मुक्तपीठ : एक चांदणी

मुक्तपीठ : एक चांदणी

चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-मनाली सहल फक्त एक हजार रुपयांत, आजच घ्या स्वतःची कार फक्त दोन टक्के व्याजदराने, दोन लाखांचा चेक आणा, नवीन घरात राहायला या, यांसारख्या "ऑफर्स' भुरळ पाडतात. उत्सुकता निर्माण होते, चौकशी तर करू, पाहून तर येऊ, असा विचार मनात येतो व चमचमणाऱ्या चांदणीकडे नकळत दुर्लक्ष होते आणि आपण मोहात पडतो. 

काही वेळा फायदा होतो आणि बऱ्याच वेळा अनावश्‍यक खरेदी होते. आता एका शर्टच्या खरेदीवर चार मोफत मिळतात. पण एका शर्टची किंमत चार-पाच हजार रुपयांपर्यंत असते. म्हणजे उरलेले चार शर्ट मोफत मिळतात खरे, पण ते फक्त होळी, रंगपंचमी, धुळवड अशा सणांनाच घालावेत असे असतात. सहलीसाठी एक हजारात फक्त नोंदणी करायची असते. दोन टक्के व्याजदराने नवीन कार घ्यायला काय हरकत आहे. पण "अटी लागू'ची चांदणी सांगते की, महिना दोन टक्के म्हणजे वार्षिक व्याज दर चोवीस टक्के. दोन लाखांचा चेक आपल्याला नवीन घरात राहायला बोलावतो. आपण पळत सुटतो. नवीन घर दाखवताना माहिती मिळते की घराची किंमत सत्तर लाख आहे आणि ते पुढील दोनच महिन्यांत भरायचेत. 

जाहिरात तुम्हाला वस्तू आणि उत्पादनांची खरेदी करावी म्हणून वाट दाखवते, तर ही छोटी चांदणी वाटेतले काटे दाखवते. सरतेशेवटी ही सर्व मार्केटिंगची तंत्रे असतात. माणसांना खरेदीच्या मोहात पाडणारी. त्यामुळे आधी मधाची चव द्यायची. नंतर मधमाशा अंगावर सोडायच्या. जाहिरातीच्या सगळ्या माध्यमातून "अटी लागू'चे सारण भरलेली चांदणी चमकत आहे. ही चांदणी चमकतच राहणार, याला पर्याय नाही. नाहीतर तुम्ही "गिऱ्हाईक' कसे होणार? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com