कलाकृतीतून दरवळला स्वातींचा स्मृतिगंध; जहांगीर कलादालनात चित्र प्रदर्शन

सागर कुंभार
रविवार, 22 सप्टेंबर 2019

रुकडी - मुंबई येथील जहांगीर कलादालनात चित्रांचे प्रदर्शन लागावे, हे स्वप्न पाहणाऱ्या स्वाती कुंभार यांचे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले. स्वातीचे हे स्वप्न त्यांचे पती रोहन कुंभार साकार करत आहेत. या कलावंत दाम्पत्यांच्या कलाकृती 17 सप्टेंबरपासून जहांगीर कलादालनात झळकल्या आहेत.

रुकडी - मुंबई येथील जहांगीर कलादालनात चित्रांचे प्रदर्शन लागावे, हे स्वप्न पाहणाऱ्या स्वाती कुंभार यांचे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले. स्वातीचे हे स्वप्न त्यांचे पती रोहन कुंभार साकार करत आहेत. या कलावंत दाम्पत्यांच्या कलाकृती 17 सप्टेंबरपासून जहांगीर कलादालनात झळकल्या आहेत. या प्रदर्शनातील कलाकृतीत स्वातीचा स्मृतिगंध दरवळला आहे. 
रुकडी (ता. हातकणंगले) स्वाती कुंभार आणि पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील रोहन कुंभार हे कलाकार दांपत्य.

कोल्हापूरमधून त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनापासून एकत्र असलेल्या या दोघांनी पुढे जाऊन लग्न केलं. या दांपत्यांची "दुर्वा' ही एकुलती एक कन्या. आज दुर्वा म्हणजे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक तर आहेच पण रोहनसाठी स्वातीने दिलेला जगण्यासाठीचा आशेचा किरण आहे. एकमेकांसोबत राहणे आणि चित्रं काढणे, हाच त्यांचा आनंद. आपले आवडीचे काम करायला मिळणे आणि त्यात आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीची साथ असणं, याशिवाय आयुष्यात काय हवं असतं? पण आयुष्यातील सगळीच स्वप्नं पूर्ण होतात असे नाही.

रोहनसोबत जहांगीर आर्ट गॅलरीत एखादे प्रदर्शन करायची स्वातीची इच्छा होती. त्यासाठी तिने 2010 पासूनच हालचालही सुरू केल्या होत्या. मात्र दुर्दैव असे की जहांगीरमध्ये प्रदर्शन तर सुरू झाले पण ते पहायला स्वाती नाही. अडीच वर्षांपूर्वीच तिचे निधन झाले. तिच्या चित्रांमधूनच रोहन आता तिला पाहतो, अनुभवतो. याच चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालनात मंगळवारपासून (ता. 17) प्रदर्शन सुरू झाले आहे. ते 23 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 दरम्यान रसिकांना ही चित्रे पाहता येतील. 

कोलाबा आर्टसचे संस्थापक सुमित सबनीस आणि पल्लवी सबनीस यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. रोजच्या कामांचे प्रतिबिंब दिसते. महिलांप्रती आदर, कौटुंबिक गप्पाटप्पा हे स्वातीच्या चित्रांचे प्रमुख विषय. रोहनची चित्रे वास्तववादी. कोल्हापूरसारख्या कलेच्या माहेरघरातून तो आलेला. कलेचे हे प्रेम त्याच्या चित्रांमधूनही झळकते. या प्रदर्शनासाठी म्हणून त्याने स्वातीचे चित्रही रेखाटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohan Kumbar art exhibition in Jahangir art gallery in Mumbai