सत्‍याची कालातीतता

MahatmaGandhi
MahatmaGandhi

या वर्षीचा स्‍वातंत्र्यदिन अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍यात आला. दरवर्षी मुलांची प्रभात फेरी गावातून घोषणा देत निघायची. घोषवाक्‍यांच्‍या निनादाने सारा आसमंत दुमदुमून निघायचा. ‘एक रुपया चांदीका, देश हमारा गांधीका’. मात्र यावेळी विराण शांतता.

प्रत्‍येकाने एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेऊन विद्यार्थ्‍यांविना ‘स्‍वातंत्र्यदिन चिरायू होवो’ च्‍या घोषणा दिल्‍या. कार्यक्रमाकरिता काढलेली महात्‍मा गांधींची प्रतिमा पुन्‍हा भिंतीवर टांगल्‍या गेली. बापू आज खूप खिन्‍न दिसत होते. नेहमी हसरा दिसणारा त्‍यांचा चेहरा, आज उदासवाणा वाटत होता. कदाचित माझ्यातील काळोखाचे प्रतिबिंब त्‍यांच्‍या प्रतिमेवर पडल्‍याने, मला तसा भास झाला असावा. बापू नावाच्‍या किरकोळ शरीरयष्‍टी असणा-या माणसाचे अद्वितीय कार्य डोळ्यांसमोरून तरारून गेले. प्रत्‍येकाने स्‍वतःच्‍या आयुष्‍याला संचारबंदी लावून घेतलेल्‍या वर्तमानात, बापूंच्‍या विचारांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.

जिथे सत्‍य आणि न्‍यायाची मागणी होते, तिथे बापूंच्‍या विचारांची आठवण होते. एखादा मोर्चा, उपोषण असले म्‍हणजे बापूंच्‍या प्रतिमेची निकड समाजाला प्रचंड जाणवू लागते. महात्‍मा गांधींनी मांडलेल्‍या विचारांची व्‍याप्‍ती फार मोठी आहे. गांधीवादाची इतर वैचारिक चळवळींसारखी सैद्धांतिक स्‍वरुपाची मांडणी नाही. गांधींच्‍या विविध विचारांना आपण गांधीवाद संबोधत असतो. ख-या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्‍याने बापूंनी ‘खेड्यांकडे चला’ अशी हाक दिली. कृषीप्रधान भारतातील बहुसंख्‍य खेडी एकेकाळी स्‍वयंपूर्ण होती. या विधायक कार्याची व्‍याप्‍ती खूप मोठी होती; याचे महत्‍त्‍व आजच्‍या घडीला कळले. खेडी सक्षम झाली की, गावातच रोजगारांची निर्मिती होईल. शहरांकडे होणारे स्‍थलांतरण थांबवता येईल. याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली. लॉकडाऊनमुळे शहरांत गेलेल्‍या कामगारांना गावाकडे परतावे लागले. शेकडो किमीच्‍या प्रवासाची पायपीट घडली. सर्वांना आपले गाव आठवले. बापूंनी गावाच्‍या सक्षमीकरणाकरिताच ‘गावांकडे चला’ म्‍हटले होते. गाव आत्‍मनिर्भर झाले म्‍हणजे, देश स्‍वयंपूर्ण होईल.

पण, त्‍यांच्‍या ग्राम विचारांचा विपर्यास केला गेला. गावाकडे जाणे म्‍हणजे अधोगतीकडे जाणे. त्‍यापेक्षा शहरांकडे चला. गावात नापिकी, दुष्‍काळ, नियोजन शून्‍य सरकारी धोरण, उच्‍च शिक्षण घेण्‍याकरिता शाळा उपलब्‍ध नसल्‍याने येथील तरुण; रोजगार व शिक्षणाकरिता शहरांकडे वळला. गाव ओस पडत गेली. शेतक-यांची व्‍यथा जाणून घेणारी संवेदना नष्‍ट होत गेली. शहरं विस्‍तारली. बापूंच्‍या स्‍वप्‍नातील गाव काळाच्‍या पडद्याआड गेलं. बापूंच्‍या मूलोद्योगी शिक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण, हस्‍तव्‍यवसायाचा कलात्‍मक विकास, खादी वस्‍त्राचे जागतिकीकरण करून देशाचा पायाभूत विकास साधता आला असता.

