गोष्ट समाजसेवेसाठी चालण्याची...

वृंदा सहस्रबुद्धे
गुरुवार, 15 जून 2017

व्यायामासाठी लोक चालतात. अगदी गटागटानेही चालतात; पण ऑस्ट्रेलियात काही गट चालले ते समाजसेवेसाठी निधी उभा करण्यासाठी. या उपक्रमाची तयारी सहा महिने आधी सुरू झाली होती.

ओक्‍स्फेम ऑस्ट्रेलिया या स्वयंसेवी संस्थेतर्फे दीर्घकालीन विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या तातडीच्या गरजा भागवणे, त्यांना समान नागरी हक्क आणि दर्जा मिळवून देणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरक्षितता देणे असे उपक्रम अमलात आणले जातात. यासाठीच्या निधी उभारणीसाठी एप्रिलमध्ये "ओक्‍स्फेम ट्रेलवॉकर' मेलबर्न हा उपक्रम आयोजिण्यात आला होता.

व्यायामासाठी लोक चालतात. अगदी गटागटानेही चालतात; पण ऑस्ट्रेलियात काही गट चालले ते समाजसेवेसाठी निधी उभा करण्यासाठी. या उपक्रमाची तयारी सहा महिने आधी सुरू झाली होती.

ओक्‍स्फेम ऑस्ट्रेलिया या स्वयंसेवी संस्थेतर्फे दीर्घकालीन विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे, वंचितांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या तातडीच्या गरजा भागवणे, त्यांना समान नागरी हक्क आणि दर्जा मिळवून देणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरक्षितता देणे असे उपक्रम अमलात आणले जातात. यासाठीच्या निधी उभारणीसाठी एप्रिलमध्ये "ओक्‍स्फेम ट्रेलवॉकर' मेलबर्न हा उपक्रम आयोजिण्यात आला होता.

"मेलबर्न बिझिनेस स्कूल'मध्ये एमबीए करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना समाजकार्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटले. मिंग, तेजस, लिझी आणि येन्स हे चौघे वेगवेगळ्या देशातील तरुण; पण एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. त्यांनी "ओक्‍स्फेम ट्रेलवॉकर' मेलबर्नमध्ये भाग घ्यायचे ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी आवश्‍यक होती. वेळेचे नियोजन करावे लागणार होते. नोकरी, घर आणि शिक्षण हे तर सांभाळायलाच हवे होते. शरीर तंदुरुस्त ठेवायला हवे होते. तयारी सुरू झाली.
या उपक्रमात चौघांचा एक संघ असणार होता. सलग 48 तासांच्या आत एकूण शंभर किलोमीटर चालायचे होते. मध्ये मध्ये विश्रांतीसाठी थांबायला परवानगी होती; पण चौघांपैकी किमान तिघांनी चालणे पूर्ण करायचे होते. मुख्य म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान अडीच हजार ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी देणगी जमवायची होती. सहा महिने आधी तयारी सुरू झाली. अडीच हजार ऑस्ट्रेलियन डॉलर जमल्यावर स्पर्धेतील सहभाग निश्‍चित झाला. संघाचे "मॉन्स्टर ब्रंच सोन्टरर्स' असे नामकरण झाले. सराव सुरू झाला. शनिवार किंवा रविवारी पाच-पाच किलोमीटर अंतर पार करून बघितले. त्यानंतर महिन्यातून एकदा दहा-दहा किलोमीटर असे तीन वेळा आणि वीस किलोमीटर दोन वेळा चालून बघितले. लागत असलेल्या वेळेची नोंद केली. नियमित सरावामुळे चालण्यासाठी पाय तयार होते. उत्साह आणि आत्मविश्‍वास वाढला होता. आपण ही कामगिरी करायचीच, असे त्यांनी ठरवले. साधारण मार्चच्या सुरवातीला पन्नास किलोमीटर चालण्याचा सराव केला. या चालण्याच्या सरावामध्ये निरनिराळे खूप काही शिकायला मिळाले. आपल्याबरोबर पाणी किती घ्यायचे, शरीराला आवश्‍यक ती ऊर्जा देणारे अन्नपदार्थ किती प्रमाणात आणि कोणते घ्यायचे, मधली विश्रांती किती वेळ घ्यायची याचे नियोजन प्रयोगांवरून करता आले. एव्हांना छत्तीसशे डॉलर एवढी देणगी जमा झाली होती. आता सर्वांचेच लक्ष या उपक्रमाकडे लागले होते.

या स्पर्धेत सातशे संघांचा सहभाग होता. आयोजकांनी चार तुकड्या केल्या होत्या. संघ क्रमांक 427 ला चालण्याची सुरवात सकाळी साडेआठला करायची होती. सुरवात झाली. दर चार-पाच तासांनी थोडी विश्रांती. विश्रांतीच्या थांब्यावर प्रत्येक संघाच्या मदतनिसांचा चमू तयार होताच. त्यांनी संघातील प्रत्येकाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. मुख्य म्हणजे मानसिक पाठबळ, पाय चेपून देणे यासाठी हे मदतनीस स्वेच्छेने आले होते. साधारण वीस किलोमीटर चालल्यानंतर पायाला फोड येऊ लागले. सरावाच्या वेळी झाला नव्हता एवढा त्रास फोडांचा या वेळी झाला. रस्ता चढ-उतारांचा, वळणांचा. कधी घनदाट जंगलातून, तर कधी वस्त्यांमधून. मार्गावर आजूबाजूच्या काही घरांमधील छोटी मुले घरातून पदार्थ आणून बाहेर टेबलावर ठेवत होती. एका ठिकाणी लिहिले होते, " या ट्रेकमध्ये तुमच्याबरोबर चालण्यासाठी आम्ही अजून खूपच लहान आहोत. आम्ही एवढेच म्हणतो की, तुमचे काम खरेच खूप चांगले आहे. मोठे झाल्यावर आम्हीसुद्धा या कार्यक्रमामध्ये नक्कीच भाग घेऊ आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू.'

दिवस सरला, चाळीस किलोमीटर चालणे झालेले होते. अजिबात झोप न घेता रात्रभर चालणे सुरूच. साधारण दुपारी बारा वाजता, 85 किलोमीटर अंतर तोडलेले असताना लिझी बाद झाली. ती आता एकही पाऊल पुढे टाकू शकत नव्हती. टेकड्या उतरताना सगळ्यांना पोटऱ्यांमध्ये वाम यायला लागले होते. पण आता तिघांपैकी कुणालाही थांबता येणार नव्हते. आता शेवटचे पंधरा किलोमीटर अंतर अगदी कसोटी पाहणारे होते. एकदम तीव्र चढ, त्यानंतर एकदम भयानक उतार. पाय एकदम जड झाले होते. समोर अंतिम रेषा दिसायला लागली होती; पण तिथवर जाणारा रस्ता अवघड, वळणा-वळणांचा होता; पण उर्वरित तिघांनीही जिद्दीने अंतिम रेषा पार केली. तेहतीस तास आणि तीन मिनिटांत हे अंतर या संघाने तोडले. अंतिम रेषेजवळ या संघाचे खूप जल्लोषात स्वागत केले गेले होते. या संपूर्ण कार्यक्रमाची मी साक्षीदार होऊ शकले हे मी माझे भाग्य समजते.

या संघातील तेजस हा माझा मुलगा. त्याने समाजासाठी लहानसे का होईना काम केले. आई म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vrunda sahasrabudhe wirte article in muktapeeth