पिलांची दूधआई

सुभाष कौलगेकर
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मांजरी आम्हाला आवडत नाहीत. पण दूधपित्या पिलांची आई हरवली आणि त्या पिलांना दूध पाजून जगवण्याची जबाबदारी अंगावर आली.

मांजरी आम्हाला आवडत नाहीत. पण दूधपित्या पिलांची आई हरवली आणि त्या पिलांना दूध पाजून जगवण्याची जबाबदारी अंगावर आली.

एका मांजरीने दोन-तीन वेळा घरात येण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तिला घरात येऊ दिले नव्हते. परंतु एकेदिवशी पहाटेच्या सुमारास व्हरांड्याच्या जिन्याखालून काही आवाज येऊ लागला. मधला दरवाजा उघडून बघतो तर तीच मांजर आपल्या तीन पिलांसह जिन्याखालील जागेत शांतपणे झोपली होती. टेरेसच्या लोखंडी दाराच्या फटीतून तिने व्हरांड्यात प्रवेश मिळविला होता. आता फक्त पुढील व जिन्याजवळील मधला दरवाजा जाता-येता बंद करून घेणे एवढेच आमच्या हातात होते. मांजर जास्तीत जास्त वेळ आपल्या पिलांजवळ थांबत होती. फक्त दिवसातून दोन-तीन वेळा बाहेर जाऊन येत असे. परंतु एका रात्री पिलांच्या ओरडण्याने आम्हाला जाग आली. जिन्याखाली डोकावलो, तर फक्त पिलेच जागेवर दिसत होती. मांजर बाहेर गेली असेल, येईल थोड्या वेळाने असा विचार करून आम्ही जास्त लक्ष दिले नाही. पण नंतर ती परलीच नाही.

नुकतीच डोळे उघडलेली पिले, अजून धड चालताही येत नसल्याने जागच्या जागी हालचाल करत भुकेने ओरडत होती. त्यांचे असे केविलवाणे ओरडणे ऐकवेना. त्या पिलांना ड्रॉपरच्या साह्याने दूध पाजू लागलो. जवळ जवळ दहा-पंधरा दिवस त्यांना दूध पाजणे चालू ठेवले. चाळीच्या बाहेरील फरशी टाकलेल्या मोकळ्या जागेत आमचा हा कार्यक्रम चालायचा. आम्ही एकेकाला एकदम दूध न पाजता थोडे थोडे दूध आळीपाळीने पाजत होतो. चाळीतल्या छोट्या छोट्या मुलींना या पिलांचे फार आकर्षण. त्यामुळे दूध पाजण्याच्या वेळी या मुली आमच्या भोवती जमा होत असत. तिन्ही पिलांचा रंग सर्वसाधारण राखाडी वर्णावर होता. त्यामुळे कुणाला दूध पाजवून झाले हे कधी कधी आमच्या ध्यानात येत नसे. एकाला दूध पाजवून दुसऱ्याला उचलून घेतले की त्या छोट्या मुली एकदम "आबा, त्याला मघाशीच दूध पाजवून झालंय, आता याचा नंबर' म्हणून ओरडायच्या. थोडी मोठी होऊन धावणारी ही पिले आम्ही राहात असलेल्या ठिकाणची अविभाज्य घटक बनली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subhash kaulgekar write article in muktapeeth