शुभ संकल्पांची प्रार्थना

डॉ. अनुपमा साठे
मंगळवार, 28 जुलै 2020

. भगवान विष्णू आणि शिव पण एकांश आहेत. म्हणून त्यांना हरिहर म्हणतात. "सर्वदेवात्मको रूद्रः सर्वेदेवा: शिवात्मका' सर्व देवता रूद्रांश आहेत व रूद्र सर्व देवतांमधे स्थित आहे. शिव व रूद्र हे परब्रह्माचेच प्रतिशब्द आहेत.
 

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांचा काळाला "चातुर्मास' म्हणतात. या चार महिन्यात पावसाळी ऋतू असल्यामुळे वातावरण प्रसन्न नसतं व त्यामुळे मनावरपण परिणाम होतो. शरीर व मनाचे स्वास्थ्य उत्तम राहण्याकरता आपल्या पूर्वजांनी आहार विहारावर निर्बंध सांगितले आहेत. दानधर्म, उपवास व सत्संग इत्यादींमुळे माणसाची प्रकृती व प्रवृत्ती दोन्ही सांभाळायला मदत होते.

आषाढ शुक्‍ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. यादिवशी विष्णू भगवान झोपतात व कार्तिक शुक्‍ल एकादशीला जागे होतात. म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. विष्णू भगवान या जगाचे पालनकर्ते आहेत. ते झोपल्यावर भगवान शिव त्यांचा कार्यभार बघतात अशी आख्यायिका आहे! याच कारणामुळे चातुर्मासात, विशेषतः श्रावणात शिवाची स्तुती केली जाते.

शिवाच्या स्तुतीपर यजुर्वेदातल्या काही निवडक सूक्तांचा संग्रहाला रुद्राष्टध्यायी असे नाव आहे. या ग्रंथात राजधर्म, गृहस्थधर्म, ज्ञान वैराग्य, शांती, ईश्वरस्तुती इत्यादी अनेक सर्वोत्तम विषयांचे वर्णन आहे. हे स्तोत्र श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या रूद्राभिषेकात समाविष्ट आहे. वेदांच्या ब्राह्मण ग्रंथात, उपनिषदांत, पुराण व स्मृतीग्रंथामधे शिवार्चने बरोबरंच रुद्राष्टध्यायीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे.

जसे दही घुसळून लोणी मिळते तसेच यजुर्वेदाचे सार या सूक्त समूहामध्ये आले आहे. शिवाचा अर्थ येथे केवळ शंकर भगवान नसून फार विस्तृत आहे. "वेद: शिवो शिवो वेदः' म्हणजे वेद शिव आहेत व शिव वेद आहेत. अर्थात शिव वेदस्वरूप आहे. भगवान विष्णू आणि शिव पण एकांश आहेत. म्हणून त्यांना हरिहर म्हणतात. "सर्वदेवात्मको रूद्रः सर्वेदेवा: शिवात्मका' सर्व देवता रूद्रांश आहेत व रूद्र सर्व देवतांमधे स्थित आहे. शिव व रूद्र हे परब्रह्माचेच प्रतिशब्द आहेत.

सर्वसाधारण समज असा आहे की वेदमंत्र पुण्यप्रद असल्यामुळे यांचे फक्त पठण किंवा श्रवणमात्र पुरेसं आहे. परंतु, वेदमंत्रांचा अर्थ समजून त्याचा तत्वाशी पूर्ण परिचय करून घेतला पाहिजे. निरुक्तकार म्हणतात, वेद वाचून त्याचा अर्थ माहीत नसणारी व्यक्ती भार वाहणाऱ्या प्राण्यासमान आहे किंवा निर्जन अरण्यात फळांनी बहरलेल्या झाडाप्रमाणे आहे. ज्याचे फळ कुणालाच मिळत नाही. म्हणून कुठलेही मंत्र जे आपण वाचतो किंवा उच्चारण करतो त्यांचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहीजे.

या अष्टाध्यायीच्या प्रथम अध्यायात चौथ्या ते दहाव्या श्‍लोकांमधे शिवसंकल्प सूक्त आहे. शुक्‍ल यजुर्वेदाचा चौतीसाव्या अध्यायाचा सुरुवातीच्या सहा श्‍लोकांना शिवसंकल्प सूक्त असे म्हणतात. मनोविज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असल्यामुळे "शिवसंकल्पोपनिषद' असेही नाव प्रचलित आहे. या सूक्ताची देवता "मन' आहे. मनाच्या विविध वैशिष्ट्यांचे व प्रवृत्तींचे वर्णन करून "शिवसंकल्प' अर्थात कल्याणकारी संकल्प मनात येवोत अशी प्रार्थना यजुर्वेदीय ऋषींनी केली आहे. या सूक्तात "शिव'च्या अनेक अर्थांपैकी "शुभ' अथवा "कल्याणकारी' असा अर्थ विदित आहे.

