Mumbai Building Collapse : मुंबईत पुन्हा मृत्यूचा घाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

जखमींसाठी ग्रीन कॉरिडॉर
दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या डोंगरी परिसरात एरवी प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे जखमींना तत्काळ रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी परिसरात ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला होता. तसेच परिसरत अतिरिक्त वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. त्यासाठी जे. जे. पुलाखालून दक्षिणेकडील मार्गिका वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे एरवी दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आलेल्या जे. जे. उड्डाण पुलावरून दुचाकी वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत अकरा ठार, आठ जखमी
मुंबई - डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून आज अकरा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, चार महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे २५ जण अडकल्याची शक्‍यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना घडली ती इमारत अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे.

डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथील अब्दुल हमीद दर्ग्याशेजारी ही केसरबाई इमारत असून, त्याच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली ही इमारत आहे. तीन मजल्याच्या या इमारतीचा भाग सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कोसळला. त्यामुळे परिसतात जोरदार आवाज झाला. काही काळ स्थानिकांना काय झाले, हेच कळाले नाही. त्यामुळे अनेक जण घटनास्थळी दाखल झाले असता इमारतीचा भाग पत्त्यांच्या इमारतीसारखा खाली कोसळला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेळ न दवडता स्थानिकांनीच मदतकार्याला सुरवात केली. तसेच पोलिस व अग्निशमन दलाला दूरध्वनी करून दुर्घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामन दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे दोन लहान मुलांना आणि एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यासह सात जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळावर आठ फायर इंजिन, एक क्‍यूआरव्ही, दोन रेस्क्‍यू व्हॅन, पाच रुग्णवाहिका, चार जेसीबी, चार डंपर पाचारण करण्यात आले होते.

एनडीआरएफचेही ९७ कर्मचारी व अग्निशमन दलाने मदतकार्य राबविले. आठ जखमींमध्ये दोन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. 

चिंचोळ्या रस्त्यांमुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत असून आणखी २५ जण अडकल्याची शक्‍यता आहे. तसेच  इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्‍यता आहे. या इमारतीत पोटभाडेकरू राहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना रहिवाशांबद्दल अधिक माहिती नसल्याचे दिसून आले. 

यापूर्वी या इमारतीच्या शेजारी असलेली मूळ केसरबाई इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीतील ५३ कुटुंबीयांनी इमारत रिकामी केली होती. दुर्घटनाग्रस्त झालेल्या अनधिकृत इमारतीमधील दहा रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती. सध्या तेथे पोटभाडेकरू राहत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 killed kesarbai building collapse mumbai