महापालिका निवडणुकीवर १६ कोटींचा खर्च

महापालिका निवडणुकीवर १६ कोटींचा खर्च
महापालिका निवडणुकीवर १६ कोटींचा खर्च

नवी मुंबई : एप्रिल २०२० मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तब्बल १६ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज महापालिकेने बांधला आहे. एका मतदारामागे १९२ रुपये असे एकूण आठ लाख ५० हजार मतदारांमागे हा अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीवरील खर्चाची तरतूदीची अर्थसंकल्पात नोंद करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केल्या जाणाऱ्या खर्चासाठी घालून दिलेली कमाल मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. ३ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार एका मतदान केंद्रावर ७५० ते ८०० मतदारांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेची मतदान केंद्रे एक हजार १०० इतकी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली-बेलापूर अशी दोन्ही मतदार संघांमध्ये ८१९ मतदान केंद्रे होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेत आठ लाख ५० हजार मतदार संख्येमागे ११०० मतदान केंद्रे असण्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच यंदा कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग, वस्तू खरेदीवर लागणारा जीएसटी पकडून खर्चाचा अंदाज तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने २०२० मधील निवडणुकांकरिता प्रतिमतदान १५० रुपये गृहीत धरून यात १८ टक्के सेवा व वस्तू कराचे २७ रुपये, १० टक्के आकस्मिक खर्च १५ रुपये असे एकूण १९२ रुपये प्रति मतदार गृहीत धरण्यात आले आहे.

महागाईची झळ
नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या पॅनेल पद्धतीच्या निवडणुकांआधी ठाणे व पनवेल महापालिकेत पार पडलेल्या महापालिकांचा लेखाजोखा महापालिकेने सादर केला. २०१७ मध्ये पार पडलेल्या ठाणे महापालिकेला १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांमागे ३३ प्रभागांवर ११ कोटी ९५ लाख ४५ हजार १३८ रुपये म्हणजे प्रति मतदार ९७ रुपये इतका आला होता. तेच पनवेल पालिकेला फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत २० प्रभागांवर सहा कोटी ३७ लाख ४५ हजार ६६७ रुपये इतका खर्च आला. म्हणजे प्रति मतदार १५० रुपये खर्च झाला. परंतु नवी मुंबई महापालिकेला आठ लाख ५० हजार मतादारांमागे १९२ रुपये खर्च येणार असल्याचे अपेक्षित धरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com