मोठी बातमी! दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका शाळांमध्ये अडकल्या; निकालावर होणार परिणाम..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

पेपर तपासणीचे काम अपूर्ण असल्याने निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळाने मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिका तातडीने परीक्षक आणि नियामकांकडे तपासणीसाठी द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

मुंबई: कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली आहे. शाळांच्या ताब्यात असलेल्या उत्तरपत्रिका परीक्षक आणि नियामकांना मिळालेल्या नाहीत. पेपर तपासणीचे काम अपूर्ण असल्याने निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळाने मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिका तातडीने परीक्षक आणि नियामकांकडे तपासणीसाठी द्याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तो पेपर रद्द केला.

हेही वाचा: मुंबईतील सर्वात जास्त डेंजर हॉट स्पॉट अवघ्या २ दिवसात ६ वरून ८ वर, वाचा कुठे किती रुग्ण...

बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली. लॉकडाऊनमुळे शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शिक्षण विभागाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. परंतु, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे तपासणीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

शाळा व महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा केल्या जात आहेत. परंतु, कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांतील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी, बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत अडकून पडल्या आहेत. परीक्षकांनी तपासलेले पेपर अजून नियामकांकडे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे निकालावर विपरित परिणाम होण्याची भीती मुंबई विभागीय मंडळाने व्यक्त केली आहे. मंडळाने मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून उत्तरपत्रिका तातडीने तपासणीसाठी देण्याची सूचना केली आहे.

मुख्य नियामकांकडे पेपर पाठवू नये:

दहावी, बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तीन टप्प्यांत तपासण्यात येतात. उत्तरपत्रिका प्रथम परीक्षकाकडून आणि नंतर नियामकाकडून तपासली जाते. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेळ्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मुख्य नियामकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात येते. यंदा कोरोनामुळे पेपर तपासणीस वेळ लागला आहे. पेपर मुख्य नियामकांकडे तपासणीसाठी पाठवल्यास निकाल जाहीर करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे यंदा मुख्य नियामकांकडे पेपर तपासणीसाठी पाठवू नयेत, अशी मागणी राज्य शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उदय नरे  यांनी केली आहे.

हेही वाचा: बाप रे! तब्बल १ लाख रुग्णांमागे अवघे 'इतके' डॉक्टर..पुर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर

या विभागांमुळे निकाल रखडणार:

सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार होण्यास उशीर झाला, तरी राज्याचा निकाल लांबतो. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद विभागीय मंडळांच्या परिसराला कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे या विभागांतील पेपर तपासणीचे काम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या विभागांतील निकालाची कामे पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येणार नाही. त्यामुळे दहावी व बारावीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे.

10 and 12 th results may get  delayed due to this reason read dull story  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 and 12 th results may get delayed due to this reason read dull story