प्रवास पाहावा करून...

प्रवास पाहावा करून...

रात्रीच्या ट्रेनने दूर प्रवासाला जायचे असेल, तर आपण बर्थचे आरक्षण करतो. पण, बर्थ मिळाली म्हणजे झोप मिळेलच, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक. झोप मिळायला तुमचे नशीब खूपच जोरावर पाहिजे.यंदा दिवाळीला मुलाकडे बंगळूरला जायचे नियोजन केले होते. अभिजितने आमचे दोघांचे ऑनलाईन रिझर्व्हेशन करून पाठविले होते. डब्याच्या दोन्ही टोकांकडच्या सीटस्‌ असतील तर टॉयलेटचा वास येतो म्हणून त्याने डब्याच्या मध्यावरच्या व त्याही दोन्ही बर्थस्‌ खालच्या निवडल्या होत्या (आमचे वय लक्षात घेऊन). एकूण आम्ही खुशीत होतो.

‘राणी चन्नम्मा’ कोल्हापुरातून त्या दिवशी दोन तास उशिरा सुटली. त्यामुळे बेळगावला पोचायला नऊ-साडेनऊ झाले. बेळगावला सात-आठ कानडी तरुणांचे टोळके डब्यात चढले. बर्थचे नंबर शोधत-शोधत ते नेमके आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन बसले. सर्व जण साधारण एकाच वयोगटातले. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन. एक-दोघांकडे लॅपटॉप. ते सर्वजण कुठल्या तरी एकाच कंपनीसाठी काम करणारे असावेत, असा मी त्यांच्या बोलण्यावरून अंदाज बांधला (मला कानडी थोडेफार समजते सौ.मुळे). बंगळूरला त्यांच्या कंपनीचे वर्कशॉप वगैरे असावे. त्यासाठी ते सर्व जण निघाले होते.

डब्यात आल्यापासून त्यांच्या बोलण्यात एकच विषय होता, त्यांच्या कंपनीने लोकांना गंडविण्यासाठी काढलेली नवीन स्कीम! मोबाईलवरही त्यांना फोन येत होते व फोनवरही त्या स्कीमची माहिती ते लोकांना देत होते. प्रथम तुम्ही इतके पैसे भरून कंपनीची मेंबरशिप घ्यायची. मग बॅंकेत अकाउंट उघडायचे. त्यासाठी तुमचे पॅनकार्ड व आधारकार्ड लागेल. मग तुम्ही इतके पैसे अकाउंटवर भरायचे. ऑनलाईन खरेदी करायची. त्याचे कमिशन तुमच्या अकाउंटवर आपोआप जमा होत जाईल. तुम्ही एक-दोन वर्षांतच लक्षाधीश व्हाल वगैरे-वगैरे. त्यांच्यासमोरच्या सीटवर कानडी-इंग्रजी समजणारा एक मध्यमवयीन गृहस्थ. त्याने त्यांच्या स्कीममध्ये थोडासा इंटरेस्ट दाखविला; तर कंपनीवाल्याने लगेच आपला लॅपटॉप काढून त्याला पुरते हैराण केले. मासा गळाला लागलाच, असे कंपनीवाल्याला वाटले. पण, तो गृहस्थ हुशार. ‘‘स्कीम चांगली आहे; पण मला आता लगेच पैसे गुंतविणे शक्‍य नाही,’’ असे सांगून तो हुबळीला उतरून गेला. त्यांच्या कानडी कम्‌ इंग्रजी गप्पा ऐकत-ऐकत आम्ही आमचे जेवण उरकून घेतले.

खिडकीजवळचे छोटे टेबल आम्ही जेवणासाठी उघडले होते. तेथे त्यांना जेवण करणे सोयीचे होईल म्हणून आम्ही दोघे पॅसेजच्या दुसऱ्या बाजूला दोन सीटस्‌ असतात, तेथे जाऊन बसलो व त्यांना आमच्या जागेवर बसून जेवण करण्यास सुचविले. त्यांच्यातल्याच एकाने त्याबद्दल आमचे आभारही मानले. त्यांच्यातला एक मेंबर वगळता बाकीच्यांचे जेवण लवकर आटोपले. पण, त्या एका मेंबरचे जेवण काही लवकर आटपायचे चिन्ह दिसेना. टेबलवर पोळी-भाजीचे डबे ठेवून त्याचे अगदी आरामात जेवण सुरू होते. सात-आठ तरी पोळ्या त्याने फस्त केल्या असतील. त्याचे जेवण झाले, असे आम्हाला वाटले. पण छे!  त्याने दुसऱ्या एका पिशवीतून भाताचा मोठा डबा काढला. दुसऱ्या डब्यात आमटी. मग त्याचे भात-आमटी खाणे सुरू झाले. त्याचे जेवण कधी एकदा संपते, असे आम्हाला झाले होते. कारण ११ वाजून गेल्याने आम्हाला आता झोप येऊ लागली होती. त्यांना आमच्या जागेवर बसून जेवण करा, असे सांगून चूक केली, असे वाटू लागले.

शेवटी एकदाचे ‘त्या’चे जेवण झाले. आम्ही आमच्या बर्थचा ताबा घेतला व झोपण्याची तयारी केली. त्यांच्या मोठ्या आवाजातल्या कानडी कम्‌ इंग्रजी गप्पा पुन्हा सुरू झाल्या. झोप लागणे शक्‍यच नव्हते. बरं, त्यांना काही सांगायला जावे तर त्यांच्यातले कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हते. आम्ही गप्प राहणेच पसंत केले. जनरल डब्यात बसलेले त्यांचे आणखी दोन मित्रही आमच्या इथेच आले. त्यांच्या सहा बर्थवर ॲडजेस्ट करून ते आठ जण झोपले. म्हणजे फक्त आडवे झाले. वरच्या बर्थवर दोघांनी आपली डोकी एका बर्थवर व पाय दुसऱ्या बर्थवर असे ‘अधांतर कटी’ आसन केले होते. त्यांच्या गप्पा मात्र अखंड सुरू होत्या.

रात्री दीडच्या सुमारास टी.सी. आला. त्याने त्या दोन ‘अधांतरी’ मित्रांना त्यांचे रिझर्व्हेशन नसल्याने जनरल डब्यात पाठवले. दरम्यान, आमच्या कंपार्टमेंटमध्ये चाललेल्या मोठ्या आवाजातील गप्पांबद्दल बाजूच्या कोणीतरी त्या टी.सी.कडे तक्रारही केली असावी आणि त्याने त्या लोकांना कानडीत झापले असावे. कारण त्यानंतर गप्पा एकदमच बंद झाल्या. मग पहाटे पाच- सकाळी सहापर्यंत आम्हाला थोडी झोप मिळाली.

बंगळूरहून परत येतानाची कथा आणखी वेगळी. आमच्या रिझर्वेशनच्या डब्यात पॅसेजमध्ये जिकडे-तिकडे माणसे झोपलेली. टी.सी.नेच त्यांना तसे झोपावयास सांगितलेले. पण, तक्रार तरी कोणाकडे करणार? आमच्या खालच्या दोन बर्थच्या मधेही जमिनीवर दोन जण निजलेले. मी पहाटे पाचला टॉयलेटकडे जाण्यासाठी उठलो तर मला खाली पाय टाकायलाही कुठे जागा दिसत नव्हती! एकूण काय, प्रवास पाहावा करून, एवढे मात्र खरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com