गोखले शाळेतील विलगीकरणामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

गजानन चव्हाण
Tuesday, 27 October 2020

गोखले शाळेत विलगीकरणासाठी ठेवलेल्या कैद्यांना ने-आण करताना येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिक आणि रस्त्याकिनारी व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

खारघर : गोखले शाळेत विलगीकरणासाठी ठेवलेल्या कैद्यांना ने-आण करताना येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिक आणि रस्त्याकिनारी व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोजा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी खारघरमधील निवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्‍टर 12 मधील गोखले शाळेत तात्पुरत्या स्वरूपात विलगीकरण केंद्र उभारले आहे. सद्यस्थितीत या केंद्रात जवळपास 650हून अधिक कैदी आहेत.

हेही वाचा : आता मुंबईतील स्ट्रीट लाईट होणार शॉक फ्री, BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, ठाणे, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातून रोज सायंकाळी 4 नंतर कैद्यांना घेऊन येताना गोखले शाळेसमोर पोलिस आणि कारागृहाची येणारी वाहने उभी केली जातात. त्यामुळे शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे नागरिक आणि तेथील दुकानदारांना त्याचा त्रास होत असून, त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. यामुळे नागरिक आणि व्यापारीवर्गात नाराजी पसरली आहे. सरकारने खारघरमधील कैद्यांचे विलगीकरण केंद्र बंद करावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. यासंदर्भात तळोजा कारागृहाचे कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुरलेकर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. 

सविस्तर वाचा : नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

कैद्यांच्या भेटीसाठी विविध भागातून नातेवाईक येतात. रस्त्यावर बसून बिडी सिगारेट ओढणे तसेच कैद्यांना घेवून येताना वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे संध्याकाळी चार ते सात दुकानासमोर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. 
मनोहर बिस्नोई, दुकानदार 

अधिक वाचा : टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू

अनेक समस्यांचा परिणाम 
600 कैद्यांसाठी 10 खोल्या आणि शाळेचा व्हरांडा या जागेत कैदी दाटीवाटीने राहत आहे. त्यात दोन स्वच्छतागृहे असून, पुरेसा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कैद्यांना अंघोळ करणे, कपडे धुणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशी माहिती कैद्यांसाठी तैनात केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली. 

 

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam in front of Gokhale School