दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज 

मुंबई : महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यात शाळांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मंडळाने परीक्षा अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल; तर विलंब शुल्कासह 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

दहावी परीक्षेला बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत; तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार होते, परंतु शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरता आले नाहीत. यातच पुन्हा दिवाळी सुट्टीमुळे मंडळाने दिलेल्या मुदतीत अर्ज भरणे अवघड झाल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती.

त्यानुसार मंडळाने मुदतवाढ दिली होती. या वेळी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 15 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार होते; तर विलंब शुल्कासह 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार होते, परंतु अर्ज भरण्यातील अडचणी अद्याप सुरूच आहेत. याबाबत शाळांनी मंडळाकडे तक्रारी केल्यानंतर मंडळाने पुन्हा मुदत वाढवली आहे. आता 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क आणि 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. तसेच शाळांना 11 डिसेंबरपर्यंत बॅंकेत चलन जमा करता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th Exam : Application form date Extended