उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या लायकीची व्यक्ती नाही; नारायण राणेंचा हल्लाबोल

तुषार सोनवणे
Monday, 26 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी या पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनीही मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या दसऱ्या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार तोफ डागली होती. त्यांनी विशेषतः भाजपला आपले लक्ष्य केले होते. या भाषणात त्यांना भाजपनेते नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी या पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनीही मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. राणे यांच्या टीकेचा स्थर मुख्यमंत्र्यांला गांडूळ म्हणण्याइतपत खाली गेल्याचे यावेळी दिसून आले. 

हेही वाचा - मराठा आरक्षण: उद्या सुनावणी; राज्य सरकारची तयारी कितपत, संभाजीराजेंचा सवाल

नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा मुख्य अजेंडा फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला उत्तर देणे होता. राणे यांनी संपुर्ण भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करीत अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. तसेच त्यांना पुन्हा राणे कुटूंबाकडे बोट दाखवाल तर याद राखा असा झणझणीत इशाराही दिला. राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल मु्द्दे पाहूयात

 

  • मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे कसलंही तारतम्य नसलेले शिवराळ बरळणे होय 
  • आतापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा पदावर असताना वापरली नाही
  • राज्यातील रखडलेली विकास कामे, शेती, शिक्षण रोजगाराच्या प्रश्नावर कोणतेही भाष्य़ नाही.
  • देशात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात , लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मुख्यमंत्री असक्षम
  • हिम्मत असेल तर मराठा आरक्षण द्या, धनगरांना आरक्षण द्या, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत द्या, रोजगार द्या
  • पंतप्रधांना पीओके चे ज्ञान शिकवण्याआधी बेळगाव कारवार महाराष्ट्रात आणून दाखवा
  • किमान समान कार्यंक्रमावर सही करून ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाशी बेईमानी केली
  • हे तर घरात बसून मुख्यमंत्री पद सांभाळणारे 
  • महाराष्ट्राला शेणा गोमुत्राची शिवराळ भाषा पसंत नाही, आमचा तोल गेला तर महागात पडेल

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष करीत, एकेरी उल्लेख केले. उद्धव यांना आपण लहानपणापासून ओळखत असून, ते मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत. तसेच देशाच्या पंतप्रधांनांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार उद्धव यांना नाही. त्यापेक्षा त्यांनी आधी राज्य नीट सांभाळावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा देखील उद्धव यांनी छळ केल्याचे राणे यांनी यावेळी म्हटले 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्राच्या सुपूत्रावर चिखलफेक करीत असल्याचे मुख्यंत्र्यांनी कालच्या भाषेत म्हटले होते. त्यावर बोलताना राणे म्हटले की, उद्धव यांनी सीबीआय चौकशी होण्यापूर्वीच स्वतःच्याच पुत्राला क्लिन चीट दिली आहे. सुशांतचा खुन झाला असून त्याप्रकऱणी राज्य सरकारमधील एक मंत्री गजाआड जाईल, तो मुख्यमंत्र्यांचा पुत्र आहे. हे सत्य किती दिवस लपवण्याचा प्रयत्न कराल?. मुंबई पोलिसांना निरपेक्षतेने चौकशी करू देत नाहीत. सत्तेच दुरूपयोग करून पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी यावेळी लावला.

हेही वाचा - ही तर हर्ड इम्यूनिटीची चिन्ह ! कमी होणाऱ्या रुग्णनोंदीवर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे मत 

मी शिवसेनेचे 39 वर्षे काम केले. त्यामुळे बाळासाहेबांनी मला अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. मुख्यमंत्री देखील केले.  उद्धव यांना केले नाही कारण मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या कुबड्या आणि सल्ले घेऊन कामं केली आहेत. उद्धव यांना राज्यातले बडे अधिकारी हसतात असं म्हणून, त्यांना गांडूळाचीही उपमा राणे यांनी दिली.

मराठा आरक्षण यांनी घालवलं असून, हिम्मत असेल तर ते मिळवून दाखवावं असेही आव्हान राणे यांनी यावेळी दिले. उद्धव मराठ्यांचा द्वेश करणारा व्यक्ती असून त्यांना आरक्षणाविषयीच्या कायद्याचे आणि घटनेतील तरतूदीचे ज्ञान नाही असा टोलाही त्यांनी लगावला. कालचे भाषण म्हणजे फक्त द्वेषाने भरलेले असून त्यात महाराष्ट्राचे आणि मराठी मानसाचे हित नाही, असा मुख्यमंत्री होणे म्हणजे महाराष्ट्राचे दूर्दव्य आहे. अशी जोरदार तोफ त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर डागली

Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray in harsh language


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray in harsh language