मायची सावली

ऊर्मिला कारेकर
बुधवार, 13 जून 2018

माझ्या आणि आईच्या नात्यात विलक्षण ऋणानुबंध होते. आईने सख्ख्या मुलांसह सावत्र मुलांनाही तितक्‍याच मायेने वाढविले. परिस्थितीनुरूप ती शिकत गेली.

माझ्या आणि आईच्या नात्यात विलक्षण ऋणानुबंध होते. आईने सख्ख्या मुलांसह सावत्र मुलांनाही तितक्‍याच मायेने वाढविले. परिस्थितीनुरूप ती शिकत गेली.

मला आईची तीव्रतेने आठवण झाली आणि मी अस्वस्थ झाले. तिचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील नीरा रेल्वे स्टेशन मास्तरच्या चाळीत नुकतेच राहावयास गेले होते. आई, वडील आणि चार भावंडे असे कुटुंब होते. एकदम नियतीने घात केला. तापसरी आली. दहा-बारा तासांत एका पाठोपाठ एक तिची तीनही भावंडे गेली. प्रत्येक घरात अशीच काहीशी स्थिती, प्रेत हलविण्यास कोणीही यायला तयार नाही, अशी दुःस्थिती होती. गावातील काही तरुण मुलांनी बैलगाडी आणली. त्यात आधीच काही शव होती. आई दारात सुन्न होऊन रडत उभी होती. तिच्या तीनही मृत भावंडांना त्या तरुणांनी आणलेल्या गाडीतून नेण्यात आले. या धक्‍क्‍याने माझी आजी (आईची आई) वेडी झाली. त्यामुळे आजोबांना आईची मोठी काळजी लागून राहिली. एक-दोन महिने गेले, एक दिवस दुपारी शेजारच्या बाईंनी माझ्या आईला नऊवारी साडी नेसवली आणि म्हणाल्या, ""तुला बघायला येणार आहेत, नीट उत्तरे दे.'' बारामतीच्या गणुकाका दातेंशी दुसरेपणाला तिचे लग्न झाले. त्यांना आधीची एक-दोन मुले आहेत, हे लग्न ठरल्यावर समजले. आई बारामतीला दात्यांच्या घरी गेल्यावर एका बाईने ओटी भरली आणि दोन महिन्यांचे एक तान्हे मूल तिच्या मांडीवर ठेवले. "हा तुझा धाकटा मुलगा, आता ह्याला तूच सांभाळायचे.' तीन मुलगे आणि तीन मुली. आई बघतच उभी राहिली. त्यातील मोठी मुलगी चौदा वर्षांची. आईला रडू फुटले. आपल्या कोणीही ओळखीचे नाही. नवरा कसा आहे, हेही नीट माहिती नाही. त्या आत्याबाईंनी सांगितले की, "तुझा नवरा जमदग्नी आहे. त्याच्याशी जास्त वाद घालू नको.' तान्हा महिन्याच्या आतच गेला. आईला वर्षभरातच मुलगा झाला. दर दीड वर्षाने मुले होत होती. एकूण सात मुले झाली. म्हणजे आम्ही एकूण अकरा जण.

आईच्या पायगुणाने लक्ष्मी प्रसन्न झाली. माझ्या वडिलांना अमाप पैसा मिळाला. आईने सावत्र मुलांची लग्ने लावून दिली. तेव्हा मोठ्या दोन मुलांच्या ताब्यात शेती देऊन वडिलांनी आम्हा सख्ख्या पाच भावंडांसह आईसोबत पुण्याकडे प्रस्थान ठेवले. नारायण पेठेतील एका चाळीत भाड्याने जागा घेतली. एक दिवस आईने वही आणली आणि म्हणाली, "मला लिहायला शिकवं.' थोड्या दिवसांनी वडिलांना समजले, त्यांनी ती वही घेऊन फेकून दिली. "शिकून काय करायचे? त्यापेक्षा घरात काम करा.' मला खूप राग आला. मी तिला एक पाटी घेऊन दिली. म्हणाले, "लिही आणि पुसून टाकत जा, म्हणजे काकांना कळणार नाही. काहीच बोलू नकोस; पण तुला करायचे असेल ते तू कर. जरा स्वतःचे आयुष्य जग.' मी तिला आइस्क्रीम खायला, उसाचा रस प्यायला चोरून नेत असे. आता ती सोईस्करपणे नवऱ्याच्या कटकटीकडे दुर्लक्ष करायची. वडील गेले त्या वेळी ती अवघी 44 वर्षांची होती; पण तिला थोडे "सोशल लाइफ' मिळाले होते. तिला डेक्कन जिमखान्यावर "दाते काकू' म्हणून लोक ओळखू लागले होते.
दरम्यान, मी आंतरजातीय विवाह करण्याचा इरादा जाहीर केला. सर्वांनी खूप विरोध केला. "तू माझी एकटीच मुलगी आहेस, तूच माझा आधार आहे, मला डॉ. कारेकरांना भेटायचे आहे. त्यांना काही विचारायचे आहे.' असे आईने मला सांगितले. त्यांच्या भेटीत ती खूप समंजसपणे त्यांच्याशी बोलली. डॉ. कारेकर यांनी आईला सांगितले, ""अहो, मी मध्यम वर्गातला माणूस आहे. स्वतः कष्ट करून एम.एस्सी, पीएच.डी. पर्यंत शिकलो आहे. परदेशात जाऊन संशोधन अनुभव घेऊन आता प्राध्यापक म्हणून कार्य करणार आहे. तुमची मुलगी मला आवडली म्हणून तिला मागणी घातली. आम्ही दोघांनी मनापासून संसार करावयाचे ठरवले आहे.'' आईने शेजारी डॉ. वाय. व्ही. फाटक राहायचे, त्यांना सल्ला विचारला. डॉ. फाटकांनी "जातीचा विचार करू नका. लग्न लावून टाका', असे समजावले.

आमच्या लग्नानंतर ती चातुर्मासात पंढरपूरला जात असे. डॉ. कारेकर तिला पंढरपूरला नेत. पुढे कोर्टात जाऊन डेक्कन जिमखान्यावरील घर मी तिला मिळवून दिले. मध्यंतरी तिला गंभीर आजार झाला तेव्हा तिची शस्त्रक्रिया व सेवा करण्यात मी कोठेही कमी पडले नाही. वयोमानाप्रमाणे ती भजन, कीर्तनात दिवस काढत होती. त्यानंतर सात-आठ वर्षांनी तिचे निधन झाले.

आता माझ्या 82 व्या वर्षी मी आईच्या स्वभावाविषयी विचार करते, तेव्हा तिला कोणाचीच माया, प्रेम, लळा का नव्हता, या प्रश्‍नाचे उत्तर सापडते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila karekar write article in muktapeeth