‘स्‍वदेशी’ म्‍हणायला तसं खूप सोप असते. मात्र जगायला कठीण. गांधींची ‘स्‍वदेशी’ संकल्‍पना केवळ आर्थिक विकासाशी संबंधित नव्‍हती, तर समग्र जीवन व्‍यवहारातून स्‍वावलंबन, स्‍वायत्‍तता, ऐक्‍यभाव अनुभवायचा होता. स्‍वावलंबनातून उद्याच्‍या उद्योगशील भारत निर्माणाचे स्‍वप्‍न बघितले होते. म्‍हणून, त्‍यांना ग्रामोन्‍नती महत्‍त्‍वाची वाटत होती. आपल्‍या शेजारच्‍या चीन देशाने गावं सक्षम केली. गावात उद्योग उभे केले. त्‍यामुळे शहरीकरणांचा वेग मंदावला. स्‍थानिकांना रोजगार उपलब्‍ध झाल्‍याने, स्‍थलांतरणाने निर्माण होणा-या समस्‍यांना आळा बसला. आपल्‍या देशातील राजकीय सत्‍तापिपासुंनी शहरं चकाचक केलीत आणि गाव भकास. अजूनही गाव विकासाच्‍या वाटेवर डोळे अंथरून बसले आहे. महासत्‍तेच्‍या मुळांचा शोध अजूनही आपल्‍या व्‍यवस्‍थेला लागलेला दिसून येत नाही.

समाजातील अनेक ढोंगी बगळ्यांनी बापूंच्‍या नावाचा वापर स्‍वतःचे पोट भरण्‍यासाठी केला. बापू कृतिशील होते. गांधीवादी म्‍हणवून घेणा-या एका गृहस्‍थाच्‍या विचारांने मी मध्‍यंतरी प्रभावित झालो होतो. अंगात खादी परिधान केल्‍याने, आपण गांधीवादी झालो. असा अनेकांचा गोड गैरसमज होतो. त्‍यांची NGO होती. खोटी समाजसेवा करणारी माणसं फार प्रेमळ व साधी असतात. ते गृहस्‍थ आम्‍हाला नेहमी तत्‍त्‍वज्ञान सांगायचे. इतरांच्‍या पोरांनी घरदार सोडून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा त्‍यांचा आग्रह असायचा. संस्‍थेचे केवळ पाच हजार रुपये मानधन घेऊन समाजासाठी काम करतो, असे ते मोठ्या अभिमानाने सांगायचे. हळूहळू त्‍यांच्‍यातील खरा माणूस उलगडत गेला. त्‍यांच्‍या NGOतील गौडबंगाल कळायला लागले. त्‍यांनी आपली मुलं उच्‍च शिक्षणाकरिता महानगरात ठेवली होती. अमाप संपत्‍ती जमवली होती.

उंचावलेल्‍या आर्थिक आलेखाबाबत एकदा मी त्‍यांना प्रश्‍न केला. तेव्‍हा ते म्‍हणाले, हे सर्व माझ्या मित्रांनी प्रेमापोटी दान केलं आहे. मला वाटायचे असे मित्र प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात लाभायला हवे. ज्‍या बापूंनी आपल्‍या अपत्‍यांचा विचार न करता भारतीयांसाठी हौतात्‍म्‍य पत्‍करले, ते कुठे? आणि त्‍यांच्‍या विचारांचे भांडवल करून जगणारे पांढरपेशी बगळे कुठे? मला वाटत नाही, अशा माणसांना गांधी कळला असावा.

