दीपज्योती नमस्तुते।

विजयालक्ष्मी भणगे
शनिवार, 22 जुलै 2017

आपल्याला उष्णता व प्रकाश देणाऱ्या सूर्याचे लहानसे रूप म्हणजे दीप. या दिव्याच्या उजेडातच माणसाने संस्कृतीच्या वाटेवर एक एक पाऊल टाकले आहे.

आपल्याला उष्णता व प्रकाश देणाऱ्या सूर्याचे लहानसे रूप म्हणजे दीप. या दिव्याच्या उजेडातच माणसाने संस्कृतीच्या वाटेवर एक एक पाऊल टाकले आहे.

आषाढी अमावस्येला "दिव्याची अवस' असे म्हणतात. अमावस्येला आपण अशुभ मानतो. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरवात त्या दिवसापासून आपण सुरू करीत नाही. पण अमावस्या कधीही अशुभ नसते. आम म्हणजे पूर्ण आणि आवस म्हणजे चिंतनशीलता. अमावस्येइतके सुंदर नक्षत्रांचे आकाश आपणास कधीही पाहायला मिळत नाही. या सुंदर नक्षत्रांच्या चिंतनशीलतेमध्ये जो दिवस आपण घालवतो, ती अमावस्या. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अमावस्या ही बुद्धी देणारी आहे, तर पौर्णिमा रूप देणारी आहे. म्हणून असे म्हटले जाते, की मुलगा अमावस्येला व्हावा आणि मुलगी पौर्णिमेला व्हावी. तसेच अमावस्येला रवी आणि चंद्र यांची युती असते. रवी म्हणजे आत्मा व चंद्र म्हणजे मन. मन आणि आत्मा यांची युती असलेला अमावस्येचा दिवस अध्यात्माच्या दृष्टीने, ध्यानाच्या दृष्टीनेसुद्धा चांगला योग आहे.
आषाढ वद्य अमावस्येला टवळी अमावास्या किंवा गटारी अमावस्या असे सुद्धा म्हणतात. "टवळी' याचा अर्थ "गतधवा'. जिचे वैभव, तेज संपलेले असते अशा विधवा स्त्रीला गतधवा असे म्हणतात. अमावास्येला चंद्राचे तेज संपलेले असते म्हणून ती टवळी अमावास्या होय. तसेच तिला गटारी अमावास्या असेही म्हणतात. कारण आता पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्य वर्ज्य असते, म्हणून या अमावास्येला हे लोक इतके मद्य प्राशन करतात, की त्यांची गटारांत लोळण्याइतकी अवस्था होते. या दिवशी कंदील, समई (ढाणवई), चिमणी (सुंदरी) यांची पूजा करावी. पाटाभोवती रांगोळी काढून गहू पसरावेत. हळद-कुंकू, फुले, ज्वारीच्या लाह्या वाहून पूजा करावी. नैवेद्यासाठी कणकेचे किंवा बाजरीचे गोड दिवे करावेत. एका अमावास्येलाच आपण लक्ष्मीपूजन करीत असतो. त्या दिवशी लक्ष्मी स्वतःच्या पावलांनी प्रत्येकाच्या घरी जात असते. म्हणजे ज्या अमावास्येला प्रत्यक्ष लक्ष्मी येते तो दिवस अशुभ कसा? म्हणून अमावास्या कधीही अशुभ नसते.

