सीवूड-बेलापूर-उरण रेल्वेसाठी 100 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

मध्य रेल्वेला 7638 कोटी; तर पश्‍चिम रेल्वेला 7042 कोटी रुपयांची तरतूद 

मुंबई : बहुचर्चित सीवूड-बेलापूर-उरण या दुहेरी मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यंदाच्या 2020-21 केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला 7 हजार 638 कोटी; तर पश्‍चिम रेल्वेला 7 हजार 042 कोटींची तरतूद आहे. तसेच उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानकांवरील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा, तिकीट यंत्रणा, पादचारी पूल, रेल्वे ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती, प्रवासी सुविधांमध्ये सरकते जिने-लिफ्ट उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

महत्‍वाचे...गडकिल्‍ल्‍यांवर दारू पिणार्‍यांवर कठोर कारवाई करा

मध्य रेल्वेला यंदा 7 हजार 638 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यामध्ये एटीव्हीएमची संख्या वाढविण्यासाठी 1 कोटी, 638 एटीवव्हीएम बदलण्यासाठी 2 कोटी, सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10,11,12, 12 वर 24 डब्यांची गाडी उभी करण्यासाठी फलाटाची लांबी वाढविण्याकरिता 4 कोटी, पनवेल-कळंबोली कोचिंग डेपोकरिता 8 कोटी, कर्जत-पळसदरी दरम्यान 4थी लाईन आणि कर्जत-पनवेल यार्ड रिमॉडलिगंकरिता 3 कोटी, विविध स्थानकात रोड ओव्हरब्रिज उभारण्यासाठी 351 कोटी, पुलांचे काम-बोगद्याकरिता 98 कोटी, वर्कशॉपकरिता 331 कोटी, प्रवासी सुविधेकरिता 295.6 कोटी, सीएसएमटी स्थानकाच्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता 9.3 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

 महत्‍वाचे...मलबार येथे इमारतीला भीषण आग

पश्‍चिम रेल्वेला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा 10.96 टक्के जास्त म्हणजेच 7042 कोटी रुपयांचा आर्थिक निधी देण्यात आला आहे. नवीन रेल्वे लाईन, गेज रूपांतर, दुहेरीकरणाकरिता 1 हजार 402 कोटी, फलाटांची उंची, अतिरिक्त पिट लाईन, वेग वाढविणे आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाकरिता 50.58 कोटी रुपये, रेल्वेस्थानकांवर एटीव्हीएमची संख्या वाढविण्याकरिता 6.79 कोटी रुपये, रोड ओव्हरब्रिजकरिता 509.4 कोटी, रोड सुरक्षेच्या विविध कामासाठी 901.40 कोटी, विविध प्रवासी सुविधांसाठी 279.70 कोटी, सिग्नल यंत्रणा आणि इतर इलेक्‍ट्रिक कामे पूर्ण करण्यासाठी 178.59 कोटी, चर्चगेट ते विरारदरम्यानचे रेल्वे रूळ बदलण्यासाठी 37.80 कोटी, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे. 

पश्‍चिम रेल्वेवर नवीन एटीव्हीएम 
पश्‍चिम रेल्वेवर 377 एटीव्हीएम बदलून त्या जागी नवीन एटीव्हीएम लावण्यात येणार आहेत. त्यासाठी 1.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सिग्नल आणि टेलिकॉमकरिता 9.82 कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रवासी सुविधेअंतर्गत, चर्चगेट ते विरार दरम्यानच्या प्लॅटफॉर्मची उंची 840 वरून 920 मि.मी. करणे, परळ स्थानकातील पुलाच्या रुंदीकरणाचा समावेश आहे. एकात्मिक सुरक्षा प्रणाली 32 रेल्वेस्थानकांवर राबविण्याकरिता 1.18 कोटी, वांद्रे स्थानकाचा ऐतिहासिक दर्जा संवर्धनाकरिता 4.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

वाहतूक सुविधेमध्ये 2.5 कोटी 
- अंधेरी-विरार धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, जोगेश्वरी टर्मिनस, नवी दिल्ली-मुंबई गाडीचा वेग वाढविणे 

परळच्या स्थानकांत पादचारी पूल - 16.06 कोटी 
- लोअर परळ, प्रभादेवी, गोरेगाव, वांद्रे, वसई रोड, नालासोपारा, गोरेगाव, मालाड आणि भाईंदर-विरार-कांदिवली स्थानकात नवीन पादचारी पूल, बोरिवली स्थानकात 12 मीटर रुंदीचा पूल. 

रोड सुरक्षेसाठी 4 कोटी 6 लाखांचा चर्नी रोड-ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर, लोअर परळ-प्रभादेवी रोड ओव्हरब्रिज. 

दुहेरीकरण मार्ग 
- कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन- 67.62 कि.मी.-55 कोटी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 crore for the Seawood-Belapur-Uran Railway