
Bhai Jagtap : मुंबईत टॅंकर लॉबीची १ हजार कोटींची उलाढाल; भाई जगताप
मुंबई : मुंबईतील टॅंकर माफीयांच्या माध्यमातून जवळपास १ हजार कोटींची उलाढाल पाणी विक्रीच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना झोपडपट्टीच्या भागात पाण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागत आहेत.
त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक सर्वपक्षीय राजकारणीही या पाण्याच्या धंद्यात गुंतलेले असल्याचा धक्कादायक आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. मुंबईकरांची चालवलेली ही लूट यंदाच्या अर्थसंकल्पातून थांबवता आली असती असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईतील अनेक झोपडीवासीयांच्या भागामध्ये अनेक नागरिकांना पाण्यासाठी दर महिन्यापोटी पैसे मोजावे लागतात. हे प्रकार मुंबईत टॅंकर माफीयांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत. सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला पिण्याच्या पाण्याच्या अवघ्या काही हंड्यांसाठी ही रक्कम या टॅंकर उमेदवारांना मोजावी लागत आहे.
हा सगळा प्रकार स्थानिक पातळीवर पालिका अधिकाऱ्यांच्या आणि राजकारणी मंडळींच्या संगमताने सुरू असल्याचेही ते म्हणाले. परंतु अशा समस्येवर मात्र पालिकेला तोडगा काढालयाच नाही. मुंबई कॉंग्रेसने सर्वसामान्य मुंबईकरांना मोफत पाणी देण्यासाठीची मागणी याआधीही केली होती.
पालिकेने जेव्हा ५० हजारांहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा पाण्याच्या पुरवठ्याच्या उत्पन्नातून मिळणारी १७२ कोटी रूपयांची पाण्याच्या महसूलात सूट नक्कीच देणे शक्य होते. इतक्या मोठ्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना पाणी मोफत देणे ही अशक्यप्राय बाब नव्हती. पाण्याच्या पैशापोटी टॅंकरमाफीयांच्या माध्यमातून मुंबईकरांकडून लुटमारीचे प्रकार सुरू राहण्यासाठी मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचाच हातभार असल्याचाही आरोप त्यांनी केला.