चक्क डॉक्टरांनी दूध-पिठातून साकारले श्री गणरायाचे रूप; आयुर्वेद डॉ. रोहित प्रभूची नाविण्यपूर्ण संकल्पना

संतोष सुतार
Sunday, 23 August 2020

माणगाव येथील आयुर्वेद वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण डॉ. रोहित रमेश प्रभू यांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी स्वत: घरीच मूर्ती बनवली. यासाठी त्यांनी चक्क दूधात गव्हाचे पीठ, हळद, पिठी साखर एकत्र मळून मूर्ती तयार केली. 

माणगाव : माणगाव येथील आयुर्वेद वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले तरुण डॉ. रोहित रमेश प्रभू यांनी आईच्या इच्छापूर्तीसाठी स्वत: घरीच मूर्ती बनवली. यासाठी त्यांनी चक्क दूधात गव्हाचे पीठ, हळद, पिठी साखर एकत्र मळून मूर्ती तयार केली. 

कोरोनाचे संकट असल्याने डॉ. रोहित प्रभू सध्या घरीच आहेत. यावर्षी त्यांची आई रश्‍मी रमेश प्रभू यांनी दीड दिवसाच्या श्री गणरायाची स्थापना घरी करावी, अशी प्रबळ इच्छा व्यक्त केली होती. आईच्या इच्छापूर्तीसाठी डॉ. रोहितने स्वतः घरीच मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दूध, गव्हाचे पीठ, हळद, पिठी साखरचा वापर केला. या वस्तूंना एकत्रित मळून गणेशमूर्ती साकारली. वावडिंगाचा वापर करून मूर्तीचे रेखीव डोळे तयार केले. तर लाल कुंकू वापरून पितांबर रंगवले. नैसर्गिक चौकोनी आकाराच्या दगडाची बैठक ठेवून अतिशय सुबक अशी 10 इंच आकाराची गणरायाची मूर्ती त्यावर साकारली.

हेही वाचा : गणेशोत्सवात जुगार खेळणारे हिटलिस्टवर; या जिल्ह्यात आठ जण ताब्यात

अतिशय ईको फ्रेंडली अशा गणरायाचे दीड दिवसाची स्थापना करून रविवारी (ता. 23) आपल्या घराच्या अंगणातील छोट्या सिंटेक्‍स टाकीत बनवलेल्या तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन केले. या तलावात गप्पी जातीचे मासे पाळले आहेत. ते या विसर्जित मूर्तीचे विरघळलेले पीठ खाऊन टाकतील. त्यामुळे प्रदूषणही होणार नसल्याचे डॉ. रोहितने सांगितले. 

मोठी बातमी : सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा, मानेवर 'ती; खूण कोणती?

पिठाचा गणराय नाविण्यपूर्ण संकल्पना 
कोकणात नागपंचमीला पिठाचा किंवा नागवेलीचा प्रतिकात्मक नाग बनवितात, परंतु पिठाचा गणराय अतिशय नाविण्यपूर्ण संकल्पना तसेच मूर्ती स्वतः बनवण्याचे एक आगळेवेगळे समाधान आणि कलेचे संस्कार जोपासण्यास मदत होते. त्यामुळेच डॉ. रोहित यांच्या या संकल्पनेचे माणगावकर मित्र परिवारांकडून खूपच कौतुक होत आहे. 
 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor has made GaneshMurti From wheat flour and Milk