मुंबईतील १०० वर्षे आयुष्यमानाच्या ब्रिटिशकालीन पर्जन्यवाहिन्यांचे होणार सक्षमीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain channels

मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्यवाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.

Mumbai News : मुंबईतील १०० वर्षे आयुष्यमानाच्या ब्रिटिशकालीन पर्जन्यवाहिन्यांचे होणार सक्षमीकरण

मुंबई - मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्यवाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने १०० वर्षे जुन्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरूस्तीमुळे या वाहिन्यांचे आयुष्यमान आणखी ३० वर्षांनी वाढण्याचा अंदाज आहे. आयआयटी मुंबईने सुचवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर या डागडुजीसाठी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकेत करण्यात आला आहे. तसेच नवीन आणि आयुष्यमान वाढवणारे जिओपॉलिमर ट्रेंचलेस टेक्नॉलॉजी या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून वापरण्यात येणार आहे.

आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून शॉर्ट पिट मेथडच्या माध्यमातून या वाहिन्यांचे सक्षमीकरण करण्यात येत होते. त्यामध्ये हायप्रेशर कॉंक्रिटचा वापर करून या वाहिन्यांचे आयुष्यमान वाढवण्यात येत होते. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून १०० वर्षे जुन्या वाहिन्यांची दुरूस्ती जिओपॉलिमर ट्रेंचलेस टेक्नोलॉजीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेकडून पाच वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. या कामामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांची स्वच्छता, गाळ काढणे, सर्वेक्षण करणे, आर्च ड्रेनच्या मॅनहोलचा आकार वाढवणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

जिओपॉलिमर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ९०० मिमी व्यासाच्या वाहिन्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मुख्यत्वेकरून टनेलच्या ठिकाणी अशा मटेरिअलचा वापर होतो. जिओपॉलिमर लायनिंग मटेरिअलचा वापर करून स्पिन कास्ट हायस्पीड मोटरचा वापर करण्यात येतो. स्पे करून हे मटेरिअल टनेलमध्ये वापरण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत. मुख्यत्वेकरून अमेरिकेत हे तंत्रज्ञान टनेलच्या ठिकाणी वापरले जाते.

या कामाच्या निमित्ताने आयआयटी आवश्यक सर्व आराखडे, जिओपॉलिमर स्ट्रक्चरल लायनिंग डिझाईन या आयआयटीसारख्या संस्थांकडून मंजूर करून घेण्याची अट ठेवण्यात आली आहे.

या कामाअंतर्गत चार महिन्यांच्या कालावधीत सीसीटीव्ही सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी गाळ काढण्यासाठी जागेच्या शोधाची जबाबदारी पालिकेने घ्यावी असेही सुचवण्यात आले आहे. या संपूर्ण कामासाठी ४१५ कोटी ५८ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. 'आयआयटी मुंबईने जिओपॉलिमर ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ट्रेंचेसचे आयुष्यमान आणखी ३० वर्षांनी वाढणे शक्य होईल, असा सल्ला आयआयटी मुंबईने दिला,' अशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. एकुण १४ हजार २८५ मीटरच्या वाहिन्यांसाठी हे काम करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागात २७ कंत्राटाअंतर्गत या निविदा प्रक्रियेत काम देण्यात येणार आहे.