सीआरझेडचा निसर्गग्रस्त टपरीधारकांना फटका; नव्या हंगामाची सुरुवात मदतीविनाच

महेंद्र दुसार
Wednesday, 21 October 2020

निसर्ग चक्रीवादळाचे रायगडमधील पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु यातील अनेक टपऱ्या सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने सरकारकडून त्यांना कोणतीही मदत अद्याप देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीतून नव्या हंगामाची तयारी हे व्यावसायिक करत आहेत. 

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाचे रायगडमधील पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु यातील अनेक टपऱ्या सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने सरकारकडून त्यांना कोणतीही मदत अद्याप देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीतून नव्या हंगामाची तयारी हे व्यावसायिक करत आहेत. 

3 जूनच्या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावरील झाडे मुळासह उपटून निघालेली आहेत. दिवेआगर, मुरूड, काशिद, वरसोली या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य लयाला गेले. यात पर्यटकांसाठी चहा, नास्ता, खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या वादळात 80 टक्के टपऱ्या वादळात उडून गेल्या होत्या. यांची डागडुजी करून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न या व्यावसायिकांचा आहे. यातील अनेक झोपड्या या समुद्रकिनारी सीआरक्षेड क्षेत्रात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना अनधिकृत ठरवत नुकसानभरपाई देण्यास टाळले आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये नाणार रिफायनरी नाही! सिडकोची नियुक्ती रद्द; फार्मा पार्कला मंजुरी

काशिद, वरसोली येथील अनेक टपरीधारकांना यामुळे नुकसानभरपाई मिळालेली नाही. यामुळे त्यांना टपऱ्यांची डागडुजीही करता आलेली नाही. सरकारकडून काहीतरी प्रमाणात मदत मिळेल, या आशेने हे टपरीधारक होते. अखेर मदत न मिळाल्याने त्यांनी स्वतःहून डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नुकसान इतक्‍या मोठ्या प्रमाणात आहे की, ठिगळ लावणार तरी कुठे कुठे? अशी परिस्थिती या टपरीधारकांची झाली आहे. त्यामुळे सर्व व्यवसायाची जुळवाजुळव नव्याने करावी लागत आहे. 

अधिक वाचा : हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले प्रतापगड! भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण

समुद्रकिनाऱ्यावरील टपरीधारकांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मदत मिळेल या प्रतीक्षेत हे सर्वजण होते. अखेर त्यांनी स्वतःहून दुरुस्तीला सुरुवात केली. 
- नम्रता कासार, सरपंच, ग्रामपंचायत काशिद 

ज्या टपऱ्या स्वतःच्या मालकी जागेत आहेत, त्यांना नुकसानभरपाई दिलेली आहे. मात्र, ज्या टपऱ्या सीआरझेडमध्ये अनधिकृत आहेत, त्यांना भरपाई देता येणार नाही. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Coast side Stallholder has Started their business without any help