पूराचा एसटी महामंडळाला तडाखा; 100 कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

गेले ​10​ दिवस कोसळ​त असलेल्या मुसळधार​ पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या ​​पूरपरिस्थितीचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. ​

मुंबई : मुसळधार पाऊस आणि ​पूरपरिस्थितीमुळे एसटीला तब्बल 100 कोटींचा फटका बसला आहे.​​ एसटीचे अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा आकडा वाढू शकतो, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सद्यस्थितीला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. 

गेले ​10​ दिवस कोसळ​त असलेल्या मुसळधार​ पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या ​​पूरपरिस्थितीचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश  ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा ​4​ ते ​5​ कोटी रुपयांच्या ​महसूल ​बुडाला आहे. ​​

एसटीचा दररोज ​18000​ बसेसच्या माध्यमातून ​55​ लाख किलोमीटर​ प्रवास होत असून​ त्यातून सरासरी ​22​ कोटी रुपये उत्पन्न मिळते. पण गेल्या ​10​ दिवसापासून​ पावसामुळे​ दररोज एसटीचे किमान ​10​ लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या  रद्द होत आहेत. ​परिणामी ​एसटीच्या ​4​ ते ​5​ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.​ तर​ कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ​50​ लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या ​12​ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही.

ही परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये आहे. त्यामुळे ​ पुढील काही दिवसामध्ये पूर ओसरल्यानंतरच​ नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 crore loss to MSRTC due to flood situation