रुग्णालयातील दिनराती

प्रमोद जयवंतराव मोहिते
शुक्रवार, 14 जुलै 2017

गाडीवरून पडलो. तातडीने शस्त्रक्रिया झाली. तोच वेगळ्या आजाराने गाठले. अजून एक नवा आजार. मग संसर्गाची बाधा. पुन्हा शस्त्रक्रिया. तोवर खांदा निखळला. दोन महिने रुग्णालयात मुक्काम होता.

गाडीवरून पडलो. तातडीने शस्त्रक्रिया झाली. तोच वेगळ्या आजाराने गाठले. अजून एक नवा आजार. मग संसर्गाची बाधा. पुन्हा शस्त्रक्रिया. तोवर खांदा निखळला. दोन महिने रुग्णालयात मुक्काम होता.

नित्याप्रमाणे माझ्या मित्रांबरोबर पर्वतीवर निघालो होतो. नेहमीप्रमाणे मित्राला फोन केला व मी घरातून निघालो. साने गुरुजी सांस्कृतिक हॉलजवळ मी गाडीवरून पडलो. बाजूच्या हॉटेलमधील काही मुले पळत आली. त्यांनी जवळच्या एका रुग्णालयात मला दाखल केले. माझ्या अंगावर सोन्याचा गोफ, अंगठी होती, खिशात पैसे होते; पण कोणीही त्याला हात लावला नाही. उलट माझ्या मोबाईलवरून "ए' मालिकेतल्या क्रमांकावर संपर्क साधला. माझ्या आजीला हा फोन झाला होता. ती आजी आहे हे लक्षात येताच त्या मुलांनी मी सर्वांत शेवटी ज्याला फोन केला होता, त्या माझ्या मित्राला कळवले. त्यामुळे सदाशिव पेठेतील अखिल विश्‍व मित्र मंडळातील माझे मित्र, माझा भाऊ अर्ध्या तासाच्या आत तेथे पोचले. माझी अवस्था पाहून त्यांनी तातडीने मला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले. डॉ. धनंजय केळकर स्वतः आले. तातडीने सर्व चाचण्या झाल्या. माझ्या डोक्‍याला जबरदस्त मार लागला होता. तेथे रक्त साकळले होते. ते काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. रात्री बारा वाजता डॉ. जयदेव पंचवाघ यांना बोलावण्यात आले. त्यांनी ताबडतोब शस्त्रक्रिया केली. दुसऱ्या दिवशी दुपारी मी शुद्धीत आलो. डॉक्‍टर म्हणाले, "आता त्यांना झोप येऊ देऊ नका.'' मग मला जागे ठेवण्याचे प्रयत्न माझ्या मित्रांकडून होऊ लागले.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याच्या आनंदात मित्र जागरण, तहान-भूक विसरले.
काही वेळाने मला ताप येऊ लागला. बघता बघता माझी तब्येत परत बिघडली. परत तपासण्या सुरू झाल्या. मला मेंदूच्या वेष्टनाचा दाह (मेननजायटिस्‌) सुरू झाला होता. आता एकवीस दिवस इंजेक्‍शन देण्याचे ठरले. माझ्या अंगावर ओल्या चादरी चढवण्यात आल्या. बर्फाच्या लाद्या काखेत ठेवण्यात आल्या, कारण ताप खूप होता. यात आठवडा गेला. तपासण्या सुरूच होत्या. माझी अवस्था वाईट होती. हा ताप कमी होत गेला. पण, पुन्हा मला ताप वाढू लागला. आता फुफ्फुसदाह (निमोनिया) झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आता पहिल्या इंजेक्‍शनबरोबर निमोनियाचे परत एकवीस दिवसांचे इंजेक्‍शन सुरू झाले. निमोनियामुळे डॉक्‍टरांना माझ्या अंगावर ओली चादर टाकता येत नव्हती. आता औषधांनी ताप कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. दोन्ही आजारांवर एकत्र औषधोपचार सुरू होते. घरच्यांची काळजी वाढत होती. रोजचे इंजेक्‍शन व ताप बघणे सुरू होते.

शस्त्रक्रियेनंतर मेंदूला सूज येते. माझ्या मेंदूवरील सूज कमी होण्याकडे डॉक्‍टरांचे लक्ष लागले होते. मेंदूच्या सुजेला वाव देण्यासाठी डॉ. पंचवाघ यांनी कवटीचा काही भाग कापून माझ्या पोटाच्या मांसल भागात ठेवला होता. डिस्चार्जनंतर दोन महिन्यांनी तो पुन्हा बसविण्यात येणार होता. पण, माझ्या वेगवेगळ्या आजारांमुळे व संसर्गांमुळे माझा आय.सी.यू.मधला मुक्कामच लांबत चालला होता. त्यामुळे सगळ्यांची काळजी वाढत होती. नळीतल्या लिक्वीड जेवणाशिवाय मला दुसरे काही देता येत नव्हते. दोन्ही आजारांवरील इंजेक्‍शनचा कोर्स संपत आला असतानाच मला "फंगल इन्फेक्‍शन' झाले. आता पुन्हा थोडा ताप, परत आठ दिवसांचा इंजेक्‍शनचा कोर्स. पण, आय.सी.यू. विभागाचे प्रमुख डॉ. राजहंस व अन्य डॉक्‍टरांचे माझ्यावर लक्ष होते. सगळेजण दिवस-रात्र काटेकोरपणे माझी काळजी घेत होते.

माझी सगळी इंजेक्‍शन संपली; पण.. पुन्हा ताप येऊ लागला. आता युरिन इन्फेक्‍शनवर इंजेक्‍शनचा कोर्स सुरू झाला. पण आता माझ्या शिरा मिळणे अवघड झाले होते. शरीराची सुया टोचून चाळणी झाली होती. माझा माझ्या शरीरावर ताबा राहात नव्हता. त्यामुळे हालचाल खूप होती. शेवटी गळ्याजवळच्या मुख्य शिरेतून इंजेक्‍शन व सलाईन सुरू करण्यात आले. यातूनही निभावलो. थोडे थोडे बोलता येत होते; पण हे बोलणे कोणालाही काही कळत नव्हते. पण बोलतो याचाच सगळ्यांना खूप आनंद व्हायचा.

सगळ्यांच्या प्रार्थनेचे फळ म्हणून की काय, शेवटी एक दिवस डॉक्‍टरांनी मला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मी रुग्णालयात दाखल झालो तेव्हा माझे वजन बहात्तर किलो होते, आता इतक्‍या दिवसांनी निघताना अठ्ठेचाळीस किलो होते. दोन महिन्यांनंतर, डॉ. पंचवाघ यांनी माझ्या पोटात ठेवलेला कवटीचा तुकडा पुन्हा जागेवर बसवला. नंतर दोन महिने चांगले गेले आणि माझा खांदा निखळला.
सात वर्षे झाली या सगळ्याला. आता मी गणपती उत्सवात, तसेच माउलींच्या व तुकाराम महाराजांच्या पालख्यांसमवेत टप्प्याटप्प्याने वारी करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pramod mohite write article in muktapeeth