अलीकडेच एक बातमी वाचनात आली. महात्‍मा गांधींच्‍या पुतळ्यांची मागणी रोडावत चालली आहे. पुतळ्यांची संख्‍या वाढल्‍याने एखादा विचार समाजाच्‍या असंख्‍य माणसांपर्यंत पोहचतो असे नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्‍यातील वाद अजूनही पाचवीला पुजलेला. मात्र, गांधी आणि आंबेडकर यांच्‍यातील समानतत्‍त्‍वे, राष्‍ट्र भूमिका लोकांना पटवून देण्‍यात दोन्‍ही बाजूंचे कट्टरवादी अपयशी ठरले आहेत.

परवा परवा कर्मचा-यांच्‍या बदल्‍यांचे खूळ सरकारच्‍या डोक्‍यात कुठून शिरले माहीत नाही. माणसांचे जगणे कठीण झालेले असताना, सरकार मायबाप नानाविध गमतीदार प्रयोग करीत असते. आजकाल बदल्‍या सोप्‍या राहिल्‍या नाही. ओवर इन्‍कम नसणा-या शिक्षकांच्‍या बदल्‍या लाख दोन लाखाच्‍या घरात पोहचल्‍या. मी दोन शिक्षकांचे संभाषण ऐकत उभा होतो. त्‍यापैकी एक म्‍हणाला, बदली करणं सोप्‍प झालं आहे. गांधी दिला की, बदली लवकर होते. सुरुवातीला मला अर्थबोध झाला नाही. मग लक्षात आल्‍या, रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या चलनी नोटा. गांधींच्‍या सत्‍याग्रही तत्‍त्‍वांची किती मोठी विटंबना? बापूच्‍या हयातीत त्‍यांची प्रतिमा असलेल्‍या नोटा चलनात असत्‍या तर, त्‍यांनी रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या गव्‍हर्नर विरोधात आत्‍मक्‍लेष आंदोलन उभे केले असते. सूज्ञ म्‍हणवून घेणा-या पिढीने सुद्धा गांधी हे जागतिक शस्‍त्र समजून घेतले नाही. हे आमचे दुर्भाग्‍य. बापूंना खादीच्‍या वस्‍त्रात किंवा काळ्या कोटात नोटांवर शोभून दिसायचे नव्‍हतेच. दीनदुबळ्यांत कृष्ण,बुद्ध,येशू होऊन जगायचे होते.

गांधींचा धर्म सर्वधर्म समभावाचा होता. सत्‍य, अहिंसा आणि निसर्ग-ईश्‍वर ही जीवन तत्‍त्‍वे; भारतीय बुद्ध, जैन, हिंदू परंपरेशी नाते सांगणारी होती. कर्मठ सनातनी विचारांना सुधारणावादी मूल्‍यांची जोड देणारे ते खरे संत होते. त्‍यांचे जीवन हेच खरे प्रयोग होते. गांधींचा विचार सामाजिक करायला त्‍यांचे अनुयायी अपयशी ठरले आहेत.

गांधी जीवनवादी द्रष्‍ट्ये होते. ते सतत प्रयोगशील होते. आपले विचार पुस्‍तकांत टिपून ठेवायला प्रयोगशील लेखक नव्‍हते. मला बापू अनेकांच्‍या चेह-यात दिसले. खंगत चाललेल्‍या शरीराला ‘आत्‍मनिर्भर हो’ म्‍हणणे सोपे नसते. बापूंच्‍या स्‍वावलंबन तत्‍त्‍वांची निकड काळाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर पडणार आहे. आरोग्‍य, शिक्षण आणि तंत्रज्ञानातील परालंबित्‍व देशाला ‘अच्‍छे दिन’ देऊ शकत नाही. देशाच्‍या वैभव प्राप्‍तीसाठी बापूंच्‍या देशीयवादी विचारांना आधुनिकतेची जोड देणे काळाची गरज आहे. बापू ढोंगी व्‍यवहाराच्‍या चलनातील नाणं नाही. बापू मानव निर्मितीचे चिरस्‍थायी विद्यापीठ आहे, याची कालातीतता सत्‍य वर्तनाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर ठेवणे काळाची गरज आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com