दहावीचे विद्यार्थी कोट्यातील गुणांना मुकणार? प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

तेजस वाघमारे
Wednesday, 13 January 2021

खेळ, चित्रकला, शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले तसेच लोककला प्रकारात सहभाग घेतलेले दहावीचे विद्यार्थी कला कोट्यातील वाढीव 25 गुणांना मुकण्याची शक्‍यता आहे.

मुंबई  : कोट्यातील गुणांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळांना 15 जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. ही मुदत अपुरी असल्याने खेळ, चित्रकला, शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविलेले तसेच लोककला प्रकारात सहभाग घेतलेले दहावीचे विद्यार्थी कला कोट्यातील वाढीव 25 गुणांना मुकण्याची शक्‍यता आहे. ही मुदत अपुरी असून मुदतवाढ देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी राज्य मंडळाकडे केली आहे. 

राज्य मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने 12 जानेवारीला परिपत्रक जारी करून कोट्यातील वाढीव गुणांचे प्रस्ताव 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना शाळांना दिल्या. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही या परिपत्रकात नमूद केले आहे. पण मंडळाच्या या सूचना अन्यायकारक असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील शाळा बंद असून अनेक विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठीही शाळेत आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कोट्याचे प्रस्ताव कसे सादर करणार, हे प्रस्ताव सादर करण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये होणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजीएटची परीक्षा झालेली नाही. दहावीच्या परीक्षेला बसणारे 10 ते 15 टक्के विद्यार्थी ही परीक्षा देतात पण परीक्षाच न झाल्याने हे विद्यार्थी वाढीव गुणांना मुकण्याची शक्‍यता आहे. इतर परीक्षांप्रमाणे योग्य खबरदारी घेऊन एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षांचे आयोजनही कला संचालनालयाने करावे अशी मागणीही संघटनेने केली आहे.

10th students to drop marks in quota? Demand for extension of time to submit proposal

---------------------------------------------- 
( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th students to drop marks in quota? Demand for extension of time to submit proposal