बाय-बाय ‘बाय पास’

डॉ. रविकिरण बुलबुले
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

‘‘आता बायपास पूर्वीसारखे कठीण नाही.’’ दिलासा वाटला, तर कोणी म्हणाले, ‘‘कठीण दिवस येतात व जातात. खायपासला बाय-बाय करा, एखाद्या पर्यटनाला जाता तसे हॉस्पिटलमध्ये एंजॉय करा, आनंद मिळवा,’ हा ऑपरेशनकडे पाहण्याचा आगळा दृष्टिकोन मिळाला.

हृदयरोग व मधुमेह हे विकार सध्या श्रीमंत की गरीब असो, सर्वांनाच होताहेत. वृत्तपत्रांतून आपण वाचतो की, अमका तमका चांगला हिंडता-फिरता होता, तगडा होता; पण त्याच्या छातीत एकाएकी दुखू लागले, तोवर बिचाऱ्याने मान टाकली. हृदयविकाराचे मृत्यू असे चमत्कारिक असतात. असा मृत्यू ऐकला की, असे का होते, याचा विचार करण्याऐवजी आपल्यापैकी अनेकजण म्हणताना दिसतात, ‘भाग्यवान बिचारा, खितपत पडायचे, त्यापेक्षा हे बरे.’ तरी असे मरण कुणालाही नको असते. 

कॉलेजकडे परीक्षा कंट्रोल करायला सकाळी सात वाजता निघालो, तर मला हार्टॲटॅक आला. डावा हात गार पडला. छाती/पाठीत वेदना होत होत्या व घाम दरदरून फुटत होता, श्वासाला त्रास होत होता, लगेच एका प्राध्यापिकेने दवाखान्यात नेले, त्यांनी दुसरीकडे जा म्हटले, तिकडे गेलो; तर डॉक्‍टरांनी ‘दुसऱ्या हॉस्पिटलला या’ म्हटले, तिथे आयसीयूमध्ये तीन दिवस व १३ दिवस ॲडमिट राहिलो. औषधे व इंजेक्‍शनचा भडिमार झाला. त्यानंतर घरी आलो, दहा दिवस बरे होते, पुन्हा त्रास सुरू झाला. मग तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. सहा दिवस चाचण्या व औषधे... घरी आलो तर पुन्हा त्रास, घरचे घाबरलेले... तर मग चौथ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे चाचण्या व अँजिओग्राफी झाली. तीन-चार ब्लॉकेजेस्‌ होते.

‘पंधरा दिवसांत सर्जरी करावी लागेल,’ डॉक्‍टरांनी तंबी दिली. घरी परतलो. पुणे, मुंबई, बेळगाव व कोल्हापूर इथल्या दवाखान्यांबद्दल विचारणा केली. तज्ज्ञ डॉक्‍टर, अद्ययावत सुविधा, माफक खर्च, नातलगांना राहण्याची सोय, जाण्या-येण्याची व्यवस्था वगैरे सर्वांगीण विचार झाला. एकेदिवशी अचानक आकाशात वीज चमकावी तसे झाले. इंटरनेटवर रात्री हॉस्पिटल पाहिले आणि सकाळी तिथे गेलो. दवाखान्याजवळच्या घरात लाऊडस्पिकरवर ‘दिल धकधक करने लगा,’ गाणे लागलेले, संयमाने डॉक्‍टरांच्या केबिनमध्ये गेलो. सी. डी. तपासून माझ्या चाचण्या घेतल्या. येथेच ऑपरेशन करू असे ठरले.

काहीजणांना या वेदनांतून माझी सुटका होणार नाही, असे वाटत होते. धार्मिक वाचनाने व सेल्फ हिप्नॉझिमने मी धैर्य मिळवत होतो. कोणी म्हणाले, ‘‘आता बायपास पूर्वीसारखे कठीण नाही.’’ दिलासा वाटला, तर कोणी म्हणाले, ‘‘कठीण दिवस येतात व जातात. खायपासला बाय-बाय करा, एखाद्या पर्यटनाला जाता तसे हॉस्पिटलमध्ये एंजॉय करा, आनंद मिळवा,’ हा ऑपरेशनकडे पाहण्याचा आगळा दृष्टिकोन मिळाला. ऑपरेशनसाठी एकदाचा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. चौथ्या दिवशी सकाळी दहाला ऑपरेशन ठरले.

सकाळी दहा ते रात्री दहा जीवन-मरणाच्या संघर्षातील भूलमध्ये मी होतो. दहा दिवसांनंतर टाके काढले. येथून नवीन जीवन आरंभ झाले. माझ्या होमिओ औषधांनी जीवनशक्‍ती वाढवली व जखमा लवकर वाळल्या. अतिरिक्‍त वात-पित्त-कफ आयुर्वेदाने बरे केले. झोपताना रात्री विविध भारतीवरील लताजींच्या गाण्यांनी चित्तास शांत केले. मित्रांनी खाण्या-पिण्याच्या गोष्टींनी मनोबल वाढविले. घरचे मस्त कापसासारखे झेलत होते. माझी कॉन्फिडन्स बिल्डिंग करीत होते. डॉक्‍टर व स्टाफची सेवा शिकस्तीने झाली व लवकर बरा झालो. 

एका भाऊजींच्या वर्तुळातील बारा-तेरा लोक वर्षात हार्ट ॲटॅकने गेल्याने, ते ‘या हॉस्पिटलच्या जेलमधून लवकर बाहेर पडा, शुगर व खाणे सांभाळा,’ असे नित्याने सांगत. माझी हिंडफिर पाहून सर्वाधिक आनंद त्यांना झाला. पुण्या-मुंबईपेक्षा कोल्हापुरात निम्मा खर्च आला व सोयही झाली. सेवानिवृत्तीपर्यंत घरासाठी राब-राब राबलो आहे, आता घरी परतल्यानंतर जीवनशैलीत बदल केला आहे आणि ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ म्हणत समाजासाठी काही करायला पुढे सरसावलो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravikiran BulBule writes in Muktapeeth