अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर; गुरेपालक, शेतकरी चिंतेत

अजित शेडगे
Thursday, 29 October 2020

रायगड जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि अवकाळी पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे भातपेंढी पूर्ण भिजून कुजल्या आहेत. परिणामी, पुढील काळात जनावरांसाठी आवश्‍यक असलेला चारा, वैरण मिळणार नसल्याने शेतकरी व गुरेपालक यांच्यासमोर वैरणींचे मोठे संकट उभे राहिले आहे. 

माणगाव : रायगड जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि अवकाळी पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे भातपेंढी पूर्ण भिजून कुजल्या आहेत. परिणामी, पुढील काळात जनावरांसाठी आवश्‍यक असलेला चारा, वैरण मिळणार नसल्याने शेतकरी व गुरेपालक यांच्यासमोर वैरणींचे मोठे संकट उभे राहिले आहे. 

संततधार पावसाने जिल्ह्यात गेले सहा महिने हाहाकार उडवून दिला होता. त्याचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. शेतकरी भातझोडणीनंतर राहिलेल्या पेंढ्या विकतात किंवा स्वतःच्या गुरांसाठी वैरण म्हणून ठेवून देतात. उन्हाळी दिवसांत जनावरांना चारा म्हणून या सुक्‍या पेंढीचा फार उपयोग होतो. गुरेपालक, दूध व्यावसायिक शेतकऱ्यांकडून पेंढी विकत घेतात. यातून शेतकऱ्यांनाही चांगला नफा मिळतो; मात्र यावर्षी पावसाने भातशेती भिजल्याने पेंढी पूर्णपणे खराब झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कुजल्या आहेत, काही नरम पडल्याने त्या वैरण म्हणून गुरांना चारा देण्यासाठी योग्य राहिल्या नाहीत. यामुळे या पुढील काळात गुरांना चारा काय द्यायचा? असा प्रश्न पडला आहे. 

हेही वाचा : शाळेत पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक, शासन निर्णय मागे घेण्याची शिक्षक भारतीची मागणी

माणगाव तालुक्‍यात जवळजवळ 350 हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील भातपेंढीला जिल्हाभरातून चांगली मागणी असते गेल्या वर्षी 400 ते 500 रुपये शेकडा भातपेंढी विकल्या गेल्या होत्या. काही शेतकरी उन्हाळी साठवणूक करून पावसाळी चांगल्या भावामध्ये पेंढी विक्रीस प्राधान्य देतात. तालुक्‍यात दूध व्यावसायिकही या पेंढीवरच अवलंबून असतात. त्यामुळे या वर्षी खराब झालेल्या भातपेंढीने गुरांच्या वैरणींचा मोठा प्रश्न व संकट शेतकरी, दूध व्यवसायिक व गुरेपालक यांच्या समोर निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा : दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

भातशेती पूर्णपणे भिजल्याने बहुतांशी भातपेंढी कुजल्या आहेत, तर काही नरम पडल्यात. पेंढी नरम झाल्याने आणि ओल्या असल्याने गुरांना वैरण म्हणून उपयोगात येणार नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात वैरण कोठून आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी झोडणी-मळणीसोबतच भारे, पेंढी वाळवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- नथुराम खडतर, शेतकरी 

आम्ही शेतीबरोबर दूध व्यवसायही करतो. दरवर्षी शेतीतील पेंढा गुरांना वैरण म्हणून उपयोगी पडतो. आवश्‍यक असणारा जास्तीचा पेंढा स्थानिक शेतकऱ्यांकडून विकत घेतो. यावर्षी मात्र भातपेंढी पूर्ण भिजल्या आहेत. काही ठिकाणी तर पेंढ्या कुजल्या आहेत. त्यामुळे गुरांना वैरण कोठून आणणार? हा प्रश्न पडला आहे. 
- बाळाराम भोनकार, दुग्ध व्यावसायिक शेतकरी, माणगाव 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains, the problem of cattle fodder in Raigad district is serious