अवकाळी पावसाच्या आठ दिवसांनंतर पनवेल तालुक्‍यात पंचनाम्याला सुरुवात

वसंत जाधव
Tuesday, 20 October 2020

अवकाळी पावसाने पनवेल तालुक्‍यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आठवडाभरानंतर अधिकाऱ्यांनी पंचनाम्याला सुरुवात केली. मात्र, अद्याप काही ठिकाणी अधिकारी फिरकलेच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

नवीन पनवेल : अवकाळी पावसाने पनवेल तालुक्‍यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आठवडाभरानंतर अधिकाऱ्यांनी पंचनाम्याला सुरुवात केली. मात्र, अद्याप काही ठिकाणी अधिकारी फिरकलेच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पनवेल तालुक्‍यातील 235 हेक्‍टर भातपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल, तहसील विभागांनी तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार आठवडाभरानंतर दोन दिवसांपासून तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी पंचनामे करण्याच्या कामाला लागले आहेत.

महत्त्वाची बातमी : कांदा रडवतोय! किरकोळ बाजारात १०० रुपये किलो

नुकसान झालेल्या भातपिकाचे प्रमाण हे लागवडीच्या एकूण 20 टक्के एवढे आहे. तरी पंचनामे केल्यानंतर प्रत्यक्षात हा आकडा वाढण्याची शक्‍यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी यांनी सांगितले. या संदर्भात तहसीलदारांशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरी तो होऊ शकला नाही. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत बहुतेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत तालुक्‍यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. 

हेही वाचा : रायगडमधील बेकायदा मद्यविक्रीचे नव्या पोलिस अधीक्षकांसमोर आव्हान; कोट्यवधीची उलाढाल असल्याची शक्यता 

8 हजार 400 हेक्‍टरवर भात
भात हे पनवेलच्या ग्रामीण पट्ट्यातील महत्त्वाचे पीक आहे. पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 29 गावांसह 188 महसुली गावे आहेत. यामधील सुमारे 130 गावांमध्ये भातशेतीची लागवड केली जाते. यामध्ये 8400 हेक्‍टरच्या आसपास भाताची लागवड केली जाते. तर 10 ते 15 हेक्‍टर नाचणीचे पीक घेतले जाते. 

केवळ 61 पीकविमाधारक 
आपत्कालीन स्थितीमध्ये शेतीचे नुकसान झाले, तर पीकविमा हा शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा आधार ठरू शकतो. नाममात्र रकमेमध्ये हा विमा काढला जातो. पनवेल पट्ट्यामध्ये अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये फक्त 61 पीकविम्याची प्रकरणे समोर आली आहेत. ती प्रकरणे निकाली काढण्यात येत आहे, असे कृषी अधिकारी ईश्वर चौधरी यांनी सांगितले. तसेच, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 

अधिक वाचा : अवजड वाहनांमुळे खोपोली-पेण रस्त्यावर वाहतूक कोंडी

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पीकविम्याचेही प्रकरणे मार्गी लावण्याचे काम चालू आहे. आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाईल. 
- ईश्वर चौधरी, तालुका कृषी अधिकारी, पनवेल 

कोरोनाच्या काळात कशीबशी शेती जगवली आहे. अवकाळीने मात्र त्याची माती केली. आमच्या तोंडचा घास हिरावला आहे. पिके आडवी होन त्याला अंकुर आले आहेत. सरकारने पंचनाम्याचे वाट न बघता लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. ही मायबाप सरकारकडे हात जोडून विनंती आहे. 
- संभाजी नामदेव म्हात्रे, शेतकरी, वलवली 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice plant's Panchnama has started in Panvel Taluka