खूशखबर : नवी मुंबईत लवकरच या ठिकाणीही होणार मेट्रो सेवा

दीपक घरत : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील पेंधर ते कळंबोली मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

पनवेल : नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील पेंधर ते कळंबोली मेट्रोचे काम सुरू करण्यासाठी माती परीक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. सध्या मेट्रोच्या पहिल्या 11 किलोमीटरच्या टप्प्यातील सफल परीक्षण घेतले असले, तरी काही भागांचे काम रखडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रत्यक्षात मेट्रो धावण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. 

हेही महत्त्वाचे : कोरोना संकटातही पशु-पक्ष्यांना मिळाला आधार... खाद्यपुरवण्यापासून ते औषधोपचार करण्यापर्यंत केले कार्य

पहिल्या टप्प्यातील प्रकल्प अद्याप रखडला असल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने व्हावीत, यासाठी दिल्लीमध्ये यशस्वी मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या केंद्र सरकारच्या दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला नवी मुंबई प्रकल्पाचे काम सोपवले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 (तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर) आणि (पेंधर ते तळोजा एमआयडीसी) या प्रकल्पांच्या कामासाठी सिडकोने डीएमआरसीची नियुक्ती केल्याने सिडको आणि डीएमआरसी यांच्यामध्ये 29 मे 2020 मध्ये करार झाला. तो 22 जून 2020 अमलात आल्याने डीएमआरसीने माती तपासणीसह विविध उपक्रम सुरू केल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. 

मोठी बातमी : स्टंटबाजी करता, मग मृतदेह झाडावर लटकेल... कुठे घडली अशी घटना...

 

26.06 किलोमीटरचा प्रकल्प
पेंधर ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ या 15.6 किलोमीटरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाला 5 हजार 840 कोटी 51 लाख खर्च येणार आहे. बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या 26.26 किलोमीटर प्रकल्पासाठी 8 हजार 904 कोटी 14 लाख खर्च प्रस्तावित आहे. 

अशी असणार मेट्रोची स्थिती 

  स्थानक अंतर थांबे  प्रकल्प किंमत  
पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर 11.10 कि.मी. 11 3 हजार 63 कोटी 63 लाख   
दुसरा टप्पा तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर रेल्वेस्थानक 7.12 कि.मी. 6 2 हजार 820 कोटी 20 लाख   
तिसरा टप्पा पेंधर ते तळोजा एमआयडीसी 3.87 कि.मी. 3 1 हजार 750 कोटी  
चौथा टप्पा खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 4.17 कि.मी. 1 1 हजार 70 कोटी 7 लाख  

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coming soon Pendhar to Khandershwar Metro for Navi Mumbaikar