माझं जर्मनबिर्मन

साधना हळबे
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' मधला विमानप्रवास पाहताना हसू येत होते; पण तिची झालेली गमाडीगंमत कधी तरी माझ्याही वाट्याला येईल याची कल्पनाही केली नव्हती.

श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' मधला विमानप्रवास पाहताना हसू येत होते; पण तिची झालेली गमाडीगंमत कधी तरी माझ्याही वाट्याला येईल याची कल्पनाही केली नव्हती.

एके संध्याकाळी दळण घेऊन घरी आले, तेव्हा मुलाने सांगितले, की तुझे जर्मनीचे तिकीट बुक केले आहे. तुला जर्मनीला फिरायला जायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास एकटीने करायचा आहे. क्षणभर विश्‍वासच नाही बसला. माझा एक भाचा कंपनीतर्फे जर्मनीला दोन वर्षे कामानिमित्त गेला आहे. तिथे जून ते ऑगस्टमध्ये उन्हाळा असतो म्हणून भाच्याने त्याच्या आई-बाबांना बोलावले होते. "मदर्स डे'चे गिफ्ट म्हणून माझ्या मुलाने तिकीट बुक करून एक सुखद धक्का दिला;
पण जसजसा जर्मनीला जायचा दिवस जवळ येत होता, तसतसा तोच सुखद धक्का आता मनातल्या धाकधुकीमध्ये बदलत होता. कारण, माझा प्रवास मुंबईवरून होता. एक क्षण वाटले, विमान पुण्यावरून असते तर भाच्याच्या आई-बाबांसोबत तरी जाता आले असते; पण आता प्रवास करायचा होता एकटीने. जुन्या काळातील दहावीपर्यंतच शिक्षण आणि जवळपास वीस वर्षांच्या झेरॉक्‍स ऑपरेटरच्या नोकरीत इंग्रजी भाषेचा संपर्क कधी आला नाही. तेव्हा तोडक्‍या-मोडक्‍या इंग्रजीची शिदोरी आणि पुणेरी हिंदीच्या पुरचुंडीवर सगळा प्रवास करायचा होता. जसा "इंग्लिश-विंग्लिश'मध्ये श्रीदेवीच्या मदतीला अमिताभ बच्चन येतो, अगदी तशीच माझ्या मदतीला माझ्या मुलाच्या ऑफिसमधली त्याची मैत्रीण आली. तिचे आणि माझे विमान एकाच दिवशी होते, पण वेगळ्या वेळेला. आम्ही दोघी वेळेवर मुंबई विमानतळावर पोचलो. वाटले, चला आता सगळे आपोआप मार्गी लागेल; पण सगळे सहज झाले असते तर...

चेक-इन काउंटरवर जाऊन पोचले, तेव्हा तिथे काम करणाऱ्याने माझा पासपोर्ट आणि तिकीट तपासून बघितल्यावर इंग्रजीमध्ये काहीतरी विचारले. डोक्‍यावरून जितक्‍या उंचीने विमाने जातात, तितक्‍या उंचीने त्याचे बोलणे डोक्‍यावरून गेले. फक्त दोन शब्द कळाले, ते म्हणजे "इन्व्हिटेशन लेटर.' मी म्हणाले, "नो इन्व्हिटेशन लेटर.' मग त्याने अजून एक-दोन प्रश्‍न इंग्रजीमध्ये विचारले. मला त्याची उत्तरे देता नाही आली म्हणून मग त्याने मला हिंदीमध्ये विचारले, ""आप किसके पास जा रही हो?'' मी मराठीत उत्तर दिले, ""भाच्याकडे.'' मग तो पण मराठीत बोलायला लागला. आमचे संभाषण सुरू असताना शेजारच्या काउंटरवरचा एक उंच गोरा आणि घाऱ्या डोळ्यांचा जर्मन माणूस आमच्या इथे आला आणि ते दोघे इंग्रजीत काहीतरी बोलायला लागले. दुसरीकडे माझी खूप घाबरगुंडी उडाली होती. "इन्व्हिटेशन लेटर' नाही म्हणजे आता पुढे जाता येणार नाही, असे वाटत होते. मग मी माझ्या मुलाला फोन लावला. त्याने जर्मन भाषेत त्या जर्मन माणसाला समजावून सांगितले आणि मग त्याने मला पुढे सोडले. इथे आव्हान संपले नव्हते. कारण, फ्रंकफूटमध्ये उतरल्यावर लगेच एका तासात हॅनोवरला जाणारे पुढचे विमान पकडायचे होते. सुदैवाने मुलाने आधीच व्हीलचेअर बुक केली होती. वाटले, विमानातून बाहेर पडले की लगेचच व्हीलचेअर मिळेल; पण तसे झाले नाही. कारण त्यांच्या लिस्टमध्ये माझे नावच नव्हते. मी एका हवाईसुंदरीकडून दुसरीकडे जात होते; पण कोणाकडेच उत्तर नव्हते. हळूहळू घाम फुटायला लागला. परक्‍या देशात अनोळखी माणसांत नक्की कोणाकडे मदत मागायची, हे कळत नव्हते. तोंडातून फक्त तीनच शब्द निघत होते. ""आय बुक व्हीलचेअर.'' शेवटी एका सुंदरीला काय वाटले कोणास ठाऊक. ती जवळ आली, तिने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, ""डोन्ट वरी.'' तिने एका माणसाला बोलावून त्यांच्या भाषेत चर्चा करून मला व्हीलचेअर मिळवून दिली. व्हीलचेअरवर बसले तेव्हा सुटकेचा निःश्‍वास टाकला.

पुढच्या विमानात बसण्याआधी परत एकदा चेकिंगमधून जावे लागणार होते. या वेळेला मात्र मी आधीच टॅबलेटवर ते लेटर उघडून ठेवले. काउंटरवर पोचले तेव्हा तिथे विचारायच्या आधीच मी टॅब पुढे केला. तिथल्या काउंटरवरच्या बाईने मला रिटर्न तिकिटाबद्दल विचारले, तेव्हा तिकीट असूनसुद्धा नकळतपणे तोंडातून निघाला "नो तिकीट.' खरे तर या उत्तरामुळे समस्या निर्माण होऊ शकली असती; पण तसे झाले नाही आणि तिने पुढे जाऊ दिले.

त्या व्हीलचेअर ढकलणाऱ्या माणसाने मला एकदम व्यवस्थित पुढच्या विमानाच्या ठिकाणी नेऊन सोडले. मी त्याला भारतीय संस्कृती दर्शवणारी एक भेटवस्तू दिली. ती त्याला खूप आवडली. तिथून हॅनोवरला पोचल्यावर मी माझ्या भाचेसुनेचा चेहरा बघितला, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. मुलाने जर न विचारता तिकीट बुक केले नसते तर हा अनुभव कधीच मिळाला नसता. एखाद्या प्रसंगावर आधारित चित्रपटाची निर्मिती होते, तसाच एखाद्या चित्रपटातील प्रसंग प्रत्यक्षही घडू शकतो. श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' बघताना तसा काही प्रसंग कधी मला अनुभवायला मिळेल अशी कल्पना केली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sadhana halbe write article in muktapeeth