ऋषि म्हणतात- "जे दिव्य ज्योतिर्मय मन जागृतावस्थेत कितीही विस्तृत होवू शकते व सुप्तावस्थेत अंतरात्मेत सूक्ष्मरूपात स्थित होते, जे सर्व इन्द्रीयांना प्रकाशमान करते, ते माझे मन शुभ संकल्पाने प्रवृत होवो
1. ज्याच्या सहाय्याने ज्ञानीजन कर्मयोगाच्या साधनेत तल्लीन होतात व जे सर्वांच्या शरीरात विलक्षण रुपाने स्थित आहे ते माझे मन शुभ संकल्पाने प्रवृत्त होवो
2. जे मन ज्ञानस्वरूप, चित्तस्वरूप व धैर्यरुप आहे, ज्याच्या निर्धाराशिवाय कुठलेच कार्य पूर्णत्वाला प्राप्त होवू शकत नाही, असे अंतर्ज्योती स्वरुप माझे मन शुभसंकल्पाने प्रवृत्त होवो
3. ज्या शाश्वत मनाद्वारे भूत, भविष्य व वर्तमानकाळातल्या सर्व घटना ज्ञात होतात व ज्याच्यामुळे सप्तहोत्रीय यज्ञ केले जातात ते माझे मन शुभ संकल्पाने युक्त होवो 4. ज्या मनात ऋग्वेदांचा ऋचा, यजुर्वेद व सामवेदांचे मंत्र प्रतिष्ठित आहेत, जसे रथचक्राचे आरे चक्राच्या नाभिवर प्रतिष्ठित असतात व सर्व ज्ञान कापडाच्या तंतुप्रमाणे विणलेले असते ते माझे मन शुभ संकल्पाने युक्त होवो
5. जे मन इंद्रीयांना ताब्यात ठेवते, जसा एक कुशल सारथी वेगवान अश्वांना लगाम घालतो, ते माझे अजर व वेगवान मन शुभ संकल्पाने प्रवृत्त होवो
6.मनुष्याचे मन जगात सर्वात शक्तिशाली आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आपण मनात जसे संकल्प करतो तसेच आपले आचरण होते. कर्माचा आधार मनात उत्पन्न होणारे विचारच आहेत. कर्म शुभ व कल्याणकारी असण्यासाठी मनात विचार सुद्धा तसेच यायला हवेत. म्हणून वैदिक ऋषी केवल शारीरिक किंवा वाचिकच नाही तर मानसिक पापकर्मांपासून दूर राहण्याची प्रार्थना करीत असत. मन सर्व ज्ञानाचे निवासस्थान आहे. परंतु, ज्ञानाचा सकारात्मक उपयोग केला तरंच जनकल्याण संभव आहे. संहारक शस्त्र व मानवतेच्या विनाशाची विभीषिका लिहिणाऱ्यांजवळही ज्ञानाची कमतरता नाही. कमतरता आहे ती शुभ संकल्पांची, कल्याणकारी विचारांची. अंत:करण शुद्ध असेल तरंच मनात कल्याणकारी विचारांचा प्रवेश होतो. अन्यथा मनात नकारात्मक विचार घर करतात आणि आपण स्वतःप्रती व दुसऱ्यांप्रती अपेक्षाभंग, नैराश्‍य व रागासारख्या हानीकारक भावना ठेवून मनोरोगांना आमंत्रण देतो. याच नेमक्‍या भावना मनातून काढून मनाला शुभसंकल्पांकडे प्रवृत्त करण्याचे काम मनोरोग विशेषज्ज्ञ करीत असतात. तर हेच आपल्या यजुर्वेदकालीन ऋषींनी आपल्या कल्याणासाठी लिहून ठेवले आहे. मनाचे शरीरावर आधिपत्य असते. सर्व इन्द्रीयांना मन प्रकाशमान करते. इन्द्रीयांवर ताबा ठेवायचा असेल तर मनावर ताबा ठेवणे आवश्‍यक आहे. शेवटच्या श्‍लोकात ऋषींनी मनाला सारथीची उत्तम उपमा दिली आहे.
सुषारथिरश्वानिव यन्मनुष्यान्‌ नेनीयतेऽभीशुभिर्वाजिन इव।
हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु

जसा एक कुशल सारथी सर्व अश्वांना लगामाद्वारे ताब्यात ठेवतो व लक्ष्यापर्यंत पोहोचतो. तसेच मन हे सर्व इन्द्रीयांना वश करू शकते व मनुष्याला भरकटू न देता लक्ष्य साध्य करून देऊ शकते. मनाच्या विस्तार व शक्तीला मर्यादा नाहीत हे ओळखून त्याला"शिव' अर्थात कल्याणकारी संकल्पांकडे प्रवृत्त करण्याचे विलक्षण कार्य यजुर्वेदातले "शिवसंकल्पसूक्त' अतिशय प्रभावी पद्धतीने करते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prayer for positive waves