घाटकोपरच्या कबड्डीपटूचा नरवण्यात बुडून मृत्यू 

घाटकोपरच्या कबड्डीपटूचा नरवण्यात बुडून मृत्यू 

गोंदवले : गणेशोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या खेळाडूचा विहिरीत बुडून आज मृत्यू झाला. नरवणे (ता. माण) येथे आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश अनंत शिंदे (वय 17, रा. इंदिरानगर, साईनाथनगर रोड, घाटकोपर) असे मृताचे नाव आहे. 

नरवण्यात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा सुरू आहेत. त्यासाठी राज्यभरातून संघ आलेत. काल (ता. 9) रात्री कबड्डी सामन्यासाठी मुंबईहून संघ आला होता. या संघाचा आज सकाळी 65 किलो वजन गटातून कबड्डीचा सामना होणार होता. या संघातील पंधरापैकी काही खेळाडू कोणालाही न सांगता अंघोळीसाठी सकाळी बाहेर पडले होते. गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या खटकाळी शिवारातील कालव्यात साठलेल्या पाण्यात त्यांनी अंघोळही केली; परंतु हे पाणी गढूळ असल्याने चांगल्या पाण्याने अंघोळ कराण्यासाठी कालव्याशेजारीच असलेल्या विहिरीत चौघे जण उतरले. पोहता येत नसतानाही अविनाश विहिरीत उतरताच बुडू लागला. त्याच्याबरोबरच्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. खेळाडू विहिरीत बुडल्याची बातमी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. 

पोलिस पाटील विजयसिंह काटकर यांनी घटनेची माहिती देताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद दीक्षित घटनास्थळी आले. लोकांच्या मदतीने त्यांनी अविनाशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने बराच वेळ त्यात यश येत नव्हते. अखेर विद्युत मोटारीच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्याचे ठरले. त्यापूर्वीच किरण काटकर या तरुणाने अविनाशला बाहेर काढले. हवालदार संजय केंगले तपास करत आहेत. दरम्यान, गावातील सर्वेश्‍वर मंदिरासमोर गावकऱ्यांनी अविनाशला श्रद्धांजली वाहिली. या घटनेनंतर मृत अविनाशच्या कुटुंबीयांसाठी गावातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात भरवण्यात येत असलेल्या सामन्यातील खेळाडूंसाठी आम्ही जेवण- निवासाबरोबरच अंघोळीचीही सोय गावातच करतो. मात्र, तरीही नरवणेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली, असे सरपंच दादासो काटकर यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com