PM SVANidhi : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना लाभ होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1 lakh hawkers benefit from PM SVANidhi Pradhan Mantri Swanidhi Yojana mumbai

PM SVANidhi : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना लाभ होणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी १९ जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

वांद्रे - कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या ३ रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या अखत्यारितील ४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा लाभ होणार आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला होणार फायदा

महानगरपालिकेच्या मुंबई मलनिःसारण प्रकल्प या खात्याद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत.

या सातही मलजल प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज २४६.४० कोटी लीटर अर्थात २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. या ७ मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गांवदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रुझ, माटुंगा, वडाळा,

शीव – कोळीवाडा, ब्राह्मणवाडी, अंधेरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील लोकसंख्येला फायदा होणार आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी रुपये १७ हजार १८२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

बायोगॅसपासून वीजनिर्मिती

या कार्याअंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहेत. यासोबतच यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. तर बाहेर पडणाऱ्या गाळावर ‘अ’ दर्जाअंतर्गत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

४०० किमीच्या रस्ते काँक्रिटीकरण

रस्ते काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभाअंतर्गत ३९७ किलोमीटर लांबीच्या 'रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल. या कामांसाठी अंदाजे रु. ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे.

कुठे किती किमीचे रस्ते

या कामांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागात ७२ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.

या रस्त्यांच्या कामांत 'युटिलिटी डक्ट' तसेच पूर नियंत्रणात महत्वाचे ठरणारे शोष खड्डेही बनवले जाणार आहेत. या रस्त्यांचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बनवण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना हे काम दिले जाणार आहे. नवीन रस्त्यांचा दर्जा चांगला राहावा यासाठी दर्जेदार व्यवस्थापन संस्थाही देखभालीसाठी नेमण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा शुभारंभ

कोविड १९ आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही (PM SVANidhi) योजना सुरू करण्यात आली.

या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ मिळणार आहे. या कर्ज वाटपाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने आपल्या २४ विभागांमध्ये २३०१ शिबिरे आयोजित केली. जेणेकरून अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेची माहिती मिळावी. या शिबिरांमध्ये पथविक्रेत्यांना ऑनलाइन अर्ज कसे करावे,‌ याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.

यासोबतच या व्यावसायिकांना अर्ज करणे सुलभ व्हावे, यासाठी सहायकांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या बहुआयामी कामामुळे आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारसपत्रे देण्यात आली आहेत. तर १ लाखाहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

आरोग्य सुविधांचे उद्घाटन अन् भूमीपूजन

भांडुप मल्टीस्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय, नाहूर महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील नाहूरगांव येथे ३६० रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तब्बल ७१,५४७.६६ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ९ मजले यानुसार एकूण ११ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त १० मजल्यांची कर्मचारी निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०३ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ देखील असणार आहे.

या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३६० रुग्णशय्यांपैकी १९० रुग्णशय्या ह्या वैद्यकीय सेवेच्या विविध विभागांसाठी असतील. या रुग्णालयामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी इत्यादी परिसरातील साधारणपणे १२ ते १५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा देखील उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय सन २०२५ च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगांव (पश्चिम) परिसरात असणा-या सिद्धार्थनगरमध्ये ३०६ रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ५०,१३९ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर,

तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त २० मजल्यांची निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०८ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ देखील असणार आहे. या रुग्णालयात ३०६ रुग्णशय्या प्रस्तावित आहेत.

या रुग्णालयामुळे सिद्धार्थनगर, गोरेगांव पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पश्चिम, मालवणी, आरे कॉलनी इत्यादी परिसरातील साधारणपणे ८ ते १० लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.

ओशिवरा प्रसूतिगृह, ओशिवरा गांव

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील ओशिवरा गांव परिसरात असणा-या भूखंडावर १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसूतिगृहाचे भूमिपूजन भूमिपूजन मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १३,५०५.१५ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे प्रसूतिगृह तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे.

या प्रसूतिगृहामुळे के पश्चिम विभागातील आनंद नगर, मिल्लत नगर, बेहराम बाग, राममंदिर मार्ग व भगतसिंह नगर आदी परिसरातील साधारणपणे ३ ते ३.५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत ११ जानेवारी २०२३ पर्यंत २ लाख १० हजार रुग्णांवर आवश्यक ते वैद्यकीय ओषधोपचार करण्यात आले आहेत. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन व औषधोपचार यासह विविध १४७ चाचण्या (Radiology, Pathology) मोफत उपलब्ध आहेत.