कळंबोली पोलिस मुख्यालयात पाळणा हलला

विक्रम गायकवाड
Thursday, 13 August 2020

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी कळंबोली येथील पोलिस मुख्यालयामध्ये सुसज्ज असे पाळणाघर तयार करण्यात आले आहे. या पाळणाघरामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील ज्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरात लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कुणीही नाही, अशा महिला पोलिसांना या पाळणाघराचा फायदा होणार आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी कळंबोली येथील पोलिस मुख्यालयामध्ये सुसज्ज असे पाळणाघर तयार करण्यात आले आहे. या पाळणाघरामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील ज्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरात लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कुणीही नाही, अशा महिला पोलिसांना या पाळणाघराचा फायदा होणार आहे. 

नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या अनेक महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये त्यांच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळे अशा महिला पोलिसांना दैनंदिन कर्तव्य बजावत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ना त्यांना आपल्या लहान मुलांकडे लक्षही देता येत, ना कामावर लक्ष देता येत होते. 

वाचा सविस्तर : नवी मुंबईतल्या १० खासगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस

महिला पोलिसांची ही अडचण लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात सुसज्ज व सर्व सोयी सुविधायुक्त असे पाळणाघर तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सुसज्ज व सर्व सोयी सुविधांयुक्त असे पाळणाघर तयार केले असून, या पाळणाघराचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त संजय कुमार व सहपोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

मोठी बातमी : अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता 

हे पाळणाघर सुमारे 20x30 जागेमध्ये तयार केले असून, या ठिकाणी एका वेळी 15 मुलांना ठेवता येईल, अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. तसेच, येथे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्यांचीही व्यवस्था आहे. लॉकडाऊनमुळे सध्या हे पाळणाघर पूर्ण स्वरूपात सुरू न करता, अत्यंत गरजवंत असलेल्या तीन ते चार महिला पोलिसांच्या मुलांनाच येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच मुलांचे तापमान तपासूनच त्यांना पाळणाघरात ठेवले जाणार आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी विशेष अटेंडटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 
- शिवराज पाटील, पोलिस उपायुक्त, मुख्यालय 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baby sitting room starts in kalamboli police head quarter