ज्या वेळेला आदिमानवाला अग्नीचा शोध लागला, त्या दिवशी त्याने संस्कृतीच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले. त्याच्या लक्षात आले, की अग्नीमध्ये उष्णता व प्रकाश या दोन अमोघ शक्ती आहेत. तेव्हा त्या त्याने वेगळ्या केल्या आणि त्या प्रकाशरूपातून दीप प्रगटला. "दिव्या दिव्या दीपोत्कार' असे म्हणत आम्ही लहानांचे मोठे झालो. दिवा हा खऱ्या अर्थाने प्रकाश देणारा आहे. मार्गदर्शक आहे. स्वतः जळत राहून प्राणिमात्रांना प्रकाश देतो. आपल्या सगळ्यांचे जीवन एक ज्योत आहे. म्हणून आपण त्याला "जीवनज्योत' म्हणतो. "तमसो मा ज्योर्तिगमय' याचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. अंधार-प्रकाश, सुख-दुःख, तृष्णा-शांती; क्रोध-आनंद या द्वंद्वाच्या पलीकडे नेणारा आहे. मानवाच्या जातकर्मापासून उत्तरक्रियेपर्यंत सगळ्या गोष्टींचा दीप हा साक्षीदार असतो. इतके मानवाचे आणि दिव्याचे अतूट नाते आहे. म्हणून आपण म्हणतो, "दीपज्योती परब्रह्म.'

या दिव्यांचे अनेक प्रकार आहे. दिवटीपासून दीपस्तंभापर्यंत, निरंजनापासून दीपमाळेपर्यंत, पणतीपासून आकाश दिव्यांपर्यंत, कंदिलापासून दीपगृहापर्यंत. पणती ही कधीच थकत नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत तेजस्वी असते. "शुभं करोती कल्याणम्‌' असे म्हणून कल्याण प्रदान करणाऱ्या दीपज्योतीने आपण अनेक वेळा औक्षण करतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी, कल्याणासाठी औक्षण करतो. भाऊबिजेला, रक्षाबंधनाला भावाच्या कल्याणासाठी, वसुबारस, पोळा या दिवशी त्यांच्या कल्याणासाठी, दसऱ्याच्या दिवशी वीर पतीला त्याच्या शौर्यासाठी व रणांगणावर निघालेल्या पतीला औक्षणामधून आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, हे ती सांगत असते. तर सासरी आलेल्या नव्या नवरीला तिच्या रूपाने लक्ष्मी घरी आली म्हणून औक्षण केले जाते. औक्षणातील तबकातल्या दिव्यांचे तेज हे तेजस्वी अन्‌ मनमोहक भासते. त्याप्रमाणे औक्षण केलेल्या व्यक्तीचेही आत्मतेज झळझळीत व इतरांचे मन मोहून टाकणारे असावे, अशी सुंदर भावना त्या मागे असते.
हल्ली या तेलातुपांच्या जागी डोळे दिपविणारे विजेचे दिवे आहेत, त्याने मन बहिर्मुख होते. तर तेलातुपांच्या दिव्यांमधून ज्या सूक्ष्म लहरी निघतात त्याने मन अंतर्मुख होते. मातीच्या पणतीचे सौंदर्य अभिजात असते. मातीचा गंध ती भरभरून देते. पणती गोठ्यांत ठेवली तर गाईच्या डोळ्यातील आरती लाघवी दिसते. तीच पणती तुळशी वृंदावनांत ठेवली तर तुळस ही सासुरवाशिणीची सखी वाटते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे दिवे पाण्यात सोडतो, त्याचा भावार्थ असा, की आपल्या अंतरंगातील कामक्रोधादी विकार त्या पुण्यसलिलामध्ये सोडून कोणताही वेडा वाकडा भाव किल्मीश मनामधून काढून टाकायचे.

या पणतीने म्हणे सूर्याला अभिवचन दिले, की माझ्या शक्तीनुसार प्रकाशाचा हात धरून अंधाराला पळवून लावेल आणि तिने तिचे अभिवचन पाळले. त्या छोट्याशा पणतीप्रमाणे आपण आपल्या स्वतःलाही अभिवचन देऊ शकतो, की या भ्रष्ट परिस्थितीशी, अंधारलेल्या भवितव्याशी, दहशतवादाशी मी माझ्या शक्तीनुसार लढेन आणि या काळाबाजार, लाचलुचपत, भ्रष्टाचाराचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेन.

Web Title: vijayalaxmi bhange write article in muktapeeth