोबरच त्यातल्या ऍक्‍शन- रिऍक्‍शनवर आधारित दृश्‍यांनी नकळत बुद्धीचा विकास व्हायला मदत व्हायची. त्यामुळे माझ्या मुलाने कार्टून चॅनेल पाहिलं तर माझी काहीच हरकत नव्हती. अगदी खरं सांगायचं तर कार्टून तसं चांगलंच असतं, हाच समज होता. ज्या त्या वयात त्या त्या गोष्टी करायलाच पाहिजेत, म्हणजे माझ्या मुलाने त्याच्या करमणुकीसाठी कार्टून बघायला काहीच हरकत नाही. म्हणजे नव्हती. तर, आम्हीच विष्णूला पहिल्यांदा कार्टून चॅनेल दाखवलं. पण आम्हाला काही कळायच्या आत... जेवताना कार्टून, खेळायच्याऐवजी कार्टून, "कार्टून लावणार असशील तरच हे करीन... नाहीतर नाही...' असं "ब्लॅकमेलिंग' सुरू झालं. सुरवातीला काही दिवस हे सगळं चालेल आणि नंतर कदाचित त्यालाच कंटाळा येऊन तोच बघणार नाही असं वाटलं, पण कसलं काय. दिवसेंदिवस हे प्रमाण कमालीचं वाढत गेलं. मग कधी रागवायचं, कधी घरातील वीज बंद करायची, कधी रिमोट लपवायचा, असलेही उद्योग करून बघितले. पण, या सर्वांचा लगेचच पर्दाफाश झाला. पुन्हा तेच. ती कार्टून आम्हा सगळ्यांच्याच मानगुटीवरच बसली. खरं तर, या "व्यसना'ची सवय होते आहे हे लक्षात आल्यावरच मुलाला बाहेर काढायला हवं होतं आणि पर्यायाने घरातल्या आम्हा सर्वांनाही... पण कसं? हे मात्र समजत नव्हतं.

... तर अचानकच गेल्या नोव्हेंबरमध्ये एका रात्री आपल्या पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली. तेव्हापासून पुढे सर्वत्र हीच चर्चा सुरू झाली. टीव्हीवर, घरात, सोसायटीमध्ये केवळ मोदींनी केलेली नोटाबंदी आणि फक्त नोटाबंदी एवढंच होतं! असंच एके दिवशी बातम्या बघत असताना मुलाने म्हणजे विष्णूने कार्टून लावण्याचा आग्रह सुरू केला. एवढा महत्त्वाचा विषय सुरू असताना याला कार्टून लावून देणं माझ्या जिवावर आलं होतं. पण, त्याचा विनंतीवजा आवाज आता गोंधळ घालण्यापर्यंत पोचला होता. अखेर मी त्याला वैतागून म्हणालो, ""विष्णू, तुला माहीत आहे का, काय झालं? नोटाबंदी झाली!'' तिकडून तेवढ्याच वैतागलेल्या आविर्भावात विष्णूने उत्तर दिलं..""माहितीये मला.. मोदीअब्बांनी केलीये... तू कार्टून लाव!''
हा एवढा मोठा विषय याला कसा माहीत? या विचारात असतानाच एकदम डोक्‍यात ट्यूब पेटली. पटकन एक सबस्क्राइब न केलेलं चॅनेल लावलं आणि स्वतःच आश्‍चर्यचकित हावभाव करून ओरडलो, ""अर्रर्र विष्णू... हे बघ, मोदीअब्बांनी कार्टूनपण बंद केलंय वाटतं. अरे आत्ता तर सुरू होतं. नोटाबंदीसारखं कार्टूनही बंद केलं वाटतं... हे मोदीअब्बा काहीही करू शकतात रे!''
तोपर्यंत विष्णूच्या डोळ्यांत जवळजवळ पाणी आलेलं. ""कसं काय..? खरं सांग की रे बाबा.''

मीही जरा आणखीनच नाटक करत त्याला समजावू लागलो, ""अरे हो रे.. मलापण आता मोटू-पतलू बघायचं होतं; पण ते आता दिसतच नाहीये रे''
त्या वेळी त्याला हे पटलं आणि कायमचंच! त्यानंतर आजपर्यंत आमच्या टीव्हीवरचं कार्टून म्हणजे विष्णूसाठी मोदीअब्बांनी अचानक; पण पूर्णतः बंद केलेली एक घटना आहे. आता तर घरी कुणी पाहुणे, त्यांची मुलं आली आणि समजा कार्टूनचा विषय निघालाच तर तोच सांगतो, ""कार्टून मोदीअब्बांनी बंद केलंय.''

सध्या घरातल्यांच्या मोबाईलवरचं यू ट्यूब, काही वेळा गेम्सपण असेच बंद होतात. अचानक. विष्णूला पक्की खात्री असते, की हा मोदीअब्बांचाच करिष्मा असणार. हा आम्हाला झालेला नोटाबंदीचा एक खूप मोठा फायदा (हो फायदाच!) आहे. मोदीअब्बा काहीही करू शकतात, हे तेव्हाच घरातल्या किंवा आजूबाजूच्या चर्चांवरून विष्णूच्या मनातपण पक्कं ठसलं होतं. म्हणून तर त्याचा आजपर्यंत या गोष्टीवर विश्वास बसला आहे. सध्या आमच्या टीव्हीवर डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा बातम्या बिनदिक्कत सुरू असतात आणि विशेष म्हणजे त्यावरील कार्यक्रम विष्णूचे "फेवरेट' झाले आहेत.

देशात झालेल्या नोटाबंदीनंतर सहज फेकलेला एक "जुमला' आजपर्यंत नक्कीच यशस्वी झाला आहे. भविष्यात त्यालाही हा "जुमला' उलगडणार आहे. मात्र, तोपर्यंत त्याची आवड पूर्ण बदललेली असेल, अशी अपेक्षा आहे. सहज फेकलेल्या गोष्टीही आपल्याला सवयीने खऱ्या वाटू लागतात, नाही का!

Web Title: nayan girme write article in muktapeeth