मुक्तपीठ : जपानी शिक्षण

मयूरी जोशी
सोमवार, 27 मे 2019

जपानमधील शिस्तीच्या संस्काराविषयी जाणून घेताना त्यामागचे विविध पैलू अभ्यासायला मिळाले. या शैक्षणिक अनुभवामुळे जपानने माझीच मला नव्याने ओळख करून दिली.

जपानी भाषा छंद म्हणून शिकायला सुरवात केल्यापासून सात वर्षांनी जपानला जायची संधी मिळाली. जपानी शिक्षकांकडून जपानी भाषा व शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास आणि जपानी संस्कृती अनुभवण्याची सुवर्णसंधीच. आम्ही 29 देशांमधून 42 जण या अभ्यासक्रमासाठी निवडले गेलो. वेगवेगळ्या संस्कृतींचे जगाचे सगळे कोपरे एकत्र झाले होते. जपानमध्ये राहून जपानी भाषेचा अभ्यास करणे जास्त सोपे वाटू लागले. कारण, अभ्यासात येणारे परिच्छेद वाचल्यावर त्यामागची जपानी संस्कृती, जपानी लोकांची विचारसरणी अशा बऱ्याच पैलूंचा साक्षात्कार होत होता. जपानी संस्कृतीची जवळून ओळख व्हावी यासाठी कला, क्रीडा आणि सामाजिक कार्यक्रमही असायचे.

प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन तिथल्या शैक्षणिक वातावरणाची ओळख हा अत्यंत महत्त्वाचा अनुभव होता. माझी मुलगी प्राथमिक शाळेत असल्याने मला तुलनात्मक अभ्यास करणे सोपे गेले. आम्ही भेट दिलेल्या दोन्ही शाळांमधील लक्षवेधी गोष्ट म्हणजे "स्वच्छता'. विद्यार्थी स्वतः शाळेची स्वच्छता करतात. प्राथमिक शाळांमध्ये जेवण शाळेकडूनच असते. पहिली ते सहावीचे विद्यार्थी स्वतः वाढपी होऊन आपापल्या वर्गातील इतर विद्यार्थी व शिक्षकांना वाढून सर्व जण एकत्र जेवण करतात. जेवण वाढणारा चमू आळीपाळीने बदलतो. वाढणाऱ्या चमूव्यतिरिक्त विद्यार्थी शिस्तीने रांगेमध्ये थांबून हवे असेल तितकेच अन्न पानात घेत होते. 

तिथे असताना मला जपानी वाद्यांची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. श्‍यामीसेन आणि कोतो ही दोन वाद्ये थोडी शिकलेही. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला जपानी संस्कृती व त्याचे आम्ही केलेले परीक्षण लिहायचे होते. मी निवडलेला विषय होता "ग्योरेत्सु' म्हणजे जपानी माणसे रांगेत उभी राहतात ते कशासाठी, त्यामागची कारणे, स्वभाव विशेष इत्यादी. माझ्या ओळखीच्या झालेल्या जपानी मंडळींशी गप्पा मारून, प्रश्‍न विचारून त्यांच्या या शिस्तीच्या संस्काराविषयी जाणून घेताना त्यामागचे विविध पैलू अभ्यासायला मिळाले. या शैक्षणिक अनुभवामुळे जपानने माझीच मला नव्याने ओळख करून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article