मुरूड समुद्रकिनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन; सीगलचे स्थानिकांसह पर्यटकांना आकर्षण

मेघराज जाधव
Monday, 26 October 2020

मुरूड समुद्रकिनारी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये हजारो किलोमीटर दूर साता समुद्रापार असलेल्या सी गल पक्ष्यांचे थवे येत असतात. सध्या या पक्ष्यांनी येथे मुक्काम ठोकला असून पर्यटक आणि पक्षिप्रेमींनी गर्दी केली आहे. या पांढऱ्या शुभ्र पक्ष्याला पाहून स्थानिकांसह पर्यटकांना नेत्रसुखाचा आनंद होत आहे. 

मुरूड : मुरूड समुद्रकिनारी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये हजारो किलोमीटर दूर साता समुद्रापार असलेल्या सी गल पक्ष्यांचे थवे येत असतात. सध्या या पक्ष्यांनी येथे मुक्काम ठोकला असून पर्यटक आणि पक्षिप्रेमींनी गर्दी केली आहे. या पांढऱ्या शुभ्र पक्ष्याला पाहून स्थानिकांसह पर्यटकांना नेत्रसुखाचा आनंद होत आहे. 

निसर्गाचे वरदान लाभलेले मुरूड हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. शहराला सुमारे अडीच किलोमीटरचा स्वच्छ समुद्रकिनारा आणि निळाशार समुद्र लाभला आहे. त्यातच अरबी समुद्रात पहुडलेले जंजिरा व पद्मदुर्गसारखे ऐतिहासिक जलदुर्गही पर्यटकांचे खास आकर्षण आहे. खवय्यांसाठीही पर्वणी असलेल्या ताज्या मासळीचा आस्वाद येथे घेता येतो. सध्या कोरोनामुळे पर्यटन बंद होते, मात्र पर्यटनावरील बंदी उठवताच समुद्रकिनारे फुलू लागले आहे. यात पर्यटकांना आणखी आकर्षित करण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात येणारे समुद्री पाहुणे म्हणजेच सी-गल पक्ष्यांची भर पडली आहे. हे पक्षी सातासमुद्राला पार करून हजारो किलोमीटर येथे येत असतात.

वाचा हेही : तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणकारी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

पहिल्या आठवड्यात गणिती श्रेणीने तर नंतरच्या काळात भूमिती श्रेणीने सी-गल पक्ष्यांचे थवेच्या थवे किनाऱ्यावर येतात. विशेषतः भरतीच्या वेळात ते किनाऱ्यावर खेकडे, मासे व किटकांचा फडशा पाडून भक्ष्य मिळवतात. स्थानिकांसह पर्यटकांना हे पक्षी विहार करताना बेहद नेत्रसुख देतात. त्यातून बच्चे कंपनीला पक्षी हुसकावण्यात विशेष मौज वाटते. 

अधिक वाचा : दाखल्यांसाठी अलिबाग तहसील कार्यालयात गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सीगलचे वैशिष्ट्य 
सी-गल म्हणजे समुद्रपक्षी. लॅरिडे कुटुंबाचे पक्षी आर्टिक्‍ट आणि अंटार्टिक खंडात खासकरून आढळतात. या पक्ष्याच्या 20 पेक्षा अधिक प्रजाती असून, ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे म्हणून ओळखले जातात. सामान्यतः पांढऱ्या वा करड्या रंगांच्या आकाराने मध्यम ते मोठ्या आकारात अनुक्रमे 120 ग्रॅम ते 1 किलो इतक्‍या वजनाचे असतात. त्यांची लांबी 29 ते 76 सेंटिमीटर एवढी असते. त्यांच्या पंखाच्या टोकाला काळे ठिबके उठून दिसतात. भक्ष्य पकडण्यासाठी जाळीदार बोटांची त्यांना विशेष मदत होते. त्यांचा प्रजनन काळ सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यानचा असतो. सी फूडवर त्यांचा ताव मारण्याचा अधिक भर असतो. उभयचर प्राणी तसेच सरपटणारे प्राणीही त्यांच्याकडून फस्त केले जातात.  

सविस्तर वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीची व्यक्ती नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

नबाब पॅलेस येथे सैर विहार 
नबाब पॅलेसच्या खालच्या बाजूस पांढऱ्या शुभ्र रंगाच्या या पक्ष्यांचा सैर विहार पाहावयास मिळतो. या पक्ष्यांच्या आगमनामुळे पर्यटकांना मोठे अप्रुप वाटते आणि आनंदही होतो. सिगल पक्ष्यांचे थवेच्या थवे आपल्या लयबद्ध हालचालींमुळे पर्यटकांची विशेष करमणूक होत आहे. 

सूर्यास्ताच्या वेळी सी-गल पक्ष्यांची माळ इतक्‍या संख्येने पहिल्यांदाच पाहायला मिळाली. त्यामुळे समुद्रावर फेरफटका मारताना फार आनंद होत आहे 
- लक्ष्मण माळी, पर्यटक, नाशिक 

 

(संपादन : उमा शिंदे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrival of Seagal Birds on Murud beach